प्रियांका चोप्राचा मराठी 'व्हेंटिलेटर' टीझर्स:आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर!
प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स प्रोडक्शन' कडून 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाची निर्मिती होतेय. चित्रपटाचा ट्रेलर अजून लॉन्च झालेला नसला तरी दोन टीझर मात्र बरेच मजेदार आहेत. त्यावरूनतरी हा 'वेंटीलेटर' एक कॉमेडी चित्रपट आहे असा अंदाज बांधता येतोय. विशेष म्हणजे दोन्ही टीझरमध्ये एक फेमस चेहरा दिसतोय आणि तो म्हणजे प्रख्यात फिल्म डिरेक्टर 'आशुतोष गोवारीकर' यांचा..
पहिल्या टीझरमध्ये दिसतंय की कोणीतरी 'गजानन काका' सिरीयस आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. यात प्रत्येकजण एकमेकाला गजानन काका सिरियस असल्याचं सांगताना दिसतोय. तर दुसर्या टीझरमध्ये पूर्णपणे 'राजा भाऊ' (आशुतोष गोवारीकर) दिसतो. हॉस्पिटल मधली गंभीरता, काळजी विसरून प्रत्येकजण फिल्म्स बनवणाऱ्या राजा भाऊच्या मागे लागलेत.
सरकारनामानंतर आशुतोष पहिल्यांदाच पुन्हा एकदा पडद्यावर दिसतोय. सलीम लंगडे पे मत रो, वजीर, कभी हां कभी ना आणि चमत्कार या सिनेमांमधून आशुतोष या आधी वेगवेगळ्या रोल्समध्ये दिसला आहे. चमत्कार आणि तत्सम सिनेमांत त्याला फारसा काही अभिनय करायला वाव नसला तरी त्याच्या वजीर आणि सरकारनामाने तो एक चांगला अभिनेता आहे हे दाखवून दिलंय. या व्हेंटिलेटरच्या टीझरमध्येही आशुतोषचा अभिनय अत्यंत नैसर्गिक दिसतोय. या चित्रपटात आशुतोषव्यतिरिक्त जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, राहूल सोलापूरे, सुकन्या कुलकर्णी, विजू खोटे असे चक्क थोडेथोडके नव्हे ११६ मराठी कलाकार आहेत.




