टायटॅनिक अपघाताचे घटनेच्या १४ वर्षे आधी अगदी तपशीलात भाकित केले गेले होते!! या पुस्तक आणि लेखकाबद्दल माहित आहे का?
टायटॅनिकचा अपघात हा समुद्री इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते. १५०० पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली ही घटना विस्मृतीत जाण्याची शक्यताच नाही. टायटॅनिकचा अपघात होण्याआधी जर कुणी या घटनेचे भाकीत केले असते तर? अर्थातच हा अपघात होऊ नये म्हणून काही खबरदारी नक्कीच घेण्यात आली असती. खरे तर हा अपघात होण्याआधी चौदा वर्षे अमेरिकन लेखक मॉर्गन रॉबर्टसन या लेखकाने लिहिलेल्या Wreck of the Titan or Futility या कादंबरीत टायटॅनिक अपघाताचे भाकीत केले होते. मॉर्गनच्या या कादंबरीत टायटन नावाच्या जहाजाचे वर्णन करण्यात आले आहे. हे जहाज अटलांटिक समुद्रातून प्रवास करत असताना हिमनगाला धडकून त्याचा अपघात होतो असे या कादंबरीचे सूत्र आहे.
१८९८ साली लिहिली गेलेली ही कादंबरी आणि १९१२ साली झालेली टायटॅनिकच्या अपघाताची घटना या दोन्हीत बरेच साम्य आहे. मॉर्गनच्या कादंबरीतील जहाजाचे नाव होते टायटन. हे नाव टायटॅनिकशी बरेचसे साधर्म्य साधणारे वाटते. कादंबरीतील जहाजाचा अपघात एप्रिल महिन्यात झाला होता आणि टायटॅनिकचा अपघातही एप्रिलमध्येच झाला होता. टायटनची लांबी ८०० फूट असल्याचे वर्णन करण्यात आले आहे, तर टायटॅनिक ८८३ फुट लांबीचे होते. म्हणजे यातही जवळपास साम्य आहेच. टायटनचे वजन ४५,००० टन तर टायटॅनिकचे वजन होते ४६, ३२८ टन. दोन्ही जहाजातून प्रवास करणारे प्रवासी हे अटलांटिक समुद्राच्या काठी राहणारे उच्चभ्रू वस्तीतील लोकच होते. दोन्ही जहाजांवर अपघात समयी वापरल्या जाणाऱ्या लाईफ बोटींची संख्या कमीच होती आणि दोन्ही अपघातात मृतांचा आकडाही खूप मोठा होता.
अशी काही साधर्म्य साधणारी संगती असली तरी काही विसंगती देखील होती. टायटॅनिक जहाजाचा हा पहिलाच प्रवास होता आणि कादंबरीतील जहाज अटलांटिक समुद्रातून तिसऱ्यांदा प्रवास करत होते. टायटॅनिक इंग्लंडहून न्यूयॉर्कला निघाले होते, तर टायटन न्यूयॉर्कहून लिव्हरपूलकडे निघाले होते. टायटॅनिकचा अपघात झाल्यांनतर फक्त ७०० लोकांचा प्राण वाचवण्यात यश मिळाले होते. मात्र टायटनच्या अपघातातून फक्त १३ लोकच वाचले होते. टायटॅनिकचा अपघात झाल्यानंतर हे जहाज हळूहळू बुडले, तर टायटन अगदी क्षणार्धात बुडाले.
मॉर्गनचा असा दावा होता की त्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेता येतो. पेरीस्कोपचा शोधही आपणच लावल्याचे त्याचे म्हणणे होते. १९१४ साली त्याचा एक लघुकथा संग्रह प्रकाशित झाला होता.या संग्रहात Beyond the Spectrum नावाची एक कथा होती.या कथेत अमेरिका-जपान युद्धाचे वर्णन करण्यात आले होते. नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या रुपात ही कथा सर्व जगाने अनुभवलीच आहे.
याचा अर्थ मॉर्गनचा शब्द न शब्द तंतोतंत खरा ठरला असे म्हणता येणार नाही. तरीही त्याची कल्पनाशक्ती भविष्याचा वेध घेत होती असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.
मेघश्री श्रेष्ठी




