१० वर्षांच्या भारतीय मुलाने इंटरनॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत पहिला नंबर मिळवलाय, सोबत इतर विजयी फोटोही पाहा!!
लंडनमधील प्रसिद्ध नैसर्गिक इतिहास संग्रहालयातर्फे दरवर्षी 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफी स्पर्धा' आयोजित केली जाते. ही एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा आहे. भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षी ही स्पर्धा १० वर्षांच्या विद्युन हेब्बर या मुलाने जिंकली आहे. त्याने काढलेल्या फोटोला लहान मुलांच्या गटात पहिले पारितोषिक मिळाले आहे. ही जगातील सर्वात जुनी म्हणजे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ चालवली जाणारी फोटोग्राफी स्पर्धा आहे. मंगळवारी यातील विजेत्यांची घोषणा केली गेली.
या स्पर्धेसाठी तब्बल ९५ देशांमधून ५०,००० हून अधिक फोटोज् आले होते. भारताचा बंगळुरूमध्ये राहणारा विद्युन हा पाचवी इयत्तेतला विद्यार्थी आहे. यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जिंकल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने वयाच्या तीन वर्षापासून फोटो काढण्यास सुरुवात केली होती. घरात असताना ही तो अगदी लहान लहान प्राणी, कीटक, पक्ष्यांचे फोटो काढतो.
विद्युनच्या या पहिल्या क्रमांकाच्या फोटोत एक कोळी टुक-टुकमधून जाताना दिसतो. विद्युंनने हा फोटो स्थानिक थीम पार्कमध्ये फिरताना घेतला. तिथे त्याला एका मोकळ्या जागेत एक कोळ्याचे मोठे जाळे दिसले. त्या कोळ्याने डोम आकाराचे जाळे विणले होते जेणेकरून त्यात अडकलेला किडा सुटणार नाही. त्या फोटोत इंद्रधनुष्य रंगांची पार्श्वभूमीही खूप सुंदरपणे टिपली गेली आहे.
इतर विजेत्या फोटोंत ऑस्ट्रेलियन ॲडम ओसवेलने त्याच्या हत्ती बंद असलेल्या खोलीच्या फोटोने जर्नलिझम विभाग जिंकला. हा फोटो थायलंडमध्ये बंदिवासात असलेल्या हत्तींची समस्या वेधून घेतो. थायलंडमध्ये आता जंगलांमधल्या हत्तींच्या संख्येपेक्षा अधिक हत्ती कैदेत आहेत. या शॉटमध्ये थाई प्राणीसंग्रहालयात एक हत्तीचे पिल्लू पाण्याखाली खेळताना दाखवले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेंट स्टिर्टनने अनाथ चिंपांझींची काळजी घेणाऱ्या पुनर्वसन केंद्राच्या फोटोने "फोटो जर्नलिझम स्टोरी अवॉर्ड" जिंकला. फ्रान्सच्या लॉरेंट बॅलेस्टा यांना 2021 चा वन्यजीव छायाचित्रकार म्हणून निवडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन गिलिगनने समुद्री रेंजरचे प्रतिबिंब टिपलं आहे. फोटोत जस्टिनला हे दाखवायचे होते की मानवी व्यवस्थापन किती सावधगिरी बाळगण्यास मदत करते. ऑस्ट्रेलियन डग गिम्से त्याच्या फोटोत ( ए डेडली हडल) मेलबर्नमध्ये उष्णतेच्या लाटेत थंड राहण्याचा प्रयत्न करत असलेले कोल्हे दाखवतो.
असे अनेक फोटो विविध कॅटेगरीत निवडले गेले आहेत. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा असल्याने फोटोग्राफी खूप सोपी वाटते. पण हे असे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की ही सुद्धा एक कला आहे. अचूक वेळेत,विशिष्ट कोनात, प्रकाश वापरून फोटो काढले जातात तेव्हा ते अधिक परिणामकारक ठरतात. विद्युनने लहान वयात ही कला अवगत केली आहे. त्याचे खूप अभिनंदन!
शीतल दरंदळे




