२६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नलचा दर्जा !!
अनेक महिला पोलीस दलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पोलीस दलात पुरुषांना जशी बढती मिळते तशी महिला पोलिसांना ही मिळावी अशी ईच्छा अनेक वर्षे महिला अधिकारी करत असतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करात पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल म्हणून बढती देण्यात आली आहे. असे झाल्याने भारतातील महिलांनी सैन्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
भारतीय लष्कराने नुकतंच २६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नलचा दर्जा दिला आहे.
आतापर्यंत फक्त काही ठराविक कॉर्प्समध्ये महिला अधिकाऱ्यांना कर्नलचा दर्जा देण्यात यायचा. आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज ऍडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स (एईसी) ही कॉर्प्स आहेत. पण आता ज्या पाच महिलांना कर्नलचा दर्जा देण्यात आला आहे, त्या या तिन्ही दलातील नाहीत. त्या पाच महिला अधिकारी कॉर्प्स ऑफ सिग्नल, कॉर्पस ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स यामधील आहेत. कर्नल पदासाठी ज्या महिला अधिकारी निवडल्या गेल्या आहेत त्यांची नावे सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि कॉर्पर्स ऑफ इंजिनिअर्स लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर अशी आहेत.
महिला अधिकार्यांना कर्नलचा दर्जा देण्याचा सरळ अर्थ असा आहे की या अधिकारी कमांडच्या भूमिकेत असतील. त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार असतील. महिलांनी लष्करात यावे व तिथेही करियर म्हणून पहावे यासाठी अनेक बदल होत आहेत. हे बदल न्यायालयानच्या आदेशानुसार होत आहेत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने N D A (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) परीक्षेत मुलींना बसण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेक मुली भारतीय सेना, हवाई दल, नौदल या तिन्ही दलात कॅडेट्स म्हणून तयार होतील व लष्करामध्ये येऊ शकतील.
लष्कराच्या सर्व शाखांमध्ये महिलांना पदोन्नतीच्या संधी दिल्यामुळे त्यांनाही अधिक प्रोत्साहन मिळेल. व त्या अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरांतून होत आहे. यामुळे मुलींसाठी अजून एक करियर संधी उघडली गेली आहे. तुमचे काय मत आहे?
लेखिका: शीतल दरंदळे




