स्वत:चेच पैसे बँकेतून काढता येत नाही म्हणून एकाला बँकेवर दरोडा टाकावा लागला. कुठे आणि का ही घटना घडली?
मनी हाईस्ट ही ५ सीझनची सिरीज जगभर तुफान लोकप्रिय झाली. या सिरीजमध्ये एक टोळी जबरदस्त डोक्यालिटी लढवून चोरी करते. यातील विशेष गोष्ट अशी की चोरी करूनही सिरीजमधील प्रोफेसर आणि त्याची गॅंग हे त्या देशातील लोकांसाठी हिरो ठरतात. लेबनानमध्ये मात्र खरोखर हा मनी हाईस्टशी मिळतीजुळती गोष्ट समोर आली आहे.
लेबनान हा मध्यपूर्व आशियातला देश. या देशात ऑक्टोबर २०१९ पासून लोकांच्या बँकेतल्या ठेवीतले पैसे काढण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार लोकांना मोजकेच पैसे काढता येतात. तेथील मलिक अब्दुल्ला असेई नावाच्या एका ३७ वर्षांच्या कॅफे चालकाने आपलेच पैसे बँकेतून काढता येत नाहीत म्हणून चक्क बँकेवर दरोडा टाकला.
असेई यांच्यावर ८,७०० डॉलरचे कर्ज आहे. त्यांच्या कॅफेतून काही दिवसांपूर्वी तब्बल १५,००० डॉलर्स चोरीला गेले. अशा परिस्थितीत असेई हे काय करावे आणि काय नाही या पेचात अडकले होते. एकीकडे आर्थिक कोंडी, तर दुसरीकडे स्वतःचे बँकेत ठेवलेले पैसे काढण्याची परवानगी नाही. असेई यांनी शेवटी एक बंदूक आणि ग्रेनेड हातात घेत थेट बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला पेट्रोलमध्ये बुडवत स्वतःचे जीवन संपविण्याची धमकी देऊन टाकली. स्वतःच्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत ही निराशा त्यांना इथवर घेऊन आली.
असेई यांच्या वकिलाने यावर प्रतिक्रिया देताना, असेई यांनी एका आठवड्यापूर्वी बँकेने परत परत विनवण्या करून पैसे दिले नाहीत असे सांगितले. तर एका एनजीओ कार्यकर्त्याने संगितले की, असेई आमच्यासाठी हिरो असल्याचे कारण म्हणजे जे करण्याची हिंमत कुठल्याही नागरिकाची झाली नसती, ते हिमतीचे काम असेई यांनी करून दाखवले आहे.
अब्दुल्ला अटकेत असले तरी ते राष्ट्रीय हिरो ठरले आहेत. सध्या लेबनानमध्ये सरकारविरुद्ध धुमसत असलेला रोष प्रचंड आहे. या रोषाला मोठी वाचा असेई यांनी फोडली आहे. या घटनेनंतर सरकारविरोधात आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी देशभरातील लोक जुम्म्याची नमाज करून जैनीन येथे जमा झाले होते.
या आंदोलनाने आम्ही सर्व असेई असे रूप घेतले आहे. कारण प्रत्येक व्यक्ती असेई यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. जैनीन येथे लोक एकत्र आले तेव्हा तिथे एका स्थानिक इमामने भाषण केले, त्यांनी असेई यांना त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी तर केलीच पण आम्ही सर्व असेई असे या आंदोलनाला स्वरूप प्राप्त करून दिले.
लेबनानमधील होऊ घातलेल्या क्रांतीचा चेहरा हा असेई बनू पाहत आहेत. लोकांनी असेईला सोडले जात नाही तोवर उपोषण करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक लेबनान हा ६० लाख लोकसंख्या असलेला देश कधी नव्हे त्या आर्थिक संकटात आहे. त्यांच्या करन्सीचे ९०% मूल्य ते हरवून बसले आहेत.
विश्व बँकेने १८५० नंतर झालेली सर्वात वाईट आर्थिक परिस्थिती असे वर्णन त्या परिस्थितीचे केले आहे. यावरून लोकांना रस्त्यावर येणे का भाग पडत आहे याचा अंदाज येऊ शकतो. देशांतून मिळेल ती रकम घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न लोक करत आहेत.
हा विरोध काय आजकालचा होतोय अशातला भाग नाही. पण असेई यांनी जे धाडसी कृत्य केले, त्यामुळे लोकांना बळ मिळाले असे म्हणता येईल. याच कारणाने तिथला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
तसे बघायला गेले तर बँक लुटण्याचा प्रयत्न करणे हा मोठा गुन्हा आहे. मात्र लोकांनी त्यांना आपला हिरो म्हणून घोषित केले. कारण असेई यांच्यासारखे कित्येक लोक मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. आपलीच भूमिका या माणसाने मांडली आहे असे तेथील लोकांचे मत झाले आहे.
आता या लोकांच्या मोठ्या प्रमाणावरील रोषानंतर तेथील सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उदय पाटील




