खाकीतले कलाकार आणि त्यांचा खाकी स्टुडिओ बँड!! त्यांची किती गाणी ऐकली आहेत?
आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात. मागच्या महिन्यात मनी हाईस्टचा पाचवा सीझन रिलीज झाला होता तेव्हा त्याची क्रेझ लक्षात घेऊन खाकी स्टुडिओ म्हणजे आपल्या मुंबई पोलिसांचा बँडने त्या गाण्यची ट्यून अनोख्या पद्धतीने वाजवून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या बँडचे इतके कौतुक झाले की पुढचे गाणे कोणते येणार आहे याबद्दल उत्सुकता वाढली. अश्यातच त्यांचे नवीन गाणे आले असून ते गाणेही व्हायरल होत असताना दिसत आहे. काय आहे हा खाकी स्टुडिओ? कधी सुरू झाला याविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत.
मागच्या वर्षी कोरोनाचा कहर होता, लॉकडाऊनमुळे पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी होती. इतका ताण होता की काही क्षण उसंत किंवा ताणमुक्तीसाठी असं काही क्रिएटिव्ह करावं असा विचार झाला. संगीतासारखा उपाय नक्कीच यासाठी मदत करेल म्हणून एक बँड सुरू करायची अभिनव कल्पना पोलिसांनी केली. एक प्रयोग म्हणून पाहिले जेम्स बाँडची थीम वाजवली गेली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर दर सोमवारी नवे गाणे वाजवायचे ठरले. आता या बँडमध्ये ५० वादक आहेत. या वादकांना निवडले आहे. यांना पोलिसांचे प्राथमिक प्रशिक्षण देऊन मग बँडसाठी उपलब्ध राहायचे आहे. Duty first हा नियम यांनाही लागू आहे.
पोलिसांचा बँड ही संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. नायगाव पोलिसांनी १९३६ मध्ये वार्षिक महोत्सवात पहिला परफॉर्मन्स दिला होता. C.R. Gardener हे तेव्हा बँड मास्टर होते. १५ ऑगस्ट २६ जानेवारीला हे सादरीकरण व्हायचे. खाकी स्टुडिओ सुरू करायला ३ महिने लागले. जेम्स बॉन्ड थीम’ नंतर त्यांनी ए.आर.रहमान याचे ‘जय हो’ गाणे त्यांनी सादर केले. त्यानंतर त्यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत सादर केले. तेही खूप गाजले.
नुकतेच त्यांनी आराधना या चित्रपटातले राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित 'मेरे सपनों की रानी " हे गाणे सादर केले आहे. हे गाणे आल्यापासून सोशल मीडियावर एकच धूम उडवली आहे. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होता आहे. तुम्ही ही एकदा पाहूनच घ्या. अनेकांनी हे गाणे आवडल्याचे आवर्जून सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या या संगीतमय कल्पकतेचे कौतुक व्हायलाच पाहिजे.
शीतल दरंदळे




