computer

भारतात एक सैनिक म्हणून आलेला रॉबर्ट क्लाईव्ह परत जाताना अतिश्रीमंत होता. मग त्याने आत्महत्या का केली?

भारतात इंग्लिश सत्ता आपले पाय रोवू शकली, यामागे काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न इतिहासात नोंद झालेले आहेत. या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ईस्ट इंडिया कंपनी भारतात मजबूत करण्याचे काम केले. यातलाच एक महत्वाचा अधिकारी म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह!!! भारतात एक सैनिक म्हणून आलेला क्लाइव्ह भारतातून परत गेला तेव्हा युरोपातल्या काही सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता. तरीही त्याने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. या क्लाइव्हची कहाणी मोठी रंजक आहे.

 

 

१७४४ साली ईस्ट इंडीया कंपनीसाठी रॉबर्ट क्लाईव्ह भारतात आला. त्याकाळी भारतात बस्तान बसविण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये स्पर्धा होती. मद्रासला झालेल्या युद्धात फ्रान्स विरुद्ध ब्रिटनची हार झाली. यात मात्र क्लाइव्हची कामगिरी कंपनीच्या नजरेत भरली. क्लाइव्ह आता लेफ्टनंट कर्नल झाला होता. ब्रिटनच्या 'फोडा आणि राज्य करा' नीतीचा खुबीने वापर करणारा हा अधिकारी होता.

 

१७५६ साली त्याने बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा सेनापती मीर जाफरला स्वतःच्या बाजूने केले. प्रसिद्ध अशी प्लासीची लढाई एकतर्फी झाली. कारण सेनापती आपले सैन्य घेऊन ब्रिटनच्या सैन्याला जाऊन मिळाला. आता मीर जाफर नवाब झाला. बंगालसारखा श्रीमंत आणि प्रचंड मोठा प्रदेश कंपनीच्या ताब्यात आला होता. यामुळे ब्रिटनची पाळेमुळे इथे घट्ट झाली.

तो काळ असा होता की बंगाल व्यापाराचे मोठे केंद्र होते. पण अन्यायकारक कायदे करून ब्रिटनने बंगालला दरिद्री केले. या कायद्यांचा थेट फायदा ईस्ट इंडिया कंपनीला होऊ लागला. बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. पण दुष्काळ असूनही ब्रिटनचे बंगाल शोषण मात्र थांबले नाही. या दुष्काळात मोठ्या प्रमाणावर जनता मृत्युमुखी पडली. यात क्लाइव्हच्या अन्यायी नीतीचा वाटा मोठा होता.

या

 शोषणाने सर्वात जास्त श्रीमंत झाले ते अधिकारी!! त्यात क्लाइव्हचा वाटा मोठा होता. क्लाइव्हने भारतात प्रचंड भ्रष्टाचार केला. महाग वस्तू इथून घेऊन तो इंग्लंडला परत गेला. त्याकाळी त्याची संपत्ती ही दोन कोटी होती. भारतात केलेल्या भ्रष्टाचारामुळे तो युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला होता. मायदेशी परतल्यावर त्याची संपत्ती अनेकांना खटकत होती. त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्यावर खटलाही चालवला गेला, पण पैसा आणि ओळख वापरून तो निर्दोष सुटला.

क्लाइव्ह निर्दोष सुटला असला तरी देशात त्याला मान राहिला नाही. त्याच्याकडे भ्रष्ट व्यक्ती म्हणजे बघितले जाऊ लागले. ब्रिटिश संसदेचा सदस्य असूनही त्याला सहन कराव्या लागणाऱ्या अपमानाने तो प्रचंड व्यथित होत असे. यातच १७७४ साली त्याने एका चाकूने स्वतःचा जीव घेतला.

क्लाइव्ह हा मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरला होता. प्लासीच्या लढाईत क्लाइव्हने मीर जाफरला फितूर केले नसते तर भारताचे चित्र वेगळे असते असे बोलले जाते. इतके असूनही क्लाइव्ह मात्र सुखासुखी जगू शकला नाही हेच खरे....

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required