जन्माष्टमीच्या निमित्ताने ऐका विस्मरणात गेलेली एक खास गवळण!!
आज जन्माष्टमी म्हणजे सर्वांच्या लाडक्या देवाचा -कृष्णाचा -हॅप्पी बड्डे ! जर देवदेवतांचा पॉप्युलॅरिटी इन्डेक्स कुणी बनवलाच,तर या इन्डेक्समध्ये एक नंबर अव्वल नाव या देवाचंच असेल ! कोणाला तो जगाला गीता सांगणारा फिलॉसॉफर म्हणून आवडत असेल तर कोणाला लोण्यावर ताव मारणारा बाळकृष्ण म्हणून आवडत असेल तर कोणाला राधेसोबत रममाण होणारा प्रियकराच्या रुपात आवडत असेल. त्याच्या या वेगवेगळ्या रुपाचे वर्णन करणार्या अनंत ओव्या, अगणित अभंग ,असंख्य कविता आपल्याला आवडीनिवडी प्रमाणे ज्याच्या त्याच्या लक्षात राहत असतात.पण या सर्व प्रकारात लोकप्रिय प्रकार म्हणजे ' गवळण' ! गवळणीशिवाय कोणताही भजनाचा कार्यक्रम पूर्ण झाला असे वाटत नाही.अशीच एक विस्मरणात गेलेली गवळण आहे ' याचे हातीचा वेणू कुणी घ्या गं !
बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात 'वीणा भक्तीगीत मंडळ' या नावाचे महिलांचे भजनी मंडळ होते.त्यांच्या एका भजनाला म्हणजे एका गवळणीला संगीतकार बाळ माटे यांनी चाल दिली होती. ही गवळण इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर एचएमव्ही या रेकॉर्ड कंपनीने वीणा भक्तिगीत मंडळाला आमंत्रीत करून रेकॉर्ड बनवली होती.
आज जन्माष्टमीच्या निमित्ताने ही गवळण ऐकू या पण त्याआधी ही पूर्ण रचना वाचायला विसरू नका.
याचे हातींचा वेणु कुणी घ्या गे ॥ध्रु०॥
गृहीं आपुल्या मी करीत होतें धंदा । वेणु वाजविल्या नंदाचिया नंदा ॥ तल्लीन झालें याचिया मुरलीनादा ॥१॥
घरीं सासुरवास मला भारी । जावानणदा गांजिती परोपरी ॥ याचे मुरलीनें भुलविल्या पोरी ॥२॥
तान्हें बालक टाकुनि आलें घरा । गृहीं आहे सासरा म्हातारा ॥ त्यानें केला या जीवाचा कीं वारा ॥३॥
याचा नवलावा किती सांगूं बाई । चित्तवृत्ति वेधली याचे पायीं ॥ संसृतीसि ठाव उरला नाहीं ॥४॥
वेनु नोहे हा वीष मला वाटे । नाद ऐकोनी काम मनीं दाटे ॥ मध्वनाथाची मूर्ति हृदयीं भेटे
एक विशेष : वीणा भक्तीगीत मंडळाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.त्यांच्या कार्याचे 'डॉक्युमेंटेशन' होणे आवश्यक आहे . वाचकांकडे अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा !




