computer

पराक्रमी, पण निर्दयीपणात सैतानालाही लाज आणेल अशी राणी बौडीका!! पण ती इतकी निर्दयी का झाली होती?

स्त्री ही प्रसंगी पराक्रमी बनली तरी तिच्यात ममता वसते, ती कारुण्याची मूर्ती असते असे मानले जाते. आजची राणी मात्र या संकल्पनेला छेद देणारी आहे. अर्थात तसे तसे बनण्यासाठी तिची स्वत:ची तशी कारणे असतील. पराक्रमी तर ती होतीच, पण निर्दयीपणातही तिने सर्व मर्यादा पार केल्या होत्या. चला तर वाचूया या राणी बौडीकाबद्दल!!

एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्यास्त होत नसे असे म्हटले जाई. पण इंग्लंडवरही कधी काळी रोमन साम्राज्याची सत्ता होती. ही गोष्ट आहे इसवीसन पूर्व ४३ ची. रोमन सैनिकांनी दक्षिण इंग्लंड आपल्या ताब्यात घेतला होता. पण या प्रदेशात असलेल्या राजांच्याच हाती त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाची सूत्रे सोपवली. दक्षिण इंग्लंडमध्ये त्याकाळी राजा प्रेसॅटॅगस या आयसेनी जमातीच्या राजाचे राज्य होते. हा प्रदेश रोमन सैन्याने जिंकला असला तरी राजा प्रेसॅटॅगस हाच तिथला प्रशासकीय प्रमुख राहणार होता.

राजा प्रेसॅटॅगस आणि राणी बौडीका यांना दोन मुली होत्या. राजाच्या पश्चात राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला वारस नव्हता. पण राजा प्रेसॅटॅगसने आपल्या पश्चात राणी बौडीकाकडे राज्याची सूत्रे दिली जावीत अशी तरतूद करून ठेवली. प्रत्यक्षात जेव्हा इसवीसन पूर्व ६० मध्ये राजा प्रेसॅटॅगसचा मृत्यू झाला तेव्हा रोमन साम्राज्याने राजाच्या मृत्युपत्राचा मान न राखता त्याचे राज्य बळकावले. हे राज्य आपल्या ताब्यात घेतले. रोमन सैन्याने आयसेनी जनतेवर प्रचंड अत्याचार केले, त्यांना मारहाण केली, त्यांची संपत्ती जाळून टाकली, राणी बौडीका आणि तिच्या मुलींवरही अनन्वित अत्याचार केले.

स्वतःसह आपल्या जनतेवर झालेला हा अत्याचार राणी बौडीकाला स्वस्थ बसू देत नव्हता. रोमन सत्ताधीशांना याचा मोबदला चुकवावा लागेल या विचाराने ती अस्वस्थ झाली. सुडाच्या भावनेने पेटून उठली. रडत बसल्याने आपल्यावरील अन्याय दूर होणार नाही त्यासाठी शत्रूवर तुटून पडले पाहिजे या निर्धाराने ती उभी राहिली. तिने आपल्या उध्वस्त झालेल्या लोकांना एकत्र जमवले. त्यांच्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव करून दिली, या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यात त्वेष निर्माण केला आणि जमलेल्या लोकांसह ती रोमन प्रदेशात घुसली. तिच्यासोबत सुमारे १,००,००० सैनिक होते असे म्हटले जाते. या सैनिकांनी रीतसर युद्ध न पुकारता लुटारू समूहाप्रमाणे शहरात घुसून रोमन शहरे उध्वस्त करण्याचा चंग बांधला. शहरातील इमारती, शेती, गुरे, धनदौलत यांची राखरांगोळी करतानाच तिथल्या नागरिकांवरही हिंस्र अत्याचार केले. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवण्यासाठी त्यांना याहून दुसरा पर्यायच सापडला नाही. प्रत्येक शहरात घुसून या सैन्याने तिथल्या सामान्य जनतेचे अतोनात हाल केले. एकामागून एक शहरे आणि लोकवस्ती उध्वस्त करत करत ते पुढे जात होते.

ज्याप्रकारचे जुलूम रोमन सैनिकांनी त्यांच्यावर केले त्याचप्रकारचे जुलूम त्यांनी रोमन नागरिकांवरही सुरू केले. रोमन ब्रिटनची राजधानी कॅमेलॉडिनम शहरही त्यांनी सोडले नाही. वाटेत येईल त्याला मारत लुटत सुटले. काही काही लोकांना तर त्यांनी भर चौकात फासावर लटकवलं. काहींचे तुकडे तुकडे करून त्यांना मटण भाजल्याप्रमाणे काठीवर लटकावून भाजलं.

सूड भावनेने आंधळ्या झालेल्या या राणीला जणू आपण माणूस असल्याचाच विसर पडावा. एक स्त्री इतके क्रूर कृत्य कशी काय करू शकते? तिचे हे कृत्य पाहून,ऐकून कुणालाही थरकाप सुटल्याशिवाय राहणार नाही.

बौडीकाच्याच नजरेतूनच संताप भरभरून ओसंडत असे. तिने एक कटाक्ष टाकला तरी त्यातून फक्त द्वेषाच्या ज्वाळा बाहेर पडताहेत की काय असाच पाहणाऱ्याला भास होई. तिचे केस काळेभोर, अतिशय दाट आणि घोट्यापर्यंत लोळत असत. तिचा हा केशसंभारही तिच्या क्रूर दिसण्यात भर घालत असे.

अशा पद्धतीने आपण संपूर्ण रोमन सत्ता उध्वस्त करू अशा काहीश दिवास्वप्नात राहणाऱ्या या राणीला लवकरच पुन्हा एकदा रोमन सत्तेने झटका दिलाच. तिचा हा क्रूर खेळ फार काळ चालला नाही. रोमन सैन्याने पुन्हा एकदा तिला आणि तिच्या सैन्याला आपल्या टाचे खाली चिरडून टाकले. स्त्री म्हणजे ममता आणि कारुण्य असं म्हटलं जातं, पण बौडीकासारख्या स्त्रियांनी स्त्री सैतानालाही लाजवू शकते हे दाखवून दिलं.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required