पाकिस्तानचे बिनबुडाचे आरोप आणि "बोल ना आंटीआऊ क्या" गायक ओमप्रकाश मिश्रा!! नक्की काय प्रकरण आहे?
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. पण सुरक्षेच्या कारणावरून पूर्ण संघ एकही सामना न खेळता परत आला. यावरून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. जगभर या विषयावरून हसे झाल्यामुळे हा विषय त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. रोजच्या त्यांच्याकडून या विषयावर आरोप सुरू आहेत.
पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ज्या इ-मेलवरून न्यूझीलंडचा संघ परत गेला तो मेल मुंबईतून पाठवण्यात आला होता असा आरोप केला आहे. काही विपरित घडले की भारतावर आरोप करायचा ही त्यांची जुनी खोड असली तरी खरी बातमी पुढे आहे.
या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्तीलच्या बायकोला एक मेल गेला होता. त्या इमेलमध्ये म्हटले होते की तुझा नवरा पाकिस्तानात मारला जाईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला अजून एक मेल गेला ज्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंना बॉम्बने उडविण्यात येईल असे म्हटले होते.
पत्रकार परिषदेच्या शेवटी ते म्हणाले की, ज्या मेलने न्यूझीलंड क्रिकेट टीमला घाबरून सोडले तो मेल एका अशा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसने आला होता ज्यात हिंदी नाव होते. पुढे त्यांनी आरोप केला की मुंबईतील कोणी ओम प्रकाश मिश्रा यांनी हे धमक्यांचे मेल पाठवले होते.
आता ओम प्रकाश मिश्रा हे नाव 'बोल ना आंटी फेम आऊ क्या' फेम गायकाचे आहे. यावर त्या पाकिस्तानी मंत्र्याला मात्र भन्नाट पद्धतीने ट्रोल केले गेले आहे. पोरं त्या गाण्याची लिंक पाकिस्तानी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल अकाउंटवर शेअर करून त्यांची मजा घेत आहेत. त्या ओम प्रकाश मिश्राचे मात्र फुकटात व्ह्यूज वाढत आहेत.
पाकिस्तानच्या या बिनबुडाच्या आरोपांवर भारताने जोरदार उत्तर दिले आहे. स्वतःच्या देशात गोष्टी सांभाळता आल्या नाहीत की भारतावर आरोप करणे हे पाकिस्तानचे नेहमीचे आहे. जगात पाकिस्तानची जी प्रतिमा आहे ती का झाली याचा विचार पाकिस्तानने करावा असा टोला पण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी लगावला आहे.
उदय पाटील




