पुस्तकं वाचायला वेळ नाही? अमृत देशमुखला व्हॉटसऍप करा आणि वाचनाचा आनंद लुटा..
पुस्तकं वाचायची तर आहेत पण वेळ नाही ही बहुतेकांची तक्रार असतेच. बरं, प्रवासात पुस्तक वाचू म्हटलं तर कधी बसायला जागा मिळत नाही तर कधी इतकी गर्दी असते की उभ्या-उभ्याही वाचणं होत नाही. जरी बसायला जागा मिळाली तरी सकाळी वाचायचा जो उत्साह असतो , तो संध्याकाळी उरत नाही. या सगळ्या प्रकारात नंतर वाचू म्हणून बाजूला ठेवलेली पुस्तकं तशीच पडून राहतात.
यावर उपाय शोधलाय अमृत देशमुख या मराठी तरूणानं. त्यानं दर आठवड्याला एक गाजलेलं पुस्तक वाचायला सुरूवात केली आणि त्या पुस्तकाचा सारांश तो मेसेजच्या स्वरूपात लोकांना व्हॉटसऍपवर पाठवू लागला. इतकंच नाही, तो हा सारांश त्याच्या आवाजात रेकॉर्डही करून पाठवायला सुरूवात केली. म्हणजे ज्यांना इतकंही वाचायला वेळ नाही, त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच होती. अशा पद्धतीनं एक पुस्तक जास्तीत जास्त २० मिनिटांत पूर्ण होतं. यासाठी करायचं इतकंच आहे, अमृतच्या नंबरवर #Booklet असा व्हॉटसऍप मेजेस पाठवायचा. तो आठवडा-पंधरा दिवसांत त्याच्या लिस्टमध्ये तुम्हांला ऍड करून घेतो आणि दर आठवड्याला एका पुस्तकाचा सारांश मेसेज आणि रेकॉर्डिंगच्या स्वरूपात पाठवतो. यात आपल्याला एखादं पुस्तक आवडलं, तर ते शोधून पूर्ण पुस्तक वाचनाचा आनंद आपण नक्कीच लुटू, नाही का?
अमृतने ही ’मेक इंडिया रीड’ या मोहिम चालू केलीय. तरूणांना वाचनाचं महत्व लोकांना पटवून देणं, ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही किंवा काय वाचावं असा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी असा पुस्तकाचा सारांश पुरवणं आणि परिणामी लोकांमध्ये वाचनाची सवय वाढीस लावणं यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्याच्या या मोहिमेबद्दल टीम बोभाटाला कौतुक वाटलं आणि त्यांनी अमृतशी संपर्क साधला. चला तर मग, जाणून घेऊयात अमृत देशमुख आणि त्याच्या या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाबद्दल!!

अमृत देशमुख. त्याला पुस्तकांचं भयंकर वेड आहे. आपलं हे वेड भारतातल्या इतर तरूणांमध्येही पसरावं आणि वाढीस लागावं म्हणून त्यानं मोहिम चालू केलीय-"मेक इंडिया रीड". या "मेक इंडिया रीड"च्या माध्यमातून तो दर बुधवारी एक #Booklet तुमच्या नंबरवर पाठवतो. यासाठी त्याला तुमचं पूर्ण नांव असलेला फक्त एक व्हॉटसऍप मेसेज पाठवायचाय किंवा आता त्याने रिलीज केलेलं ऍंड्रॉईड ऍप इन्स्टॉल करायचं.
बुधवारच का?
आठवड्यातल्या विनासुटीच्या दिवशी आपण प्रवास करताना पुस्तक वाचू किंवा ऐकू शकतो. शनिवार-रविवार तसेही घरच्यांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत बिझी असतात. म्हणून असा हा सोयीचा आडदिवस निवडून अमृत सर्वांना #Booklet पाठवतो.

अमृतला दर आठवड्याला एक पुस्तक वाचून संपवण्याइतका वेळ कसा मिळतो?
यावर त्याचं म्हणणं आहे , "बिल गेट्स एका आठवड्याला चार पुस्तकं वाचतो. अजूनही तुम्हांला प्रश्न आहे की मला एक पुस्तक वाचायला कसा वेळ मिळतो"?
अमृतला हे सर्व का करावंसं वाटलं?
त्याच्या दृष्टीनं या "मेक इंडिया रीड"ला तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. एक म्हणजे आजकाल व्हॉटसऍपवर भयानक टाईमपास होतो. नकारात्मक मेसेजेस, टवाळक्या आणि नको त्या विनोदांमध्ये आजच्या पिढीचा बराचसा वेळ वाया जातोय. हा वेळ कुठंतरी कारणी लावावा असं त्याला खूप वाटत होत्ण. त्यातच त्यानं तीन वर्षे आठवड्याला किमान एक पुस्तक वाचेन म्हणून संकल्प केले. नवीन वर्षांचे संकल्प ते, थोडेच पूर्ण होतात. आता मात्र हजारो वाचक वाट पाहात असल्यानं त्याला आठवड्याला एक पुस्तक वाचून पूर्ण करावंच लागतं. त्यामुळं त्याचा संकल्प पूर्ण होतोच होतो. त्याचे मित्रही पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करतात. म्हणून हा पुस्तकाचा सारांश. पुस्तकाच्या टी-२० मॅचेस सारखा!

ज्या तरूणांसाठी त्यानं हे "मेक इंडिया रीड" चालू केलं, त्यांचा अमृतला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यानं सुरवातीला पाच मित्रांना व्हॉटसऍपवर #Booklet पाठवायला सुरूवात केली आणि आजच्या घडीला त्याचे ६०,०००हून अधिक वाचक आहेत. दर आठवड्याला सुमारे ४००० लोक त्याच्यासोबत जोडले जातात. अमृत हा सारांश लिहिताना स्पीच टू टेक्स्ट सॉफ्टवेअर वापरतो. त्यामुळे त्याचे टायपिंगचे कष्ट वाचतात. काही वेळेस त्याला इंटरनेटवरही त्या-त्या पुस्तकांबद्दलचे काही चांगले मुद्दे मिळून जातात. त्यामुळे त्याचा सारांश हा त्याचे स्वत:चे आणि इंटरनेटरवरचे मुद्दे असा मिक्स्ड असतो. हो, पण सारांश रेकॉर्ड करताना मात्र त्याचा स्वत:चाच आवाज असतो. या ’बुकलेट’च्या कामात त्याला त्याच्या फरिद सय्यद या आणखी एका पुस्तक वेड्याची साथ लाभलीय. अमृत पुस्तकं वाचणं आणि त्यांचे सारांश बनवणं हे काम करतो, तर फरिद ते सर्व वाचकांपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं ही बाजू सांभाळतो.
अमृत हे पुस्तकांचे टेक्स्ट आणि ऑडिओ सारांश सर्वांना मोफत उपलब्ध करून देतोय. आठवड्याला एक पुस्तक वाचणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं त्याचं हे ध्येय आहे आणि त्याला ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याची इच्छा आहे. तो व्यवसायानं सी.ए. आहे आणि मुंबईत स्वत:ची प्रॅक्टिस आहे. पण तरीही त्या अकांटन्सीमधले आकडे आणि ऑडिटपेक्षा पुस्तकं वाचणं जास्त आवडतं.

#Booklet चे भविष्यातले प्लॅन्स-
आधीच जोडले गेलेले ६०,००० वाचक आणि त्यात दर आठवड्याला पडणारी भर व्हॉटसऍप या माध्यमाला पेलवत नाहीय. भविष्यात जेव्हा वाचकसंख्या आणखी वाढेल तेव्हा तर नाहीच नाही. यावर उपाय म्हणून अमृतने या वर्षीच्या जागतिक पुस्तक दिनी म्हणजेच २३ एप्रिल २०१६ ला बुकलेट(Booklet) नावाचं एक ऍंड्रॉईड ऍप लॉंच केलंय. ते ऍप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे आणि ते इथून डाऊनलोड करून घेता येईल.
अमृतच्या मते भारतात ’सामाजिक उद्योजक’ अधिकाधिक तयार व्हायला हवेत. या सामाजिक उद्योजकांचं मुख्य उद्दिष्ट समाजाला काहीतरी चांगलं देणं द्यावं हे असायला हवं आणि त्यानंतर त्यातून मिळणार्या पैशाला महत्व असायला हवं. अमृतचं ’बुकलेट’ हा असाच समाजासाठी उद्योग आहे आणि अमृत देशमुख आहे नव्या पिढीतला एक ’सामाजिक उद्योजक’!! अमृतला त्याच्या या ’मेक इंडिया रीड’ प्रोजेक्टसाठी टीम बोभाटाच्या खूप खूप शुभेच्छा!!
या लेखात वापरलेले सर्व फोटोग्राफ्स अमृतच्या सुशील धनावडे या मित्राने काढलेले आहेत. ते इथे वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल सुशीलचे आभार.




