इडीला सुकेश चंद्रशेखरच्या दहा करोडच्या बंगल्यात करोडोंचं मौल्यवान साहित्य सापडलं. तुरुंगातूनही २००करोड कमावणारा हा सुकेश आहे तरी कोण?
तुरुंग म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर कुठले चित्र उभे राहते? चार भिंती,समोर लोखंडाचे गज आणि त्यात हातात बेड्या ठोकलेले, चेहऱ्यावर दीनवाणे भाव असणारे कैदी. तुरुंगवासाची शिक्षा ही सर्वात खडतर असली पाहिजे असे मानले जाते. काहीजणांना तर जेलचं नाव ऐकूनच धडकी भरते. हे सगळं खरं असलं तरी तुरुंगातील कैदी दीनवाण्या अवस्थेत तुरुंगातील शिक्षा भोगत असतील ही अपेक्षाच अलीकडे फोल ठरली आहे. तुरुंगात राहूनही हवी ती सेवा मिळवणारे आणि आपल्या संपत्तीत कोट्यावधी रुपयांची भर टाकणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसारख्या कैद्यांचे कारनामे आणि या गुंडांना शरण जाणारी तुरुंगव्यवस्था पाहिल्यास तुरुंग म्हणजे शिक्षा मिळण्याचे ठिकाण ही संकल्पनाच बाद ठरते. सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात बसून आपल्या करोडो रुपयांची संपत्ती जमवल्याची बातमी हाती लागताच इडीने त्याच्या चेन्नईतील घरावर छापा टाकला. या घरात इडीला जे काही आढळून आले ते पाहून नक्कीच इडी अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले असतील.
तुरुंगात राहूनही आपल्या संपत्तीत करोडो रुपयांची भर घालणारा हा सुकेश आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. सुकेश हा मुळचा बंगळूरूचा. ऐषोआरामाचे आणि चैनीचे जीवन जगता यावे हेच त्याचे स्वप्न! स्वतःच्या या ऐषोआरामासाठी त्याने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच लोकांना गंडा घालायला सुरुवात केली. नंतर तो चेन्नईत स्थायिक झाला. या शहरातून त्या शहरात असे करत करत त्याने भारतातील बहुतांश मोठमोठ्या शहरातील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले. कोणाला नोकरीचे आमिष दाखवून, तर कधी मोठ्या राजकीय नेत्याचा पाहुणा असल्याच्या बात मारून त्याने आजपर्यंत शंभर लोकांना तरी टोपी घातली असेल आणि यामार्गाने त्याने पंच्याहत्तर कोटी रुपये कमवले आहेत. तिहार जेल मध्ये असतानाही त्याने अशाच पद्धतीने आपले रॅकेट चालवले होते. तेव्हाही त्याचे कारनामे उजेडात आले होते. काही दिवसांनी त्याला जमीन मिळाला आणि पुन्हा एकदा त्याने मगाचच कित्ता गिरवायला सुरुवात केली. आजचा लेख याच सुकेश चंद्रशेखरच्या जेलमध्ये राहून केलेल्या कमाईबद्दल आहे.
हा सुकेश पोलिसांच्या हाती लगत नव्हता. तो सापडला एआयएडीएमके पक्षाच्या निवडणूक चिन्हासंबधीच्या गुन्ह्यात. तेव्हा सुकेश चंद्रशेखरला अटक झाली होती आणि सध्या तो दिल्लीच्या रोहिणी तुरुंगाची हवा खातोय. पण विश्वास ठेवा, तुरुंगाच्या हवेने त्याच्या राहणीमानात उलट चार चांद लावले आहेत. तुरुंगात बसूनही सुकेशच्या संपत्तीत २०० कोटींची भर पडली आहे. याच संदर्भात इडीने त्याच्या बंगल्यावर छापे टाकले. या बंगल्यात इडी अधिकाऱ्यांना नेमके काय काय सापडले माहीत आहे?
सुकेशच्या ज्या बंगल्यावर इडीने छापा टाकला तो चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यालागतचा अतिशय पॉश बंगला आहे. या बंगल्याचीच किंमत दहा कोटींच्या घरात आहे. बंगल्याच्या आतील इंटेरिअर तर त्याहूनही सुंदर आणि तितकेच महाग आहे. या बंगल्यात आहे एक मिनी-बर, मिनी-थिएटर, जिम, पूल आणि सुंदर सजवलेले छत! या बंगल्यात इटालियन मार्बल फारशी बसवण्यात आली आहे आणि त्यावर जिथे तिथे 'वर्साचे' या अत्यंत महागड्या इटालियन ब्रांडचे अलिशान गालिचे अंथरलेले आहे. प्रत्येक रूममध्ये महागडे फर्निचर, डायनिंग रूममध्ये मोठा टेबल, लिव्हिंगरुममध्ये महागडा सोफा आणि जमिनीवर फरची रग!!
हे सगळे कमी की काय म्हणून या बंगल्यात कोट्यावधी रुपये किमतीच्या सुंदर मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. बंगल्याच्या भिंतीही सोनेरी रंगाच्या आहेत. सिलिंगमध्ये मंद प्रकाश पसरवणारे दिवे बसवण्यात आले आहेत. अनेक रुमच्या छताला मोठमोठे झुंबर लटकताना दिसतात. बेडरूममध्ये मोठा बेड आणि त्याच्या बाजूला ट्रेड मिल, स्टेशनरी सायकल, रोव्हर असे साहित्य ठेवलेले आढळते. समोरच्या भितींवर भला मोठा टीव्ही फिट कलेला आहे.
या बंगल्यात एक मिनी थिएटर आहे. तिथे पाच लोकांना बसण्यासाठी दोन अलिशान सोफे ठेवण्यात आले आहेत. एका सोफ्यावर दोन व्यक्ती आणि दुसऱ्या सोफ्यावर तीन व्यक्ती बसू शकतात. इथेच एक फ्रीजही आहे, त्यात काही खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत. बंगल्याच्या अंगणात एक मोठी झोपडीवजा रचनाही उभारण्यात आली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला मोठा स्विमिंग पूल आहे.
बंगल्यासमोर मोठे लांबलचक अंगण आहे आणि या अंगणात अलिशान गाड्यांचा ताफा दिसतो. यात लँबोर्गिनी, पोर्शा, रोल्स रॉईस, फेरारी, बेन्टले, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि लँडरोव्हर सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. अशा सोळा गाड्या इथे उभ्या आहेत. शंभरहून अधिक बुटांचे आणि कपड्यांचे जोड, तेही अगदी महागड्या ब्रँडचे. यातही फेरागॅमो, शनेल, डीओर, लुई व्हिताँसारखे महागडे ब्रँड, अशाच ब्रँडेड बॅग्ज, असे सगळे साहित्य बंगल्यात इतस्तत: विखुरले होते. मिनी बारमध्येही उंची मद्याच्या बाटल्यांची रांग लावण्यात आली होती
इतकी सगळी बेनामी संपत्ती सुकेश चंद्रशेखरने ‘आत’ बसून जमा केली आहे. त्याला हे कसे शक्य झाले हाच मोठा प्रश्न आहे. या सगळ्यात त्याला नक्कीच जेलमधील अधिकाऱ्यांची मदत मिळाली असणार. त्याशिवाय तो एवढे मोठे साम्राज्य उभारुच शकत नाही असे खुद्द इडीचेच अधिकारी म्हणतात. यासाठी तो मोबाईल फोन आणि सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत होता. आपल्या सावजांना तो आत बसून ब्लॅकमेल करत होता. लोकांना वाटत होते की त्यांना सरकारी अधिकाऱ्यांचेच फोन येत आहेत, आपल्या काळ्या कृत्यांवर झाकण घालण्याच्या प्रयत्नात हे सगळे सावज सुकेशच्या जाळ्यात अडकत गेले आणि आत बसूनही सुकेश आपले काम निर्धोकपणे करत राहिला. यासाठी त्याने खूप मोठी यंत्रणा कामाला लावली होती. आपल्या वाटेत कसलेही अडथळे येणार नाहीत याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती. शिवाय आरबीएल बँकेच्या उपाध्यक्षा कोमल पोद्दारसारख्या लोकांच्या मदतीने त्याने आपला पैसा वेगवेगळ्या बँकेत ठेवला. ज्यामुळे त्याला पैसा लपवण्यातही मदत मिळाली.
मात्र कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टीला अंत असतोच, आणि इथेही तेच घडले. कुणीतरी इडीला सुकेश विरोधात टीप दिली आणि इडीला सुकेशच्या सगळ्या कारनाम्यांची माहिती मिळाली. एका व्यावसायिकाला त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्याने सरकारी अधिकारी बोलत असल्याचे सोंग करून, त्या व्यावसायिकाच्या बायकोकडे लाच मागितली आणि इथेच सुकेश इडी अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला.
सुरुवातीच्या काही फोनला बळी पडून त्या महिलेने अनेकदा सुकेशला पैसे दिले, पण सुकेशची हाव काही संपत नव्हती. तेव्हा तिने पोलिसात फिर्याद दिली. या महिलेने तब्बल ३५ वेळा सुकेशला मोठी रक्कम दिल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. सुकेशचे कॉल ट्रॅक करण्यातही पोलिसांना अडचणी येत होत्या, पण त्याचे काही कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करणे सोपे गेले.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हेगारी विभागाने सुकेशविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याच्या विरोधात पुरावा शोधत आहेत. याकामात सुकेशला मदत करणाऱ्या रोहिणी जेलच्या अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुकेशला मदत करणाऱ्या कोमल पोद्दारच्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यात ८२.५ लाखांची रोकड आणि दोन किलो सोने सापडले आहे. सुकेशची प्रेयसी लीना मारिया पॉल हिचीही पोलीस कसून चौकशी करत असून तिच्याही बंगल्यावर इडीने छापा टाकला आहे.
तुरुंगात बसूनही गुन्हेगार आपले काळे धंदे सुखरूपपणे चालवू शकतात, याचे हे काही पहिलेच उदाहरण आहे असे नाही. याआधीही अशा कित्येक घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच दिल्लीच्या मंडोली जेलमधील काही कैदी पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या कैद्यापर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तू आणि महागडे मोबाईल कसे पोहोचतात यावरूनही आधी बरेच रणकंदन माजले आहे.
सोशल मिडिया सामान्य लोकांसाठी जसा उपयोगी ठरत आहे तसाच तो गुन्हेगारांनाही उपयोगी ठरत आहे. सोशल मिडिया हेच या गुन्हेगारांसाठी एक हत्यार बनले आहे. सोशल मिडियामुळेच हे लोक आत बसूनही चांगली कमाई करत आहेत. पण सगळ्यात मोठा भाग तर त्यांना मदत करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे ज्यांच्यामुळे त्यांची मनमर्जी चालत राहते.
आत असो की बाहेर, भ्रष्ट अधिकाऱ्यामुळेच या गुन्हेगारांना अभय प्राप्त होते आणि ते आपला काळा धंदा अधिक जोमाने सुरु ठेवतात. हे असेच चालत राहिले तर कोणाही गुन्हेगाराला जेलची आणि न्यायालयीन शिक्षेची भीती वाटेल का? तुम्हीच सांगा.
मेघश्री श्रेष्ठी




