विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी समोर आली मोठी बातमी, चाहत्यांच्या हाती लागणार निराशा

येत्या ४ मार्च पासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. हा कसोटी सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएएस बिंद्रा स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास असणार आहे. कारण हा सामना विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. यापूर्वी माजी कर्णधार विराट कोहलीने ९९ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जात आहेत. आगामी कसोटी मालिकेत देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळू शकते. त्यामुळे अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे की, विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याचा १०० वा कसोटी सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी मिळणार नाही.

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सीईओ दीपक शर्मा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, "भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान होणारा पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे." भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली तर दुसरा कसोटी सामना बेंगलोरमध्ये पार पडणार आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यामुळे १०० व्या कसोटी सामन्यात तो शतक झळकावेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required