प्रेमासाठी सर्वस्व त्याग करण्याची परंपरा जिवंत राखणारे जपानी युगुल !
आपण सर्वांनी गरीबाघरची मुलगी श्रीमंत मुलाच्या घरी लग्न करून जाते आणि मग त्या मुलीने कसं चांगलं घर मिळवलं याची चर्चा होते अशा अनेक प्रेमविवाहाच्या कथा ऐकल्या असतील. आर्थिक स्तरामध्ये खूप मोठा फरक असलेले दोन प्रेमी जीव आणि त्यांचा विवाह यावर अनेक चित्रपटही बेतलेले असतात. पण आज आम्ही अशी कथा घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एका राजकन्येने प्रेमासाठी चक्क आपले राजघराणे सोडले आहे. आणि ही काल्पनिक कथा नाही, तर जपानची राजकन्या माको हीची सत्यकथा आहे.
प्रेमासाठी लोक आपली संपत्ती-प्रसिद्धी, प्रतिष्ठा, घर-परिवार हे सर्व सोडून देतात. जपानच्या राजकुमारी माकोनेही असेच काही केले. माको ही जपानचे सम्राट अकिहितो यांची नात आहे. माकोने तिचा वर्गमित्र केई कोमुरोसोबत लग्न केले आहे. मंगळवारी सर्वसामान्य कुटुंबातील केईबरोबर लग्न करून तिने शाही दर्जाचा त्याग केला आणि घराण्याचे आडनावही सोडून दिले आहे.
जपानच्या शतकानुशतके जुन्या प्रथेनुसार, राजघराण्यातील सदस्य आणि सामान्य व्यक्ती यांच्यात विवाह तेव्हाच होऊ शकतो जेव्हा राजघराण्याचा सदस्य आपला सर्व शाही दर्जा, संपत्ती सोडून देतो.
मंगळवारी वधूच्या वेशात ती राजवाड्यातून बाहेर पडली, पण एक राजकुमारी म्हणून हा तिच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग होता. त्यापूर्वी ती पिता अकिशिनो, आई किको आणि बहीण काको यांना भेटली.
राजकुमारी माको आणि केई कोमिरो हे टोकियोतील इंटरनॅशनल ख्रिश्चन विद्यापीठात एकाच वर्गात शिकत होते. दोघांमधील प्रेम याच काळात फुलले. २०१७ मध्येच तिने वर्गमित्र केई कोमुरोसोबत लग्नाची घोषणा केली होती. पण कोमुरोच्या आईसोबत काही आर्थिक वाद सुरू होते, त्यामुळे या जोडप्याने लग्न केले नाही. तेव्हा हा लग्नसोहळाच रद्द करावा लागला होता. तेव्हापासून या दोघांच्याही वाट्याला मनस्ताप आणि मानहानी आली. कोमरो २०१८ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता, तो मागच्याच महिन्यात जपानला परत आला. त्याने अमेरिकेत लॉ फर्ममध्ये नोकरीही सुरू केली आहे. माकोने art museum and gallery studies मध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे. तसेच तिला पाच वर्षांचा अनुभवही आहे.
माकोला या निर्णयामुळे बरीच टोकाची टीका ऐकावी लागली होती. तिसावा वाढदिवस झाल्यावर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही जपानी जनतेने यासाठी विरोध केला, पण प्रेमासाठी तिने आपला निर्णय अजिबात बदलला नाही.
तिने फक्त शाही घराणे सोडले नाही, तर १५० दशलक्ष येन (सुमारे 9,99,22,472 कोटी रुपये) ही विवाहप्रसंगी दिली जाणारी हुंड्याची रक्कम ही स्वीकारण्यास नकार दिला. या जोडप्याचा विवाह कोणत्याही पारंपरिक विधींशिवाय पार पाडला. माको हिने आपल्या विवाहाची कागदपत्रे राजघराण्याच्या अधिकारांच्या स्वाधीन केली आणि त्यानंतर विवाहाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नवे जोडपे माको आणि कोमुरो आता अमेरिकेत स्थायिक होणार आहेत. प्रेमासाठी कोणत्याही त्यागाला तयार असलेली आधुनिक जगातील ही अनोखी प्रेमकहाणी ठरली आहे.
शीतल दरंदळे




