दिवाळीत सोन्याचांदीचा फराळ !!!! २४ कॅरेट गोल्ड कँडी
अवधचा शेवटचा नबाब वाजीद अली शाह हा खाण्यापिण्याचा षौकीन नबाब म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे. वाजीद अली शाहच्या खाण्याच्या षौकाबद्दल अनेक कथा आहेत. त्यापैकी एक अशी की, त्याच्या डाळीत म्हणजे वरणात सोन्याच्या मोहरा टाकल्या जायच्या. मोहरांमधलं सोनं अन्नात मिसळून तारुण्य जन्मभर टिकून राहील असा त्याचा समज होता. हा समज तूर्तास बाजूला ठेवू या. त्याला सोन्याच्या मोहरांची डाळ परवडत होती हेच खरे !!!
पण हा षौक तुम्हाला जर पुरवायचा असेल तर या वर्षी दिवाळीत तो पूर्ण करता येईल. नॉर्डीक कँडी या कंपनीनं चक्क २४ कॅरेट सोन्यानं मढवलेली मिठाई बाजारात आणली आहे. या गोलमटोल कँडीत सारण आहे ममरा बदामाचं,त्यावर आवरण आहे बेल्जी अन चॉ़कलेटचं आणि या गोलगप्प्याला गुंडाळलंय २४ कॅरेट सोन्याच्या वर्खात!! हा वर्ख खाण्यायोग्य सोन्यापासून बनवला आहे आणि तो टीयुव्ही या आंतरराष्ट्रीय संस्थेनं प्रमाणित केला आहे. २२ ग्रॅम वजनाची ही नॉर्डीक २४ कॅरेट गोल्ड कँडी मात्र ५६४ रुपयात घरपोच केली जाणार आहे. थोडक्यात तीस हजार रुपये प्रती किलोची ही मिठाई आहे. जर बजेट कमी असेल तर १८ कॅरेट चांदीच्या वर्खाची कँडी पण उपलब्ध आहे. २२ ग्रॅम कँडीची किंमत आहे फक्त रुपये २८३. म्हणजे एका किलोला जवळजवळ १३००० रुपये! मग होऊं द्या या दिवाळीत सोन्याचांदीचा फराळ !!!!




