१९६०च्या दशकात जोरदार चाललेली कागदी कपड्यांची फॅशन!! पाण्यातही दोनचारवेळा वापरता येण्याजोग्या कपड्यांचे फोटो तर पाहा!!
'एक नूर आदमी, दस नूर कपडा' हे तर सर्वांना मान्य आहेच. विविध प्रकारच्या कापडाचे ड्रेस आपण परिधान करत असतो. कॉटन, सिल्क, जॉर्जेट असे एक ना अनेक कपड्यांचे प्रकार आहेत. हवामानानुसार किंवा काही ठराविक दिवशी उठून दिसायला त्या त्या प्रकारचे कपडे घालणं सगळ्यांनाच आवडते. परंतु तुम्ही कधी पेपर ड्रेस किंवा कागदी कपड्यांविषयी ऐकले आहे काय? तुम्हाला थट्टा वाटेल पण कागदी ड्रेस खरोखर बनवले जायचे आणि एकेकाळी अमेरिकेत त्याची जोरदार फॅशन होती. आज याचविषयी आपण जाणून घेणार आहोत.
अमेरिकेतील स्कॉट पेपर कंपनीने १९६६ मध्ये एक मार्केटिंग स्टंट म्हणून कागदी कपड्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली. यात महिलांचे कपडे फॅशन म्हणून सुरू झाली. शॉर्ट स्कर्ट, मिनी ड्रेस, स्कार्फ असे विविध कपडे कागदाचे बनवले गेले. हे महिलांचे कपडे डिस्पोजेबल सेल्युलोज फॅब्रिकपासून बनवले होते. अमेरिकेत असे कपडे नवे असल्याने त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिले गेले आणि एक नवी फॅशन सुरू झाली. सेल्युलोज मटेरिअल "ड्युरा-वेव्ह" पासून बनवलेला ड्रेस मिळवण्यासाठी ग्राहकांना एक कूपन आणि $१.२५ देऊन ते कपडे मिळत असे. स्त्रियांना हे आवडू लागले आणि त्याचा खप होऊ लागला.
त्यामुळे लगेचच इतर उत्पादकांनी त्याचे अनुसरण केले. १९६७ पर्यंत कागदाचे कपडे प्रमुख कापड दुकानांमध्ये पोहोचले आणि त्याची किंमत $८ इतकी झाली. अब्राहम, स्ट्रॉस आणि आय. मॅग्निन सारख्या कंपन्यांनी संपूर्ण कागदी कपड्यांचे बुटीक सुरू केले .मार्स होजियरीने आठवड्यात तब्बल १,००,००० कपडे तयार केले. त्याची लोकप्रियता इतकी वाढत होती की १९६७ मध्ये, पेपर ड्रेसबद्दल अशी भविष्यवाणी वर्तवली गेली होती. त्यात म्हणले गेले होते की १९८० पर्यंत कपडे खरेदी पैकी २५% इतकी रक्कम कागदी कपड्यांच्या खरेदीवर खर्च केली जाईल.
फक्त स्त्रियांचेच नाही, तर पुरुष आणि मुलांचेही कागदी कपडे लोकप्रिय होऊ लागले होते. हे कपडे सोयीस्कर वाटत होते. कारण जर ड्रेस खूप लांब असेल तर तो कापून कमी करण्याची सोय होती. जर त्यावर डाग पडला तर तो फेकून देऊ शकत होतो. जुना झाला तरी हे कपडे सहज फेकून देण्यासारखे होते. ज्युडिथ ब्रेवर या डिझायनरने कागदाचा कोट तयार केल्याची नोंद आहे, याची किंमत सुमारे $२०० इतकी होती. कागदापासून बनवलेल्या कपड्यांमध्ये अंडरवेअर, पुरुषांचे वेस्ट, वधूचे गाऊन, मुलामुलींचे फ्रॉक, चड्डी, स्कार्फ ही बाजारात आले होते.
वास्तविक कागदी पोशाख साध्या कागदापेक्षा फक्त थोडे जाड होते. ते ९३% सेल्युलोज आणि ७% नायलॉनने बनलेले जात. काहीवेळा रेयॉनही वापरले जात होते. याचे सेल्युलोज मजबूत होते. जरी ते कपड्यांपेक्षा नाजूक असले तरी सहज फाटून जात नव्हते. अनेक कागदी कपड्यांमध्ये वेल्क्रोने कपडे बंद करण्याची सोयही होती. बोनविट टेलर आणि लॉर्ड अँड टेलर या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये पेपरपासून तयार करण्यात येणाऱ्या काबुकी चप्पल तसेच खास रेनकोट आणि बिकिनी डिझाइन केल्या गेल्या होत्या. हे कपडे पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा वापरता येत होते. पाण्यापासून तात्पुरते रक्षण मिळू शकत होते.
फॅशन इंडस्ट्रीत संपूर्ण कपड्यांच्या बाजारपेठेवर कागदी कपड्यांनी ताबा घेतला होता. तेव्हाच्या नट्याही कागदी ड्रेस घालून जाहिरात करत होत्या. इतकेच नाही तर कागदी कपड्यांच्या फॅशन स्पर्धाही भरवल्या जात होत्या. जाहिरातीत साबणाच्या रॅपर दिल्यास कागदाची टोपी घेऊन जा. अशा जाहिराती दिसू लागल्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देऊ केल्या गेल्या.
पण म्हणतात ना, फॅशन ही सतत बदलत असते. तरुण तरुणींचे नंतर कागदी कपड्यांचे आकर्षण कमी होत गेले. त्याचा रंग लवकर उडून जात होता, तसेच ते ज्वलनशील असल्याने वापरणे सोपे नव्हते. कागदासाठी वृक्षतोड करावी लागत असल्याने ते पर्यावरणाला घातक ठरू लागले9. १९६८ पर्यंत कागदी कपडे बाजारातून गायब झाले. फॅशन बंद झाली आणि लोक पुन्हा पारंपरिक कपड्यांकडे वळले. पेपर ड्रेस इतिहासजमा झाले.
सध्या फॅशनमध्ये आढळत नसले तरी तेच सेल्युलोज फॅब्रिक्स अजूनही वापरले जाते. म्हणजे काही ठिकाणी डिस्पोजेबल कपडे तयार करण्यासाठी ते वापरले जातात. हॉस्पिटल गाऊन , स्क्रब आणि एप्रन इत्यादी. कोरोना काळात बऱ्याच ठिकाणी जिथे डिस्पोजेबल कपडे हवे होते तिथे वापरले जात आहेत.
१९६० या दशकातील कागदी पोशाख अजूनही काही फॅशन डिझायनर्सना प्रेरणा देत आहेत. आजही मोठमोठ्या फॅशन इव्हेंट असतात ते कधीकधी कलाकारांच्या अंगावर दिसतात.
शीतल दरंदळे




