हैदर अलीच्या सैनिकांना एकटीने जेरीस आणणारी साध्या पहारेकऱ्याची पत्नी-कर्नाटकातली ओणके ओब्बव्वा!!
भारताला जशी शूरवीर पुरुष योद्ध्यांची परंपरा आहे, तसाच शूर लढवय्या स्त्रियांचाही गौरवशाली इतिहास आहे. अशाच शूर स्त्रियांच्या यादीतील एक नाव म्हणजे ओणके ओब्बव्वा. कर्नाटकच्या चित्रदुर्ग राज्यातील चित्रदुर्ग किल्ल्याच्या एका सध्या पहारेकऱ्याची ही पत्नी. युद्धभूमी म्हणजे फक्त पुरुषांचे क्षेत्र आपल्याला कधी शत्रूशी सामना करण्याची वेळ येईल हे ध्यानीमनीही नसणाऱ्या ओब्बव्वाने हैदर अलीच्या सैनिकांना एकटीने जेरीस आणले होते. ओणके ओब्बव्वा म्हणजे भारतीय स्त्रीशक्तीचे एक ज्वलंत उदाहरण! आज या लेखातून आपण ओणके ओब्बव्वाच्या पराक्रमाची गाथा जाणून घेणार आहोत.
ही गोष्ट आहे अठराव्या शतकातली. तेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता हळूहळू पसरत चालली होती. भारतातील ठिकठिकाणची संस्थाने आपसांतच लढण्यात गुंग होती. एका सध्या सैनिकापासून म्हैसूरची राजगादी हस्तगत करण्यापर्यंत मजल गाठलेल्या हैदर अलीला आता आजूबाजूचे प्रांत गिळंकृत करण्याची लालसा लागली होती. याच लालसेपोटी त्याने कित्येकदा चित्रदुर्गच्या किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण किल्ल्याची सुरक्षा इतकी मजबूत होती की किल्ल्यात फौज तर काय, पण सैनिक घुसण्याचीही सोय नव्हती.
तेव्हा हैदर अलीला किल्ल्यात जाणारा एक भुयारी रस्ता दिसला. हा भुयारी रस्त्यावरून पुढे गेले की एक छोटेसे भगदाड होते. यातून आत किल्ल्यात प्रवेश करता येत होता. या अरुंद वाटेने एकेक सैनिक किल्ल्यात घुसेल अशी योजना त्याने आखली.
इकडे चित्रदुर्ग किल्ल्याचा पहारेकरी मुदडा हनुमा हा पहारेकरी त्या अरुंद अशा भगदाडाच्या वाटेवर पहारा देत होता. त्याची जेवणाची वेळ झाली होती म्हणून तो घरी निघाला. त्याची पत्नी त्याला जेवणासाठी बोलवत होती. नवऱ्याला पुढे पाठवून ओब्बव्वा तिथल्याच तळ्यावरून पाणी आणण्यासाठी म्हणून थांबली. पाणी भरत असताना तिच्या लक्षात आले की त्या अरुंद भगदाडातून शत्रूचा एक सैनिक आत येत आहे. ती झटकन त्या भगदाडाजवळ गेली आणि हातातील मुसळाने त्या सैनिकाला खाली पाडले. त्याचे प्रेत उचलून बाजूला केले. तोवर दुसरा सैनिक त्याच खिंडीतून आत येत होता. त्यालाही तिने मुसळाचा रट्टा दिला. याच पद्धतीने तिने आत येऊ पाहणाऱ्या एकेका सैनिकाला यमसदनी पाठवले.
पाणी आणण्यासाठी थांबलेली आपली बायको अजून आली कशी नाही? म्हणून जेवणासाठी घरी गेलेला हनुमा तसाच परत आला. येऊन पाहतो तर काय त्या खिंडीजवळ शत्रू सैनिकांच्या मृतदेहांचा खच पडला होता. त्याची बायको रक्तात माखली होती. किल्ल्यातील सैनिकांना वर्दी देण्यासाठी तो तसाच निघून गेला.
सैन्य सज्ज होईपर्यंत ओब्बव्वाने एकटीने ती खिंड लढवली होती. त्याच संध्याकाळी ओब्बव्वा शहिद झाली. तिचा मृत्यू कसा झाला याची कोणालाच माहिती नाही. कदाचित दिवसभराच्या अविश्रांत लढ्याने तिचा बळी घेतला असेल. नक्की तिच्या सोबत काय झाले हे कळले नाही पण त्याच रात्री ही शूरवीरांगणा मरण पावली.
तिची आठवण म्हणून त्या खिंडीला ओणके ओब्बव्वा हे नाव देण्यात आले. ओणके म्हणजे मुसळ. मुसळ हेच तर ओब्बव्वाचे हत्यार होते म्हणून तिचे नाव ओणके ओब्बव्वा असे पडले. कर्नाटकात आजही ओणके ओब्बव्वा म्हणजे देशप्रेम आणि शौर्याची मूर्तीमंत प्रतिक म्हणून पहिले जाते. अनेक ठिकाणी तिची स्मारके उभारण्यात आली आहेत.
प्रसंगावधान राखून आतील धैर्य जागृत केले तर प्रत्येक स्त्री ओणके ओब्बव्वा होऊ शकते, तिच्या या पराक्रमातून तमाम स्त्री वर्गाला हाच संदेश मिळतो.
मेघश्री श्रेष्ठी




