मज्जा आहे बॉ सरकारी कर्मचार्यांची ! महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३१ टक्के झाला !
दिवाळीच्या बरोबर आधी महागाई भत्त्यात वाढ करून सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे बक्षिस दिले आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या सुधारणेसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ३१ टक्के झालेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईची झळ कमीतकमी बसावी यासाठी हा महागाई भत्ता दिला जातो. कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारासोबत इतरही अनेक सुविधा मिळतात. मेडिकल भत्ता आणि इतर सुविधा असतात त्यातच महागाई भत्त्याचाही समावेश होतो.
महागाई भत्ता हा पगाराच्या काही टक्के दिला जातो. रोजच्या रोज वाढणारी महागाई आणि बदलणारे राहणीमान यांचा विचार करून हा महागाई भत्ता ठरतो. ग्रामीण भाग आणि शहरी भाग यात राहणीमान आणि खर्चात मोठा फरक होतो. या सर्व कारणांचा विचार करून पगाराव्यतिरिक्त महागाई भत्ता देण्यात येतो. याची टक्केवारी सरकारकडून कमी जास्त केली जाते.
महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा ठरवण्यात येतो. एक म्हणजे जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात. महागाई भत्ता सिपीआय म्हणजेच कंज्युमर प्राईस इंडेक्सनुसार दिला जातो. सिपीआय हा देशातील वस्तूंच्या भूतकाळातील आणि सध्याच्या किमती यांचे गणित करून देशातील महागाई ठरविण्याचा निर्देशांक आहे.
याच सिपीआयचे आकडे बघून दर सहा महिन्यांनी सरकार हे महागाई भत्त्याचे आकडे ठरवत असते. सरकारला आपत्ती काळात महागाई भत्ता स्थगित करण्याचा ही अधिकार असतो. आता हा महागाई भत्ता फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो अशातला भाग नाही, तो पेन्शनधारकांनाही दिला जातो. याला डिअरनेस रिलीफ म्हणजे डीआर असे म्हटले जाते.
सरकारने यावेळी चांगलीच वाढ महागाई भत्त्यात केली आहे. २८ टक्क्यांवरूनहा भत्ता आता ३ टक्के वाढवत ३१ टक्के केला आहे. याआधी १८ टक्क्यांवरून ही वाढ २८ टक्के झाली होती. गेल्या तीन वेळेपासून कोरोना संकटामुळे हे सर्व स्थगित करण्यात आले होते. पण जुलैपासून महागाई भत्ता पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून महागाई भत्ता दिला जाणार आहे. तर ३ महिन्यांचे म्हणजेच जुलै, ऑगस्ट सप्टेंबर एरियर्सही दिले जाणार आहे. दिवाळीआधीच हा भत्ता मिळण्याची शक्यता असल्याने सरकारी नोकरदारांची दिवाळी चांगली जाणार आहे. आता याचे नेमके गणित काय आहे तेही समजून घेऊया.
समजा एखाद्याचा पगार २० हजार असेल तर त्याला ३ टक्क्यांच्या हिशोबाने ६०० रुपये अधिक मिळतील. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कॅल्क्युलेशन फॉर्म्युला हा पुढीलप्रमाणे असतो. गेल्या वर्षभरापासूनचा सिपीआयची सरासरी -११५.७६)/११५.७६]×१००. तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांचा विचार केला तर त्यांचे कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला हा गेल्या तीन महिन्यांचा सिपीआयची सरासरी बेस इयर २००१=१००)-१२६.३३))×१०० आहे.
आता ज्या १८ महिन्यासाठी महागाई भत्ता रोखण्यात आला होता तो मिळेल का यावर चर्चा सुरू आहे, पण तो मिळण्याची शक्यता नाहीच. कारण सरकारने आधीच तसे स्पष्ट केले आहे. चला तर मग, किती भत्ता मिळेल याचं गणित करा आणि दिवाळीत त्याचीही खास पार्टी करा..
उदय पाटील




