गार्डच्या कंटाळ्यामुळे ७ कोटींचे पेंटिग कसे खराब झाले याचा किस्सा तर वाचा!! त्या गार्डचे पुढे काय झाले?
वर्गात किंवा मिटिंगमध्ये बोअर झालो तर आपण वहीवर काहीतरी गिरगिटतो. पण कंटाळा आला म्हणून काही गिरगिटल्याने करोडोंचे नुकसान झाले असे कधी ऐकले आहे का??
असं रशियात घडलं आहे तर खरं! रशिया येथील बोरिस येल्तसिन प्रेसिडेन्सीयल सेंटर येथे काही पेंटिंग्सचे प्रदर्शन सुरू होते. या आर्ट गॅलरीत कामाला असलेला एक सुक्युरिटी गार्डने कंटाळा आला म्हणून तिथे ठेवलेल्या एक पेंटिंगवर आपल्या पेनने डोळे काढले आणि तब्बल ७ कोटींपेक्षा अधिक किंमतीचे हे पेंटिंग खराब झाले.
या ७.५० कोटी किमतीच्या पेंटिंगमध्ये तीन चेहरे आहेत. या चेहऱ्यांना मात्र डोळे नव्हते. पण हीच या पेंटिंगची मुख्य खासीयत होती. तिथे असलेल्या या गार्डने मस्तपैकी आपला बॉल पेन खिशातून काढला आणि त्या पेंटिंगला डोळे बनवून दिले. हे प्रदर्शन बघायला आलेल्या एका व्यक्तीने ही गोष्ट नोटीस केली तेव्हा सर्वांना समजले.
या गार्डला लगोलग कामावरून काढून टाकले असले तरी गड्याने चांगलेच वातावरण टाईट केले आहे. कसेबसे करून त्याने खराब केलेले पेंटिंग दीड लाख खर्च करून सुधरवण्यात आले आहे.
हे पेंटिंग ऍना लेपोरस्काया यांनी १९३२-३४ या काळात काढले होते. इतके जुने पेंटिंग आजवर सहीसलामत सांभाळून ठेवले होते. पण एका गार्डच्या आगाऊपणामुळे ते खराब झाले. यामुळे पेंटिंगशी संबंधीत लोकच नाही, तर जगभरातील कलाप्रेमींना दु:ख झाले आहे.
त्या सिक्युरिटी गार्डचे नाव जरी समोर आले नसले तरी रिपोर्ट्सनुसार या कामासाठी त्याला ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
उदय पाटील




