३० डायनामाईट लावून थेट टेस्ला कार उडवली. पण का?
एलन मस्क नावाचा माणूस किती अफाट आहे याच्या चर्चा सगळीकडे गेली काही वर्षे ऐकायला मिळत आहे. पैसे कमविण्यासाठी नाही, तर भविष्यातल्या आव्हानांचा विचार करून हा भाऊ नवे प्रोजेक्ट सुरू करतो असे म्हटले जाते. मंगळावर मानव वसवणे, ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार तयार करणे हे काही त्याचे गेल्या काही वर्षातील प्रोजेक्ट आहेत.
टेस्लाने बनविलेल्या इलेक्ट्रिक गाड्या सध्या सर्वात जास्त हवा करत आहेत. स्वत: एलनभाऊंची कंपनी असल्यावर फक्त नावावर गाड्या विकल्या जातात. पण या गाड्याही अधुनमधून लोकांना निराश करतात. टेस्लाच्या गाड्यांबद्दलही अनेक तक्रारी समोर येत असतात. ऑटो पायलट सेमी ऑटोमॅटिक ड्राइव्ह, सॉफ्टवेअरमध्ये गडबड अशा अनेक समस्या समोर येतात.
गाड्यांमध्ये अडचण आली तर थेट कंपनी शोरूमसोबत संपर्क करणे हा सर्वमान्य उपाय आहे. किंवा तिथे दाद मिळाली नाहीतर ट्विटरवर कंपनीच्या ऑफिशियल हँडलला टॅग करून तिथे तक्रार दाखल केल्यावर त्याची दाद घेतली जाते. आपल्या भारतात तर काही लोक महिंद्रा गाडीसंबंधी काही समस्या असेल तर आनंद महिंद्रा यांना टॅग करतात. ते देखील अशा तक्रारींना अनेकवेळा स्वतः उत्तरे देतात.
असे असले तरी काही पठ्ठ्यांचा रुबाब न्यारा असतो. मागे एकाने आपली महाग गाडी चांगली सर्व्हिस देत नाही म्हणून एकाने थेट गाडीसोबत गाढवाची मिरवणूक काढत निषेध नोंदवला होता.
त्याने नव्याकोऱ्या फोर्ड एंडेवरची गाढवासोबत धिंड का काढली? तुम्हाला हे कारण पटते का?
थॉमस कतैनन हा टेस्ला कारचा वापरकर्ता पण गाडी चांगली चालत नाही म्हणून नाराज होता.
भावाने थेट ३० किलो डायनामाईट लावून गाडीच उडवली. इतकी महाग गाडीचा काही सेकंदात धुरळा उडला. थॉमसचे म्हणणे आहे की ही टेस्ला कार काही दिवस चांगली चालली, पण नंतर गाडीच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये मल्टिपल एरर कोड्स येऊ लागले. गाडीला सर्व्हिस सेंटरपर्यन्त घेऊन जायला सुद्धा दोन ट्रक लावावे लागले.
आता सर्व्हिस सेंटरने २ महिने गाडीचा उपचार केल्यावर थॉमसला सांगितले की गाडीची बॅटरी बदलावी लागेल. बॅटरीचा खर्च होता तब्बल १७ लाख. वॉरंटी पिरियड पण संपलेला होता. थॉमसभाऊची आता पुरेपूर सटकली होती. त्याने संतापाच्या भरात अक्खी गाडीच उडवून लावली. तिथे एकाने हा सिन शूट करत यु ट्यूबवर अपलोड केला. हे सर्व बघून आता लोक प्रतिक्रिया देत आहेत, वा क्या सीन है!!!
उदय पाटील




