आणि पंतप्रधानांनी या जोडप्याच्या मुलीचं नाव वैभवी ठेवलं!!
खुद्द पंतप्रधानांनी आपल्या मुलीचं नाव ठेवावं ही उत्तरप्रदेशातल्या मिर्झापूर इथल्या एका दांपत्याची इच्छा नरेंद्र मोदींनी पूर्ण केलीय. मिर्झापूर जिल्ह्यातल्या ’नयापुरा-हसीपूर’ गावात रहाणारे भारत सिंह आणि त्यांची पत्नी विभा पंतप्रधान मोदींचे मोठे फॅन आहेत. फॅन्सच्या इच्छा-आकांक्षा काहीही असू शकतात. तर या जोडप्याची थेट मोदींनीच आपल्या मुलीचे नाव ठेवावं अशी इच्छा होती.
विभा आणि भारत सिंहांच्या मुलीचा जन्म १३ ऑगस्टला झाला. त्यानंतर विभा यांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून मुलीसाठी नाव सुचवण्याची विनंती केली. एक दिवस अचानक भारत सिंहांचा फोन खणखणला. तिकडून थेट मोदींचा आवाज!! "हॅलो, मी नरेंद्र मोदी बोलतोय. तुमची पत्नी विभा सिंह यांचं पत्र मिळालं. तुम्हांला शुभेच्छा! तुमच्या घरी मुलगी आली आहे, या मुलीचं नाव वैभवी ठेवा. यात आई आणि वडिल दोघांच्या नावाचा समावेश आहे" असं मोदींनी सांगितलं.
भारत सिंहना त्या वेळेस काय वाटलं असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. "या फोन कॉलनंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी जेव्हा शेजार्यांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. म्हणून मी पंतप्रधान कार्यालयाला तसं पत्र देण्याची विनंती केली." असे भारत सिंहांनी सांगितलं. अखेर ३० ऑगस्टला या दांम्पत्याला पंतप्रधानांचं पत्र मिळालं. त्यात "तुमच्या घरात मुलीचं आगमन झालं आहे. तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. वैभवीचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. वैभवी तुमची शक्ती बनेल." असा संदेश होता. सरकारच्या कोणत्याही गोष्टीत खुसपटं शोधून काढणं हे विरोधकांचं कामच असतं. मोदींना आज जितकी जगभर वाहवा मिळतेय तितकेच त्यांच्या प्रत्येक कृतीतून वाकडा अर्थ काढणारे लोकही आहेत. तेव्हा "उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या म्हणून मोदींनी हा सवंग प्रसिध्दीचा मार्ग स्वीकारलाय" असं मोदी विरोधकांनी म्हंटलं तरी त्यात नवीन वाटण्यासारखं काही नाही.
आता कदाचित वैभवी नावाची लाटही येण्याची शक्यता आहे. तुम्हांला माहित आहे? आपल्या इंदिरा गांधी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तेव्हा तर अनेक पालकांनी आपल्या मुलीचं नाव प्रियदर्शिनी किंवा इंदिरा ठेवलं होतं. एवढंच काय, ऐश्वर्या राय जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा ऐश्वर्या नावाची लाटच जणू भारतात आली होती. मुलांची नावंही या बाबतीत मागं नाहीत. खिलाडी अक्षयकुमार जेव्हा सिनेमात आला तेव्हा बर्याच पालकांनी आपल्या मुलाचं नाव अक्षय ठेवलं होतं. सध्या जगभर ’गेम ऑफ थ्रोन्स’ ही इंग्रजी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यातली आर्या, टिरियन, खलीसी, सान्सा, डेनेरिस ही नावं खूपशा मुलांना ठेवण्यात आली आहेत.
पंतप्रधानासारख्या पदावरच्या व्यक्तीनं एखाद्या सामान्य नागरिकाच्या बाळाचं नांव ठेवण्याची भारतातली ही कदाचित पहिलीच घटना असावी. त्या निमित्तानं या वैभवीला आणि तिच्या आईबाबांना आज देशभर प्रसिध्दी मिळालीय. वैभवीला टीम बोभाटाच्याही खूप खूप शुभेच्छा!!




