ईशान - हिटमॅनची जोडी ठरली हिट!! भारतीय संघाने लंकेवर मिळवला दणदणीत विजय
सध्या श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर (Srilanka tour of India) आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ६२ धावांनी विजय मिळवला.( india vs srilanka first T20I)
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाला मान देत यजमानांनी पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या ईशान किशनने (Ishan kishan) ५६ चेंडूंमध्ये ८९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले.
तसेच रोहित शर्माने (Rohit Sharma) ३२ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला होता. तसेच श्रेयस अय्यरने देखील नाबाद ५७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद १९९ धावा करण्यात यश आले होते.
श्रीलंका संघाला करता आल्या अवघ्या १३७ धावा
भारतीय संघाने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना, श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तर शेवटी चामिराने २४ धावांचे मोलाचे योगदान दिले. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी श्रीलंका संघाला २० षटक अखेर १३७ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६२ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.




