computer

पीव्ही सिंधूने या २० कंपन्यांना नोटीस पाठवून तंबी का दिली आहे?

काही दिवसांपूर्वीच "फॉग चल राहा है।" हा आमचा लेख वाचला असेलच. आज फॉगच्या एका नव्या जाहिरातीबद्दल आधी वाचूया!

या जाहिरातीचा विषय आहे आपल्यावर आलेले कोरोनाचे संकट. म्हणजे विषय तसा नवा नाही पण मग ही व्हिडीओ अ‍ॅड का बघायची हा प्रश्न आहेच. तर,जुनाच विषय नव्याने सादर करण्याच्या शैलीचा अनुभव घेण्यासाठी हा व्हिडीओ बघायचा. 'हत्ती गेला आणि शेपूट राहिलं' या जुन्या वाक्प्रचारावर आधारीत या जाहिरातीची मध्यवर्ती कल्पना आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. लसीकरण चालू आहे, मृत्यूंचे प्रमाण घटते आहे. म्हणजे हत्ती गेलाच आहे असा आशावाद या जाहिरातीत दिसतो आहे..... पण शेपूट अजूनही बाकी आहे अशी सावधगिरीची सूचना पण सोबत दिली आहे.

एका जुन्या गजबजलेल्या वाड्यात शिरलेला हत्ती वापरून हे चित्रीकरण करण्यात आले आहे. संकल्पना स्पष्ट आणि मनोरंजक रितीने मांडण्यात प्रायोजक यशस्वी झाले आहेत. कोविडच्या कठीण परिस्थितीत निराश होऊ नका, फक्त सावध रहा, सकारात्मक रहा आणि थांबा, थोडी कळ सोसा, चांगला काळ लवकर येणारच आहे असे आश्वासित करणारी ही जाहिरात आहे.

गेल्या दिड वर्षात अनेक कंपन्यांनी असे लोकहिताचे संदेश दिले आहेत. सोशल मिडीया आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातूम हे संदेश 'व्हायरल' होतात. संदेशही पोहचतो आणि ब्रँडची जाहिरातही होते. अशा दुहेरी फायद्याच्या कल्पनांचा किंवा कँपेनींगचा मर्यादीत वापर झाला तर आक्षेप घेण्यासारखे काही नसते. पण सध्या जाहिरात क्षेत्रात एक नवे प्रस्थ बोकाळले आहे, ज्याला 'मोमेंट मार्केटींग (moment marketing) असे नाव आहे. कँपेन मार्केटींगचे हे पुढचे पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही.

हे आता एका उदाहरणासह समजावून घेऊ या.

नुकत्याच ऑलींपिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांच्या सुरुवातीला अनेक कंपन्यांनी आपापल्या देशाच्या खेळाडूंना जाहिरातीद्वारे शुभकामना दिल्या. इथपर्यंत सगळं ठीकच होतं. पण त्यानंतर एखादा खेळाडू यशस्वी झाला की त्या खेळाडूचा फोटो वापरून पुन्हा जाहिराती करण्याचा प्रकार सुरु झाला. याला 'पिगी रायडींग' म्हणतात. म्हणजे फोटो खेळाडूचा आणि जाहिरात मात्र कंपनीची असा खेळच सुरु झाला. अर्थातच अशा जाहिरातीसाठी कोणीही त्या खेळाडूची परवानगी घेतली नव्हती. विजयाच्या बातमीने आनंदात असलेल्या वाचकाचे किंवा प्रेक्षकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा प्रयोग होता. हा प्रयोग नंतर इतका बोकाळला की ते 'मोमेंट मार्केटींग' न राहता 'मोमेंट हायजॅकींग' म्हणायची वेळ आली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच्या लग्नात दुसर्‍याचं बारसं उरकून घेण्याचा हा नवा पायंडा आहे.

आतापर्यंत अशा कल्पनेला कोणीही आक्षेप घेतला नव्हता. पण यावर्षी पी. व्ही. सिंधूने स्पर्धेत मेडल जिंकल्यावर तिचा फोटो वापरून २० कंपन्यांनी स्वतःचीच जाहिरात करून घेतली. या कंपन्या गल्लीबोळातल्या छोट्यामोठ्या कंपन्या नव्हत्या, तर अनेक देशी-विदेशी कंपन्या पण त्यात सामिल झाल्या होत्या. अगदी नावंच घ्यायची झाली तर हॅपी डेंट, कोटक बँक, पानबहार, व्हिक्स,अपोलो अशा मोठमोठ्या कंपन्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

बेसलाईन व्हेंचर्स नावाची कंपनी सिंधूच्या ब्रँडींगचे कामकाज बघते. त्यांनी या सर्व २० कंपन्यांना कायदेशीर नोटीस देऊन सर्व जाहिराती काढून घ्यायला लावल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिंधू किंवा तिचे ब्रँडींग बघणार्‍या कंपनीच्या परवानगीशिवाय हे उपद्व्याप करणे म्हणजे इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी अ‍ॅक्टचा भंग होता. त्याखेरीज स्पर्धा पार पडल्यानंतरही आंतराष्ट्रीय ऑलिंपिक्स कमिटीचा 'ब्लॅक आऊट पिरीयड' असतो .त्या नियमाप्रमाणेही अशा जाहिराती करता येत नाहीत.

आपण या सगळ्यातून काय शिकायचे हे आता बघूया.आपल्यापैकी अनेक वाचक व्यावसायिक उद्योजक आहेत. या सगळ्या उद्योजकांनी बौध्दीक संपदा कायदा समजून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. कोव्हीडच्या नंतरच्या काळात मार्केटींग -अ‍ॅडव्हर्टायझिंग -ब्रँडींग या क्षेत्रात स्पर्धात्मक वादळ येणार आहे.त्याची पूर्वतयारी म्हणून हा लेख नक्की वाचा आणि तुमचे मतही मांडा.

सबस्क्राईब करा

* indicates required