computer

स्वतःचं हक्काचं घर तेही 86 रुपयात? हे घर कुठे आणि कसं खरेदी करायचं?

स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्या वाढणाऱ्या घराच्या किमती पाहून हे स्वप्नच झालं आहे. शहरातल्या एवढ्याश्या फ्लॅटच्या किंमती पाहिल्या तर एखाद्याला चक्करच येईल. आपल्या परवडणाऱ्या भागात घर पाहिले तरीही बँकेचे कर्ज आणि जमवलेली सगळी रक्कम वापरावी लागते. त्यामुळे घर घेणे हे महाकठीण काम होऊन जाते.  पण अवघ्या ८६ रुपयांत इटलीत स्वत:चं घर विकत मिळत असेल तर? खरं वाटत नाही ना!  हे घर कुठे आणि कसं खरेदी करायचं याची माहिती वाचून घ्या.

इटलीची (Italy) राजधानी रोमजवळचं असणारं मेन्जा टाऊन (Maenza Town) मध्ये केवळ एक युरोत घर विक्री सुरू आहे. तिथे एका योजनेअंतर्गत ही स्वस्त घरांची विक्री सुरू आहे. शहरातील लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. एका युरोत घरं विक्रिला सुरुवात करणारं मेन्झा टाउन हे पहिलचं शहर आहे.  मेन्झा शहराचे महापौर क्लाउडिओ स्पेरदुट्टी यांनी जाहीर केले आहे की मेन्झाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. इथे अनेक दिवसांपासून कोणीही राहत नाही. त्यामुळे लोकांनी परत रहायला यावे आणि हा भाग पहिल्यासारखा गजबजून जावा यासाठी ही अभिनव कल्पना आहे असे म्हणले जातेय.

रोमच्या लॅटियम भागात अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत हे शहर आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेंझा शहरात लेपिनी टेकड्या आहेत. या टेकड्यांच्या मध्यभागी ही घरं बांधलेली आहेत. या शहराला ऐतिहासिक महत्व आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे शहर रिकामं झालं आहे.  इथल्या जुन्या घरांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. कारण ही  घरं जीर्ण अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकतात. म्हणूनच या घरांचा स्वस्त दरात लिलाव होत आहे. इथले निसर्ग सौंदर्य पाहून व ज्यांना गरज आहे ते  घर विकत घेऊ शकतात. फक्त आधी त्यांना काही नियम पाळावे लागतील. त्यासाठी सरकारची प्रक्रियाही तयार आहे.

ज्यांना घरं खरेदी करायची आहे अशा पहिल्या १० लोकांना नोटीस काढून घरांबद्दलची माहिती दिली जाणार आहे. या घरांची सगळी माहिती ऑनलाईन ही दिली जाईल.पण  एक अट असणार आहे. ही घरं खरेदी करणाऱ्यांना ५००० युरो म्हणजेच सुमारे ४.३ लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतील. जेव्हा घराची दुरुस्ती पूर्ण होईल, तेव्हा हे पैसे देखील घर खरेदी करणाऱ्याला परत केले जातील. घर खरेदी केल्यावर त्या घराचा उपयोग तुम्ही राहण्यासाठी का व्यवसाय करण्यासाठी  करणार आहात याचीही  माहिती सरकारला द्यावी लागेल. त्यानंतरच घर खरेदी करणाऱ्याच्या नावावर घर होऊ शकेल. २८ ऑगस्टपर्यंत ही योजना पहिल्या टप्यात सुरू राहणार आहे. पुढे अजूनही घरे असल्यास योजना सुरू उपलब्ध होईल.

भले काहीही कारण असो, पण फक्त १ युरोत घर देणे म्हणजे इटली सरकारने उचललेले खूप मोठे पाऊल आहे. ज्यांना गरज आहे अश्या लोकांना ते मिळो! असे आपल्याकडेही कधी होऊ शकते काय?

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required