तीन वर्षांच्या कालावधीसाठी उदयाला आलेला हा देश कसा गायब झाला? कुणी गायब केला?
दोन शेजारी राष्ट्रांमधील सीमारेखा ही क्वचितच काही शांत असेल नाही तर सीमारेषा आणि सीमावाद हे दोन्ही एकत्रच नांदत असतात. याला कोणतेच देश अपवाद नाहीत. अशा सीमारेखेच्या वादातूनच काही वर्षापूर्वी एक छोटासा स्वतंत्र देश जन्माला आला होता. या देशाचं नाव होतं ‘द रिपब्लिक ऑफ इंडियन स्ट्रीम.’ आता यात इंडियन नाव असलं तरी याचा भारताशी काहीही संबंध नव्हता. हा देश कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर वसला होता. या नव्या देशाची लोकसंख्या अवघी तीनशे होती. भूभागही तितकाच छोटा. 'द रिपब्लिक ऑफ इंडियन स्ट्रीम' अशा भल्या मोठ्या नावाच्या या पिटुकल्या देशाला कुणी ग्राह्यच धरलं नाही आणि मग तीन वर्षांनी हा देश जगाच्या नकाशातून गायबही झाला. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी उदयाला आलेला हा देश कसा गायब झाला कुणी गायब केला? जाणून घेऊया या लेखातून.
रात्रीच्या गडद अंधारात आकाशात एखादी चांदणी चमकते आणि पहाटेपर्यंत सूर्याची किरणे अवकाशात आपला पसारा मांडूस्तोवर ही चांदणी लुप्त होते तसेच काहीसे या देशाचे झाले. १८३२ मध्ये हा देश उदयाला आला आणि १८३५ मध्ये तो लुप्तही झाला. यामागचे कारण शोधण्यासाठी आपल्याला १७८३ मध्ये झालेल्या पॅरीस करारापर्यंत जावे लागेल.
अमेरिका नुकताच कुठे स्वतंत्र झाला होता. कॅनडाच्या काही भागावर ब्रिटनचे वर्चस्व होते. अमेरिका-ब्रिटन यांच्यातला सीमावाद संपवण्यासाठी १७८३चा हा पॅरीस करार करण्यात आला. या करारानुसार कनेक्टिकट रिव्हरच्या मुखापर्यंत या दोन्ही देशांची सीमा विस्तारलेली असेल असं ठरलं आणि इथेच मोठा घोळ झाला. कारण कनेक्टिकटचं मुख म्हणजे नेमकं कुठलं हेच काही केल्या दोन्ही देशांना स्पष्ट होत नव्हतं. मग काय दोन्ही देशांनी स्वतःच्या सोयीने अर्थ लावून आपापल्या देशांची सीमा ठरवली आणि त्यानुसार करवसुली सुरू केली.
कनेक्टीकट नदीचा उगम आणि त्या परिसरात असलेले तीन तलाव यांना जोडल्यास मध्येच एक बेटासारखं भूभाग उरतो तो म्हणजे ‘द रिपब्लिक ऑफ इंडियन स्ट्रीम.’ हा भूभाग कोणाच्या हद्दी याबाबत या करारात काहीच स्पष्टपणे सांगण्यात आले नव्हते. मग कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशाचे अधिकारी या मधल्या भूभागातून कर वसुली करू लागले. दोन दोन देशांचे कर भरल्यानंतर तिथल्या नागरिकांची परिस्थिती काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. दोन्हीकडचे करवसुली अधिकारी येत आणि करवसुली करून जात एवढंच. बाकी सोयी-सुविधांसाठी मात्र दोन्हीकडूनही पानेच पुसली जात होती.
अशा परिस्थितीत इथल्या नागरिकांना एकच अपेक्षा होती की त्यांना कुठल्या तरी एका देशाचे नागरिकत्व मिळावे आणि एकाच देशात त्यांना सामावून घेतले जावे. पण त्यांच्या या मागणीची दखल कुणी घेतच नव्हतं. शेवटी वैतागून या नागरिकांनी स्वतःचाच एक स्वतंत्र देश घोषित केला. या नागरिकांनी आपला देश स्वतंत्र घोषित केला असला तरी त्यालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली नव्हती. दोन्ही देशांचे कर भरण्याचे त्यांनी सपशेल टाळले होते. अशातच एक घटना घडली ज्यामुळे या स्वतंत्र देशाचे गाऱ्हाणे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांना ऐकून घ्यावे लागले. काय होती ती घटना?
इंडियन स्ट्रीममधील एका नागरिकाने कर भरला नाही म्हणून ब्रिटिश शेरीफने त्याला अटक केली. या व्यक्तीला सोडवण्यासाठी इंडियन स्ट्रीममधील तरुणांच्या एका समूहाने कॅनडावर हल्ला केला. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला डांबून ठेवण्यात आले होते, ते एका न्यायाधीशाचे घर होते आणि त्याच घरावर तरुणांच्या या गटाने हल्ला केला. या प्रकरणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.
शेवटी या इंडियन स्ट्रीमचा एकदासा काय तो निकाल लावलाच पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी त्यांना कुठल्या देशात राहायचे आहे, हे जाणून घेण्यासाठी मतदान घेण्याचे निश्चित केले. स्ट्रीमर्सनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेची निवड केली आणि हा देश अमेरिकेत विलीन करण्यात आला. ब्रिटनने १८३६ साली या भूभागावरील आपला दावा मागे घेतला आणि पुन्हा एकदा कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील सीमा आखल्या गेल्या.
१८४० मध्ये इंडियन स्ट्रीमचा हा भूभाग पीटर्सबर्ग टाऊन नावाने ओळखला जाऊ लागला. आज हे शहर अमेरिकेतील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. १८४२ साली पुन्हा एकदा वेब्स्टर-ॲशबर्टन करार करून युएस स्टेट ऑफ माईन आणि कॅनेडियन प्रोव्हिन्स ऑफ न्यू ब्रनस्विकमधील सीमा निश्चित करून नवा करार करण्यात आला.
अशाप्रकारे जगाच्या नकाशात उदयास आलेला एक नवा देश तीन वर्षातच पुन्हा लुप्त झाला.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी




