मुंबई बर्डरेस काय असते, ती का आयोजित होते, कुठवर तिची व्याप्ती आहे आणि पक्षीप्रेमी यावर्षीच्या निकालामुळे आनंदित का आहेत?

मुंबई हे देशातील सर्वात आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर असले तरी येथे मोठ्या प्रमाणावर पक्षांचाही निवास आहे. मुंबईतील पक्षी मोजणी करावी या हेतूने दरवर्षी बर्ड रेसचे आयोजन केले जाते. मुंबईतील पक्षीप्रेमी मिळून दिवसभर शहरातील विविध भागांत फिरून मुंबईत असणाऱ्या पक्षींच्या जमाती किती याचा शोध घेतात. यंदा समोर आलेली आकडेवारी चांगलीच दिलासादायक म्हणावी लागेल.

गेल्या ७ वर्षात सापडल्या नाहीत इतक्या पक्षी जमाती यंदा साडपल्या आहेत. तब्बल २५० विविध पक्षी प्रजाती यंदा मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सापडल्या आहेत. या शोध घेण्यासाठी जवळपास ६० टीम मुंबईच्या विविध भागात फिरत होत्या. गेल्या २ वर्षात हीच आकडेवारी २०० पेक्षा कमी होती.

या मोहिमेवर असलेल्या पक्षीप्रेमी टीम्स मुरुड जंजिरा, उत्तरेला केळवे माहीम किनारा, ईशान्यला विक्रमगड कल्याण बर्वी डॅम डोंबिवली इतक्या दूरवर पसरून हा शोध घेत होत्या. अतिशय उत्साही पद्धतीने महाराष्ट्रातील अनेक भागातून येऊन पक्षीप्रेमी हा शोध घेत होते. भविष्यात मुंबईसह इतरही भागात अशा बर्ड रेस आयोजित करण्याचा प्रयत्न करू असे या आयोजनातील प्रमुख संजय मोंगा यांनी सांगितले आहे.

२००५ साली या बर्ड रेसचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. पहिल्या वर्षी १०० च्या संख्येत पक्षीप्रेमी यात सहभागी झाले होते. पुढे जाऊन ही संख्या वाढत गेली. गेल्यावर्षी आणि २०२० साली १७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पक्षी प्रजातींची संख्या २०० च्या खाली आली होती. मुंबई सारख्या वेगाने तांत्रिक प्रगती करणाऱ्या शहरात अशा प्रकारची माहिती गोळा करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

या बर्ड रेसमधून पक्षांचा अधिवास, पक्षांवर होणारा शहरीकरणाचा परिणाम, तसेच कोणत्या प्रजाती कमी होत आहेत आणि कोणत्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत अशा महत्वाच्या गोष्टी समोर येण्यात मदत होत असते.

गेल्या ७ वर्षातील बर्ड रेसमध्ये सापडलेल्या पक्षी जमातींची संख्या खालीलप्रमाणे आहे:

२०१६- २१५
२०१७- २३९
२०१८ - २३५
२०१९ - २३४
२०२० - १९२
२०२१ - १९८
२०२२ - २५०

यावर्षीची आकडेवारी हा पक्षीप्रेमींना चांगलाच दिलासा असेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required