computer

एका वर्षाचे बाळ जगभर फिरुन महिन्याला ७५,०००रुपये कमावते!! कसे??

एक वर्षाचे बाळ काय करते? असा प्रश्न कोणी विचारला तर हसूच येईल. एवढंसं ते बाळ!! खाणार, खेळणार, लंगोटी-दुपटी भिजवणार आणि झोपणार!! आणखी काय करणार. हो ना? पण अमेरिकेत एक वर्षाचं बाळ चक्क कमाई करत आहे. आणि तीही थोडीथोडकी नव्हे, तर चक्क १००० डॉलर्स म्हणजे ७५,००० रुपये! चकित झालात ना? ब्रिग्स डॅरिंग्टन असे त्या एक वर्षाच्या बाळाचे नाव आहे. तो आपल्या पालकांसोबत अमेरिकेत फिरून फोटो आणि व्हिडीओ ब्लॉग करून महिन्याला बक्कळ कमाई करतेय. सर्वात लहान वयातील कमाई करणारा हा बाळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय.

ब्रिग्स डॅरिंग्टन तीन आठवड्यांचा असल्यापासून अमेरिका प्रवास करत आहे. त्याच्या पालकांसोबत फिरत त्याने आतापर्यंत ४५ उड्डाणे केली आहेत. तो फक्त नऊ आठवड्यांचा असताना त्याने पहिला विमानप्रवास केला. ब्रिग्सचा जन्म १४ ऑक्टोबर २०२० ला झाला आहे. ब्रिग्स फक्त तीन आठवड्यांचा असताना त्याच्या आईबाबाने पहिली सहल नेब्रास्कामधल्या एका ग्लॅम्पिंग साइटवर केली. आतापर्यंत त्याने अमेरिकेतल्या १६ राज्यांना भेट दिली आहे.

या सहलींत त्याने अलास्काची सफर केली आहे, यलोस्टोन नॅशनल पार्कातली अस्वले, लांडगे आणि अनेक प्राणी पाहिले आहेत. कॅलिफोर्नियामधले अनेक समुद्रकिनारे तो फिरला आहे. त्याची आई जेस अनेक वर्षांपासून पार्ट टाइम टूरिस्ट नावाचा ब्लॉग चालवत आहे. प्रेग्नंट झाल्यानंतर तिला वाटले तिचे करियर संपले. पण तिचा नवऱ्याने तिला प्रोत्साहन दिले. बाळासोबत आपण प्रवास करू शकतो यासाठी तयारी करायला सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर त्यासाठी शोध सुरू केला. बाळाबरोबर प्रवास करायचा असेल तर कशी तयारी करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचा अभ्यास सुरू केला. पण त्यांना फारशी माहिती मिळाली नाही. तेव्हाच जेसने बाळासोबत प्रवास करण्याबद्दल शिकलेल्या प्रत्येक गोष्टी शेअर करण्यासाठी, इतर पहिल्यांदा पालकांना मदत करण्यासाठी सोशल मीडिया खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला. ब्रिग्सचा जन्म झाल्यावर काही महिन्यांनी लॉकडाउन आला. मग तो थांबल्यावर त्यांनी रस्त्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आधी छोटे प्रवास सुरु केले. गर्दीची ठिकाणं टाळली. ब्रिग्सबरोबर सगळ्यात मोठा प्रवास सलग आठ तासांचा विमान प्रवास उटा ते हवाई होता. त्यात बाळासोबत प्रवास करणे खरंच अवघड होते. पण त्यांनी पूर्ण काळजी घेऊन प्रवास केला.

आता हे प्रवास ब्रिग्सला सवयीचे झाले आहेत. नवनवीन ठिकाणे शोधून काढून तिथे राहणे त्यांना आवडते. जेस म्हणते या वयात पाहिलेले त्याला आठवणार नाही पण मुलांच्या विकासासाठी भिन्न लोक, तिथली वेगळी संस्कृती, वातावरण, वेगवेगळी ठिकाणी फिरणे महत्वाचे असते. मुलं खूप लवकर त्याला ऍडजस्ट करतात. पुढील सहा महिन्यांत हे कुटुंब युरोपच्या सहलीचे नियोजन करत आहे. त्यांच्या सोशल आकाउंट whereisbriggs ला ३०.६k फॉलोअर्स आहेत. त्यांच्याकडे एक प्रायोजक देखील आहे, जो विनामूल्य डायपर आणि वाइप्स देतो.

 

ब्रिग्सचे फोटो, व्हिडीओ पाहिले तर नक्कीच त्याला फॉलो केल्याशिवाय कोणी पुढे जाणार नाही.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required