computer

आईस्क्रीम चाखण्याची हजारो डॉलर्स पगाराची नोकरी करणाऱ्या माणसाबद्दल कधी ऐकलंय? वाचाच मग इथे...

आईसक्रीम म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना? जगात क्वचितच कोणी असेल ज्याला आईस्क्रीम आवडत नसेल. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा आईसक्रीम खाणारे आहेत. भारतात अगदी कोपऱ्या-कोपऱ्यावर आईस्क्रीमचे दुकान असते. लहान असो वा थोर सगळ्यांना आईस्क्रीमचे वेड असते. भारतातच किती वेगवेगळे ब्रँड आहेत. जगभरातही अनेक आइस्क्रीमचे ब्रॅण्ड आहेत! पण तुम्हाला माहीत आहे का? या आइस्क्रीमची टेस्ट करण्यासाठी एका व्यक्तीला कोट्यवधी पगार दिला जातो. होय! आईस्क्रीमच्या चवीची गुणवत्ता अगदी बरोब्बर ओळखणारी व्यक्ती आहे, अमेरिकेचे जॉन हॅरिसन. जेव्हाही आईस्क्रीमची नवीन चव बाजारात येते, ती जॉन यांच्या जीभेच्या संमतीने येते. या कामासाठी जॉन करोडो रुपयांचा पगार मिळतो. जॉन हॅरिसन यांनी आतापर्यंत हजारो लीटर्स आइस्क्रीम चाखले आहे. यासाठी त्यांनी जीभेचा विमाही काढला आहे.

जॉन यांचा जन्म १९४२ मध्ये झाला. त्यांचे आजोबा आईस्क्रीम कारखाना चालवायचे. म्हणूनच लहानपणापासूनच आईस्क्रीम खाण्याची आणि बनवण्याची आवड जॉन यांना लागली. त्यांची ती आवड एका नोकरीत रुपांतरीत होईल याची तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल. जॉन आईस्क्रीमची चव घेऊन आजोबांना सांगायचे त्यामुळे त्यांची चव विकसित होऊ लागली. त्यात काही सुधारणा करायची असल्यास ते त्यांचे मत सांगायचे.

मोठे झाल्यानंतर १९५६ मध्ये जॉन हॅरिसन ड्रेयर कंपनीत रुजू झाले. ही कंपनी आइस्क्रीम तयार करायची. हॅरिसनला सुरुवातीला आइस्क्रीम परीक्षकाची नोकरी मिळाली नव्हती. पण त्यांचा सूचनांमुळे आइस्क्रीमची चव सुधारत होती. लोकांना आवडत होती. त्यानंतर हॅरिसनला आइस्क्रीमची चव चाखण्याचे काम मिळाले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की ड्रेयर कंपनीत असताना त्यांनी २०० दशलक्ष गॅलनहून अधिक आइस्क्रीम चाखले आहे. त्यासाठी त्यांना पगारही हजारो डॉलर्समध्ये मिळतो.

हॅरिसन दररोज ते २० आइस्क्रीम फ्लेवर्स चाखत असत. प्रत्येक चवीत ३ ते ४ पर्याय होते. अशाप्रकारे रोजच्या ५ तासांच्या कामात ६० प्रकारच्या आइस्क्रीमची चव घ्यायचे. आणि विशेष म्हणजे ज्या चमच्याने ते आईस्क्रीमची चव घ्यायचे तो साधासुधा चमचा नव्हता तर त्याला सोन्याचा वर्ख होता, त्या चमच्यामुळे आईस्क्रीमची चव बदलत नव्हती. जॉन आइस्क्रीम खाताना पूर्ण खात नाहीत, ते चाखल्यानंतर थुंकुन टाकतात. त्यापूर्वी ते वजन वाढण्याच्या दृष्टीने पूर्ण चमचा आईस्क्रीम खात. त्यांना वाटे, आईस्क्रीमची चव पाहणारा व्यक्ती जाडजूड हवा जेणेकरून लोक विश्वास ठेवतील.

जॉन हॅरिसनची जीभ इतकी मौल्यवान आहे की त्यांनी तिचा २ दशलक्ष डॉलर्सचा विमा उतरवला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जॉनची जीभ विशेष आहे. त्यांची जीभ आणि चव ग्रंथी सामान्य माणसाच्या जिभेपेक्षा ११.५ टक्के पातळ आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही आइस्क्रीमची चव इतरांपेक्षा चांगली कळू शकते. आईस्क्रिमची चव चाखल्यानंतर फक्त काही सेकंदात ते आइस्क्रीममध्ये काय कमतरता आहे हे सांगू शकतात. हजारो आइस्क्रीम फ्लेवर्स चाखल्यानंतर जॉन यांचे आवडते फ्लेवर्स विचारले तर ते सांगतात स्ट्रॉबेरी, कोको, नारळ आणि व्हॅनिला आणि आंबा.

जॉन त्यांच्या अनुभवातून हेही सांगू शकतात की कोणत्या व्यक्तीला कोणती चव आवडेल. इंग्लंडमध्ये कॉफी फ्लेवर जास्त पसंत केला जातो, तर कॅलिफोर्निया आणि पाश्चिमात्य राज्यांना चॉकलेट फ्लेवर जास्त पसंत आहे. पेकॉन आणि स्ट्रॉबेरीला दक्षिण आणि मिडवेस्टमध्ये प्राधान्य दिले जाते. तर व्हॅनिला आइस्क्रीम अजूनही संपूर्ण जगात सर्वाधिक पसंत केले जाते.

जॉन हॅरिसन २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले, परंतु आइस्क्रीमची चव घेण्याचे काम अजूनही त्यांना आवडते. आपण जे आईस्क्रिम खातो त्यातले बरेच फ्लेवर त्यांच्यामुळे मिळाले आहेत. जगाच्या पाठीवर असाही कोणी माणूस असेल ज्याचे काम इतके असे वैशिष्ट्यपूर्ण असेल याचा आपण कधी विचारही केला नसेल , हो ना?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required