मेक्सिकोतल्या गँगवॉरमध्ये हकनाक बळी गेलेली अंजली रयोत कोण होती?
आयुष्याचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. एखाद्या वेळी अशी घटना घडते जेव्हा माणसाची चूक नसताना त्याचा नाहक बळी जातो. मेक्सिको येथे एका भारतीय ब्लॉगर महिलेला ड्रग गँगवारमध्ये जीव गमवावा लागला आहे.
अंजली रयोत असे या २९ वर्षांच्या ब्लॉगरचे नाव आहे. अंजली लिंक्डइनसारख्या मोठ्या कंपनीत काम करत होती. ती कॅलिफोर्निया येथील सॅन होजेला राहत असे. तुलूम नावाच्या एका रिसॉर्टवर ही घटना घडली आहे. अंजली तिचा नवरा उत्कर्ष श्रीवास्तव सोबत आपला ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. मूळच्या हिमाचल प्रदेशातल्या अंजलीने धर्मशाला इथे आपले शिक्षण पूर्ण केले होते. कॅलीफोर्नियाला आपले मास्टर्स पूर्ण करण्यासाठी गेली असताना तिथे तिला करियरची चांगली संधी मिळाल्याने ती तिथेच स्थायिक झाली होती.
गेल्याच वर्षी लॉकडाऊन असताना अंजली ३-४ महिने आपल्या आईवडिलांकडे राहत होती. तिला ट्रॅव्हल ब्लॉगिंगची आवड होती. तिचे वडील हिमाचलच्या पशुसंवर्धन विभागात संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत.
अंजलीसोबत एक जर्मन महिला जेनिफर हानझोल्ड हिचा पण यात मृत्यू झाला आहे. तेथील महापौरांनी स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे की अंजली आणि दुसऱ्या महिलेचे या लोकांसोबत काहीही संबंध नसताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यात एकाला अटक झाली आहे.
मेक्सिकन पत्रकार सिरो लेयवा यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. बऱ्याच सिनेमात दाखवले जाते त्याप्रमाणे दोन गटांच्या दुष्मनीमुळे त्यांच्यात गोळीबार होतो आणि निष्पाप लोक मृत्यू पावतात अगदी तशीच घटना खरोखर घडून एका कर्तृत्ववान मुलीचा यात जीव गेला आहे.
उदय पाटील




