computer

पाण्यात वसवलेलं जगातलं पहिलं तरंगणारं शहर!! काय, कुठे आणि कसे असेल हे शहर?

हवामान बदलाचा परिणाम म्हणून आता समुद्रातील पाण्याचा स्तर वाढत आहे. चक्रीवादळ, त्सुनामी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, ढगफुटी, महापूर, वणवा असे हवामान बदलाचे गंभीर परिणाम आता संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. समुद्र किंवा नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस या सगळ्या समस्या तीव्र होत असताना यावर उपाय योजण्याचे प्रयत्नही तितक्याच वेगाने सुरू आहेत.

दक्षिण कोरियात पाण्यावर तरंगणारे शहर वसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०२५ पर्यंत तिथे पाण्यावर तरंगणारे हे शहर लोकांना राहण्यासाठी तयार असेल असा अंदाज आहे. पाण्यावर तरंगणारे हे शहर नेमके कसे असणार आहे, जाणून घेऊया या लेखातून.

दक्षिण कोरियाच्या बुसान किनाऱ्यावरील समुद्रात हे तरंगणारे शहर वसवले जात असून संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या प्रकारच्या शहराला मान्यता दिली आहे. समुद्रात वसलेले हे पहिलेच शहर असणार आहे. या शहरातील इमारतीचे बांधकाम अशा पद्धतीने केले जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्यावर पूर, त्सुनामी किंवा चक्रीवादळांचा काहीही परिणाम होणार नाही. या संकल्पित शहराचा पाण्यावरील पृष्ठभाग हा प्रोफॅब्रिकेटेड असणार आहे. पाण्याची पातळी जशी वाढेल तसा हा पृष्ठभाग पाण्यासोबतच वरती जाईल आणि पातळी कमी झाली की पाण्यासोबतच खाली येईल. फक्त १०,००० लोकांनाच राहण्यास हे शार अनुकूल असेल.

या तरंगणाऱ्या शहरात कृत्रिम बेटे वसवले जातील. या बेटांचा आकार षटकोनी असेल. ही छोटी छोटी बेटे एकमेकांना जोडली जातील जेणेकरून चलत किंवा सायकलने या बेटावरून त्या बेटावर ये-जा करता येईल. यातील एका बेटावर फक्त ३०० लोक राहू शकतात. या बेटावर बांधण्यात येणाऱ्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनेल बसवले जाणार आहेत. त्यामुळे इथे विजेची गरज भासणार नाही. इथे पिण्याचे पाणी आणि ताजे अन्नपदार्थ मिळण्याचीही सोय केली जाणार आहे. हे शहर पाण्यावर तरंगणार असले तरी समुद्राच्या तळाशी जोडलेले असणार आहे.

ओशयनॅक्स नावाच्या एक कंपनीने हे शहर वसवण्याचे कंत्राट घेतले आहे. समुद्राच्या कुठल्या भागात हे शहर वसवायचे यावर अजूनही चर्चा सुरू आहे. तसेच हे शहर पूर्ण झाल्यानंतर इथे राहायला येणाऱ्या नागरिकांची निवड कोणत्या निकषांवर करायची यावरही विचारविमर्श सुरू आहे.

या शहरनिर्मितीला एकूण २० कोटी डॉलर्स इतका खर्च येऊ शकतो असा अंदाज आहे. या शहरात राहायला येणाऱ्या लोकांकडून किती भाडे आकारायचे यावरही अजून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु या शहरात राहणाऱ्या नागरिकांना शक्यतो शाकाहारच अवलंबावा लागणार आहे असे दिसते. इथे जागेची आणि उर्जेची जितकी होईल तितकी बचत करावी लागणार आहे. समुद्रात शेती करण्यायोग्य जमीन तर मिळणार नाही, त्यामुळे इथे एअरोपोनिक किंवा ॲक्वापोनिक पद्धतीनेच शेती करावी लागणार आहे. बेटांलगतच्या समुद्री पाण्यात मत्स्यशेती केली जाऊ शक्लते. त्यामुळे लोकांना सी-फूडचा आस्वाद घेता येईल.

थोडक्यात, जमिनीवरील शहर आणि पाण्यातील शहर यामध्ये नक्कीच जमीन आसमानचा फरक असणार आहे.

अलीकडच्या काही वर्षांत आपल्या देशातही समुद्र किनाऱ्या लगतच्या प्रदेशात पुराचा आणि चक्रीवादळांचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने महापुराचा धोका वाढत आहे. दक्षिण कोरियाचे हे तरंगते शहर उभारण्याचा प्रयत्न जर यशस्वी झालाच तर अनेक देशांवर आणि त्यांच्या नागरिकांवर मोठे उपकार ठरतील असे वाटते. आपल्याही देशात अशाप्रकारचे प्रयोग केले जावेत असे तुम्हाला वाटते का?

मेघश्री श्रेष्ठी.

सबस्क्राईब करा

* indicates required