वर्डल ट्रेंडमुळे असा वाचला एका वृद्ध आईचा जीव!!! सगळेच ट्रेंड्स वाईट नसतात!
'आईस वॉटर बकेट', डोल्गॅनो कॉफी आणि कसले कसले ट्रेंडस या सोशल मिडियाच्या जमान्यात आले आणि गेले. बहुतेक ट्रेंडसना लोकांनी नाकेच मुरडली. पण सध्याच्या एका ट्रेंडमुळे एका आजींचा जीव वाचला आहे.
सध्या शब्दकोड्यांचा एक प्रकार असणारा वर्डल नावाचा एक गेम जगभर वायरल होत आहे. यात रोज एकच कोडे येते, शब्द ओळखण्यासाठी जास्तीत जास्त ६ संधी मिळतात. कोणतीही हिंट नसताना पाच अक्षरांचा शब्द ओळखणे तसे अवघडच आहे. त्यामुळेही शब्द ओळखला की लोक लगेच आपला स्कोअर शोधल मिडियावर शेअर करतात. याच वर्डलमुळे एका मुलीने आपल्या आईला वाचवले आहे.
डेन्स हॉल्ट नावाची एक वृद्ध महिला घरात एकटीच राहते.त्या घरात झोपेत असताना अचानक एक नग्न माणूस खिडकीतून घरात शिरला. त्याने तब्बल १७ तास या महिलेला त्याच घरात कोंडून ठेवले होते.
या डेन्स यांची मुलगी मेरेडिथ ही सियाटलला राहते. दोन्ही मायलेकींना रोज सकाळी वर्डल गेम खेळण्याची सवय होती. एके दिवशी जेव्हा मेरेडिथच्या आईने वर्डलचा स्कोर शेयर केला नाही तेव्हा तिला चिंता व्हायला लागली. सियाटल आणि शिकागो या दोन शहरांत १७०० मैलांचे अंतर आहे. तिला स्वत: जाऊन तर आईला पटकन भेटता येणार नव्हते.
मेरेडिथने आईला मेसेज केला. पण मेसेज पाह्यला जाऊनही काहीही उत्तर येत नाही हे बघून तिने पोलिसांना या गोष्टीची कल्पना दिली. पोलिसांनी वेळीच डेन्स यांचे घर शोधून तिथे प्रवेश केला आणि त्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा जीव वाचवला.
नग्न अवस्थेत घरात घुसलेला तो इसम २ कात्र्या घेऊन घरात शिरला होता. खिडकीतून घुसताना त्याला लागल्याने त्याचे रक्तही वाहत होते. त्याने त्या महिलेला घरभर ओढत नेले. तिला अंघोळ करायला लावून त्याच ओल्या गाऊनमध्ये तळघरात कोंडून ठेवले.
पोलीस आल्यावर त्यांनी त्याच्या तावडीतून डेन्स यांची सुटका केली. घरात शिरलेली ती व्यक्ती माथेफिरू होती. . याआधी देखील घरात घुसणे, किडनॅपिंग करणे अशा केसेस त्याच्यावर आहेत. या निमित्ताने मात्र घरात एकट्या राहणाऱ्या लोकांची वेळोवेळी विचारपूस केली पाहिजे हा संदेशहीही लोकांपर्यंत गेला आहे.
उदय पाटील




