‘जमिनीवर आणि समुद्रावर राज्य करणारी लढवय्यी, शक्तिशाली आणि मुत्सद्दी राजकारणी राणी-ग्रेस ओ'म्याली’!!
पृथ्वीचा ९०% हून जास्त भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. अशा समुद्रावर सत्ता गाजवण्याचा मोह कुणाला होत नाही. अनेक छोट्या-मोठ्या साम्राज्यांनी समुद्रावर आपला अधिका सांगण्यासाठी नौदल आणि आरमारे उभारली. यातच समुद्रावर आणि सामुद्रिक संपत्तीवर आपला हक्क सांगणारा आणखी एक वर्ग म्हणजे समुद्री चाचे. अशा चाच्यांचाही स्वतःचा प्रांत असतो, स्वतःची शासन व्यवस्था असते आणि त्यांचा एक नेताही असतो. सोळाव्या शतकात आयर्लंडमध्ये काही स्थानिक जमातींची सत्ता होती. या जमाती एकत्र येऊन आपापला नेता निवडत आणि हे नेते आपापल्या प्रदेशातील, आपापल्या जमातीसाठी कायदे आणि सुव्यवस्था देण्याचा प्रयत्न करत. महत्वाची बाब म्हणजे या जमातींचा नेता वंश परंपरागत पद्धतीने नव्हे, तर लोकांमधून निवडला जात असे. आयर्लंडमधल्या तेव्हाच्या कायद्यानुसार महिलांना समाजात आदराचे आणि मनाचे स्थान होते, पण त्यांना नेतृत्व करण्याची मुभा नव्हती. त्यांना आपल्या वडिलांच्या संपत्तीत वारसा मिळत होता आणि आपल्या नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचाही अधिकार होता, पण त्या कुठल्याही जमातीचे नेतृत्व करू शकत नव्हत्या. अशा काळात एका धाडसी आणि जाँबाज स्त्रीने समुद्री चाच्यांच्या प्रदेशाची हुकूमत आपल्या ताब्यात घेतली होती. लढाई करण्यात, राजकीय डावपेच आखण्यात आणि सामंजस्याने तोडगा काढण्यातही ही राणी अत्यंत निपुण होती. कोण होती ही राणी आणि समाजमान्य नियमांबाहेर जाऊन हिने आपल्या जमातीवर राज्य करण्याची आपली इच्छा कशी अंमलात आणली, जाणून घेऊया या लेखातून.
सोळाव्या शतकात इंग्लंडवर हेन्री आठवा राज्य करत होता. आठवा हेन्री स्वतःला लॉर्ड ऑफ आयर्लंड म्हणवून घेत असे. पण आयर्लंडच्या स्थानिक जमातींना हे मान्य नव्हते. ते स्वतःच्या नियमानुसारच कारभार करत असत.
समुद्री हल्ले आणि व्यापारी लूट यांचा सर्वत्र हल्लकल्लोळ माजलेला असतानाच्या वातावरणात १५३०च्या दरम्यान ग्रेस ओ’म्यालीहा जन्म झाला. तिचे वडील ड्यूडारा ओ’म्याली हे उम्हाला या आयर्लंडमधल्या एका छोट्याशा प्रदेशाचे प्रमुख होते. ग्रेसला लहानपणापासूनच वडिलांचा सहवासात राहायला आवडत असे. ती इतकी हट्टी होती की कितीही विरोध केला तरी ती त्यांच्यासोबत समुद्र सफरीवर जाण्यापासून परावृत्त होत नसे. समुद्राच्या उधाणणाऱ्या लाटांनी तिला अधिकच स्वैर केले.
समुद्रात राहायचे तर तिथल्या जीवनाचे नियम आत्मसात करणे आलेच. म्हणूनच ग्रेसला शस्त्रे हाताळण्याचे आणि युद्धकलेचे प्रशिक्षणही देण्यात आले. यातूनच ती हळूहळू चाच्यांचा जीवनाला सरावत गेली. बेधडक, बेफिकीर आणि बिनधास्त वृत्तीच्या ग्रेसने वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रमुखपदही स्वतःकडेच घेतले. खरेतर त्याकाळच्या नियमानुसार स्त्रियांनी नेतृत्व करणे समाजमान्य नव्हते, तरीही ग्रेसने आपला अजेंडा रेटणे सोडले नाही. प्रचंड हट्टी आणि स्वतःचं तेच खरं करण्याची खोड असलेल्या ग्रेसला कुणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता.
ग्रेसला फक्त युद्धकौशल्याचेच नाही, तर औपचारिक शिक्षण देखील मिळाले होते. तेही इतक्या उच्च प्रतीचे की तिला तेव्हाची लॅटिनसारखी शाही समजली जाणारी भाषाही अवगत होती. वयाच्या १५व्या वर्षी तिने डॉनल ओ’फ्लाहर्टी नावाच्या शेजारील राज्याच्या प्रमुखाशी लग्न केले. डॉनलनेही ग्रेसला कधी परंपरागत जोखडात बांधण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ती डॉनलच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामात सहभागी होत असे. डॉनलच्या प्रतिस्पर्ध्यांनी एका बेसावध क्षणी त्याचा काटा काढला. ग्रेस एकटी पडली, पण खचली नाही. डॉनलच्या प्रतिस्पर्ध्यांना वाटले की आता आपण डॉनलचा राजवाडा आपल्या ताब्यात घेऊ. पण तसे झाले नाही. कारण ग्रेसने डॉनलच्या मारेकऱ्यांचा सूड तर घेतलाच, पण डॉनलचे राज्य आपल्या राज्याशी जोडून घेतल्यामुळे तिच्या राज्याचा विस्तारही झाला.
ग्रेसचे नेतृत्व कौशल्य खूपच वाखाणण्याजोगे होते. म्हणूनच इतिहासातील इतर राजे किंवा राण्यांपेक्षा ती अगदी वेगळी भासते. डॉनलच्या प्रदेशामुळे आणि त्याचे काही विश्वासू साथीदार ग्रेसला येऊन मिळाल्याने आता ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली होती. या काळात तिने आपले लक्ष्य पूर्णतः समुद्र सफारी आणि चाचेगिरीवरच केंद्रित केले. ग्रेस ओ’म्यालीवर करण्यात आलेला कोणताही हल्ला कधीही खाली जात नसे. प्रत्युत्तर दिल्याशिवाय तिला चैनच पडत नसे. सूड उगवल्याशिवाय तिला शांती लाभत नसे. तिच्या शौर्य, पराक्रम आणि धाडसाची ओळख करून देणारी एक कथा सांगितली जाते. ग्रेस गरोदर होती आणि तिचे दिवस भरत आले होते. अशावेळी तिला विश्रांतीची गरज होती. पण ती विश्रांती घेत आपल्या महालात पडून राहिली नाही, तर समुद्रातील आपल्या जहाजांसोबत फिरत राहिली. अशातच चाच्यांच्या दुसऱ्या एका गटाने तिच्या जहाजावर हल्ला केला. अवघडलेल्या अवस्थेतच ती त्या चाच्यांशी लढत राहिली. अर्धा एक तासाने तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि लागलीच पुन्हा ती शस्त्रे घेऊन युद्धात उतरली. आपल्या नवजात अर्भकाचे रक्षण करत करत तिने आपल्या सैन्याचे मनोबल तरी वाढवलेच, पण आपल्या सैन्यालाही ती प्रोत्साहन देत राहिली. हातात तलवार घेऊन शत्रुवर तुटून पडली.
ह्यूज दि लॅसी हा ग्रेसचा प्रियकर. एका हल्ल्यात डूना कॅसलच्या चाच्यांनी त्याला मारून टाकले. जेव्हा डूना कॅसलचे मॅकमोहन वंशाचे लोक जवळपासच्या बेटावर आल्याचा ग्रेसला सुगावा लागला तेव्हा तिने त्या सर्वाना संपवून टाकले. सूड घेण्याची तिची वृत्ती फार प्रबळ होती आणि तिच्या या सूडचक्रातून कुणाचीही सुटका झाली नाही. डूना कॅसलही तिने आपल्या ताब्यात घेतले.
१५६६ साली ग्रेसने ‘द आयर्न’ रिचर्ड बोर्कशी दुसरे लग्न केले. बुर्कहा अतिशय शक्तिशाली अशा मॅकविल्यम घराण्याचा वंशज होता. त्याच्याशी लग्न केल्याने तिची ताकद आणखी वाढली होती. राजकीय दृष्ट्या ही तिच्यासाठी एक फायद्याची सोयरिक होती. त्यांचे हे लग्न म्हणजे ट्रायल मॅरेज होते, एका वर्षात दोन्हींपैकी कुठल्याही पक्षाला नात्यातून बाहेर पडण्याची मुभा होती. ही आयर्लंडमधील त्याकाळची एक सर्वमान्य प्रथा होती. ग्रेसला बुर्कच्या रॉकफ्लिट किल्ल्यात जास्त रस होता म्हणून तिने हा प्रस्ताव स्वीकारला असेही म्हटले जाते. अर्थात एका वर्षानंतर तिने डिव्होर्स घेण्याची धमकी देऊन राजाला कैद केले आणि तो किल्ला स्वतःच्या नावावर करवून घेतला. त्यानंतरही या जोडीने वीस वर्षे संसार केला.
ग्रेसने दोन लग्ने केली आणि ही दोन्ही लग्ने तिला तिच्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने खूपच फायद्याची ठरली. ब्रूकपासून तिला थिओबोल्ड नावाचा मुलगाही झाला. १५८०च्या दरम्यान इंग्रजांनी आयर्लंडवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी एलिझाबेथ पहिली ही राणी इंग्लंडच्या राजगादीवर विराजमान होती, तिने स्वतःला लॉर्ड डेप्युटी ऑफ आयर्लंड म्हणून घोषित केले. आयर्लंडच्या सर्व जमाती प्रमुखांनी इंग्लंडच्या राजगादीसमोर नतमस्तक व्हावे असा आदेश जारी करण्यात आला. आयर्लंडच्या सर्व प्रदेशात शेरीफ्सची सत्ता चालेल आणि या शेरीफ्सचे या जमातींनी स्वागत करावे असाही फतवा काढण्यात आला. या फतव्याचा अर्थ काय होता हे ग्रेसला चांगलेच कळून चुकले.
तिची जहाजे आणि सैनिक चाचेगिरी करतात, म्हणून इंग्लंडने तिला अनेकदा समज देण्याचा प्रयत्न केला. पण तिने कधीच इंग्लंडच्या या अरेरावी समोर मान तुकवली नाही. ग्रेसला जेरीस आणण्यासाठी एलिझाबेथ राणीचा एक प्रतिनिधी आयर्लंड प्रदेशाचा गव्हर्नर सर रिचर्ड बिंगहॅम याने तिला कैद केले. यावेळी ग्रेस ओ’म्यालीचे वय होते ५६ वर्षे. फक्त राणीलाच नाही, तर तिच्या मुलांना आणि सावत्र भावांनाही कैद करण्यात आले.
आपल्या मुलांच्या आणि भावांच्या सुटकेसाठी ग्रेस स्वतः इंग्लंडला पोहोचली आणि तिने राणी एलिझाबेथशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दोघींमध्ये इंग्लिशमधून संभाषण झाले. आपल्या भावांची आणि मुलांची सुटका करण्यात तर राणी यशस्वी झाली. पण तिला तिचे राज्य मिळू शकले नाही. त्यासाठी तिला आपल्या राज्यवर पाणी सोडावे लागले. आयर्लंडला परत आल्यानंतर तिने इंग्रजाविरुद्ध बंडखोरी करण्यास आपल्या प्रजेला प्रोत्साहन दिले. पण राणी आता थकली होती. शिवाय तिची सत्ताही मर्यादित झाली होती. आयुष्याच्या संधीकाळात तिचे सारे वैभव तिच्यावर रुसले होते.
१६०३ साली ग्रेस ओ’म्यालीचा रॉकफ्लिट कॅसलमध्ये मृत्यू झाला असे म्हटले जाते. तिचे अखेरचे दिवस कसे गेले याबद्दल कुठेही काही लिहिलेले आढळत नाही. इतिहासकारांनी ग्रेसच्या बाबतीत खूपच अन्याय केला आहे. आर्यलंडच्या इतिहासातील शूर आणि धाडसी राणीला केवळ स्त्री असल्याने दुर्लक्षाचे धनी व्हावे लागले. तरीही ‘जमिनीवर आणि समुद्रावर राज्य करणारी शक्तिशाली राणी’ ही तिची ओळख कधीच पुसली जाणार नाही.
मेघश्री श्रेष्ठी




