computer

केवळ ५ दिवसांत बांधले गेलेले किफायतशीर असे भारतातले पहिले 3D प्रिंटेड घर! कुणाचा हा उपक्रम आहे जाणून घ्या..

स्वतःचे घर बांधणे किंवा घेणे हे प्रत्यकाचे स्वप्न असते. वाढत्या महागाईत भडकलेल्या घराच्या किंमतीमुळे अनेकांचे नव्या घराचे स्वप्न अपूर्ण राहते. पण आता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील पहिले 3D प्रिंटेड घर तयार झाले आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रसाठी नवसंजीवनी मिळाल्यासारखे झाले आहे. भविष्यकाळात ही घरं आजूबाजूला दिसली तर चकित होऊ नका.आज याबद्दलची अधिक माहिती करून घेऊयात.

Tvasta Manufacturing Solutions या स्टार्ट-अपने भारतातील पहिले 3D प्रिंटेड घर तयार केले आहे. IIT-Madras च्या माजी विद्यार्थ्यांचे हे स्टार्टअप आहे. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. 3D प्रिंटिंग पद्धतीचा वापर करून डिझाईन केलेली आणि बांधलेली घरे 3D प्रिंटेड घरे म्हणून ओळखली जातात. या पद्धतीची घरे 3D बांधण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, तसेच खर्चही कमी येतो.

भारतातले पहिले 3D-प्रिंटेड घर चेन्नईत बांधले आहे.
हे बैठे घर अवघ्या पाच दिवसांत बांधले गेले आहे. हे घर ६०० चौरस फुटांचे आहे. Tvasta ची ही पहिली रचना आहे. हेच घर जर पारंपरिक पद्धतीने बांधले गेले असते तर त्यासाठी किमान १५ दिवस तरी लागले असते. तसेच याचा कचराही अर्ध्यापेक्षा कमी झाला. Tvasta नुसार २०००-चौरस फूट घर बांधण्यासाठी आठवड्यापेक्षा कमी वेळ लागेल. अशी 3D-प्रिंट केलेली घरे केवळ किफायतशीरच नसून पर्यावरणास अनुकूल देखील आहेत. कारण यात स्थानिक सामग्रीचा वापर लांब अंतरावर काँक्रीटची वाहतूक करण्याची गरज नसते. Tvasta ने हे घर बांधण्यासाठी त्यांचे स्वतःचे मटेरियल मिक्स बनवले आहे. यात सिमेंट पाणी, वाळू, जिओपॉलिमर आणि फायबर्सचा समावेश आहे.

हे एक वेगळ्या पद्धतीचे काँक्रीट आहे. थ्रीडी प्रिंटिंग करताना भिंतीला इजा होऊ नये म्हणून वायरिंग आणि प्लंबिंगसाठी वेगळी पोकळ डिझाइन तयार केली गेली होती. यामध्ये सिमेंट-पाणी हे मिश्रण कमी लागते.

Tvasta नुसार, 3D प्रिंटेड घर बांधण्यासाठी अंदाजे ५ लाख ते ५.५ लाख रुपये खर्च येतो. साधारण २BHK अपार्टमेंटच्या किंमतीच्या अंदाजे २०% कमी खर्च होतो. टिकाऊपणात 3D प्रिंटेड घराचे सरासरी वय ५०-६० वर्षे असते. या घराचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची तयारी दाखवली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते २०३० पर्यंत तीन अब्ज लोकांना नव्या घरांची आवश्यकता असेल. म्हणजे दररोज ९६,००० नवीन घरे बांधली जातील. जर या तंत्रज्ञानामुळे घरे कमी वेळेत, किफायतशीर आणि पर्यावरण पूरक बांधली गेली तर लाखो लोकांच्या डोक्यावर छप्पर असू शकेल. परदेशात अनेक देश याची अंमलबजावणी करताना दिसत आहेत. भारतात हे भविष्यात कसे विकसित हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required