computer

'लुनाना : अ याक इन द क्लासरूम' : भूतानच्या ऑस्कर नामांकित सिनेमाचं वेगळेपण तर जाणून घ्या!!

तुमचा आनंद कशात आहे हे तुम्ही सांगू शकता? शॉपिंग, मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी, आरामात लोळत पडणे, हॉटेलिंग, पिकनिक, टीव्ही सिनेमा, की अजून काही? कोण कशात सुख मानेल ही खरेतर व्यक्तीसापेक्ष गोष्ट. पण आपला शेजारी देश भूतान मात्र खरा सुखी देश मानला जातो. आणि याला कारण आहे ती तेथील लोकांची मनोवृत्ती, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन.

भूतान हा हिमालयाच्या कुशीत वसलेला छोटासा देश. हा देश आपल्या प्रगतीचे मोजमाप करताना देशाचे उत्पन्न किंवा भौतिक गोष्टींचे मोजमाप यांचा आधार घेत नाही, तर देशातील लोक किती आनंदी आहेत हे दाखवणाऱ्या ग्रॉस नॅशनल हॅपिनेस इंडेक्स या निर्देशांकाचा आधार घेतो. एखाद्या देशातील सर्वसामान्य लोक किती सुखी, आनंदी आहेत, मानसिकदृष्ट्या किती स्वस्थ आहेत हे मोजण्याचे हे एक प्रमाण आहे.

या सुखाच्या, आनंदाच्या शोधावर भाष्य करणारा एक सिनेमा यावर्षीच्या ९४व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भूतानने पाठवला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. सिनेमाचे नाव आहे : 'लुनाना- अ याक इन द क्लासरूम'

सुमारे १०९ मिनिटे लांबीच्या या सिनेमामध्ये युग्येन या तरुणाची गोष्ट सांगितलेली आहे. या युग्येनला गाण्याच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियात जायचे असते. पण मध्येच त्याला लुनाना नावाच्या खेड्यात शिक्षक म्हणून पाठवले जाते. लुनाना हे भूतानमधील दुर्गम गाव, अत्युच्च उंचीवर वसलेले. युग्येन आठ दिवस खडतर प्रवास करून, डोंगर-दऱ्या तुडवून गावात येतो. त्यानंतर त्याच्यासमोर येते ते खडतर हवामानाला तोंड देणारे, वीज-टेलिफोन-इंटरनेट सारख्या सुविधांचे नावही नसलेले एक खेडे. या गावात केवळ पन्नास एक लोक राहतात. आधुनिक जगातल्या टेलिफोन, इंटरनेट या गोष्टी तर सोडाच; पण ज्यांनी कधी साधा टूथब्रशही पाहिलेला नाही अशा मुलांना इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते.

शहरी माणूस अशा ठिकाणी राहण्याची कल्पनाही करू शकणार नाही. गंमत म्हणून चार दिवस 'मेंटल डिटॉक्स' करण्यासाठी तो अशा गावाला पर्यटक म्हणून भेट देईल; पण ते तेवढ्यापुरतेच. युग्येन मात्र या गावामुळे अंतर्बाह्य बदलतो. साध्याभोळ्या, गरीब, परंतु दिलदार वृत्तीच्या खेडूतांकडून तो नकळत आयुष्याचे तत्त्वज्ञान शिकतो. खरा आनंद कशात आहे हे त्याला गवसते.

असेच काहीसे चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक असलेल्या पाओ चॉयनिंग दोरजी याच्या बाबतीतही घडले. या सिनेमावर काम करताना आपण स्वतःदेखील सुख नक्की कशात आहे हे शोधायला प्रवृत्त झालो असे त्याने सांगितले आहे. आज भूतानमधील अनेक लोक सुखाच्या शोधात देश सोडून इतरत्र जात आहेत. दोरजीला नेमके हेच अधोरेखित करायचे होते. त्यासाठी त्याने गोष्ट रचली, ज्यामध्ये नायकाला खडतर, दुर्गम, परंतु आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या आणि पूर्णतः नैसर्गिक अशा आयुष्यात खरा आनंदाचा ठेवा असल्याचा साक्षात्कार होतो.

या चित्रपटासाठीची प्रेरणा दोरजीला स्कूल अमंग ग्लेशिअर्स नावाच्या डॉक्युमेंटरीवरून मिळाली. या डॉक्युमेंटरी मध्ये लुनाना येथे जाण्यासाठी एका शाळा शिक्षकाने दोन आठवडे केलेल्या पायी प्रवासाचे चित्रण केले आहे. स्वतः दोरजी या शिक्षकाला- डेचेन त्शेरिंग याला- भेटला. डेचेनने त्यावेळी त्याला आपले अनुभव सांगितले. भूतानमध्ये उंच डोंगराळ प्रदेशात असलेल्या शाळांमध्ये काम करताना त्याला कुठल्या दिव्यातून जावे लागले, शेकोटीमध्ये जाळण्यासाठी गोवऱ्या मिळाव्यात म्हणून त्याने तेथील वर्गामध्ये एक याक कसा पाळला होता, आणि खडू आणि फळा म्हणून तो कोळशाचा तुकडा आणि खोलीच्या भिंती यांचा कसा वापर करायचा हे कथन केले.

एकीकडे डेचेनचे अनुभव, त्याची जिद्द, परिस्थितीवर मात करण्याची तयारी, आणि दुसरीकडे खडतर परिस्थितीतही शिक्षणाबद्दल आस्था दाखवणारे खेडवळ विद्यार्थी यांनी दोरजीला चांगलेच प्रभावित केले. त्यातूनच त्याच्या मनात सिनेमाची कथा आकार घेऊ लागली. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला महामारीच्या संकटाने ग्रासले आहे. सर्वत्र भीती, काळजी, अनिश्चितता यांचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर सुखाचा शोध, प्रेम, सकारात्मकता, आशा यावर भाष्य करणारा हा सिनेमा अनोखा ठरतो.

दोरजी यांच्यावर भूतानी चित्रपट निर्माते खाइन्त्से नोरबु यांचा प्रभाव आहे. त्यांच्या हाताखाली मार्गदर्शक म्हणून त्यांनी यापूर्वी कामही केले आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे याआधी भूतानने ऑस्करसाठी पाठवलेला पहिला चित्रपट नोरबु यांचा फोरपा (कप) हा होता आणि ही भूतानची पहिलीच ऑफिशियल एन्ट्री होती. आता दोरजी यांची एन्ट्री दुसरी ठरली आहे.

या सिनेमाची निर्मिती तितकीच आव्हानात्मक होती. मुख्यतः लुनाना गावात शुटिंग करणे फारच अवघड होते. ज्या गावात अजून वीजही पोहोचलेली नाही तेथे कॅमेरा, लाइट्स यांसारख्या गोष्टी कशा चालवणार? पण ही टीमही जिद्दीला पेटली. त्यांनी आधी तिथे मूलभूत सोयींची तजवीज केली. सोलर चार्जर आणि बॅटरी यांचे इन्स्टॉलेशन केले. याशिवाय अगदी बारीक-सारीक गोष्टी तेथपर्यंत वाहून न्याव्या लागल्या. यात त्यांचे खायचे पदार्थ आणि जळणासाठी लाकूड यांचाही समावेश होता. चित्रपटाच्या चमूने गावात तब्बल अडीच महिने मुक्काम ठोकला होता. या काळात त्यांना ना व्यवस्थित अंघोळ करायला मिळाली, ना चांगली अंथरूणे-पांघरूणे. पण याचमुळे हा सिनेमा अस्सल बनला, कारण त्यातील पात्रे खरीखुरी साकारली गेली. या सिनेमासाठी स्थानिक आणि नवख्या कलाकारांना निवडण्यात आले... असे लोक ज्यांची आयुष्ये बरीचशी कथेतील पात्रांप्रमाणेच असतील. यातील अनेक कलाकारांनी पहिल्यांदाच काम केले आहे.

पेम झामने या सिनेमामध्ये शाळकरी मुलीचे काम केले आहे. निरागस चेहऱ्याने, भावूक डोळ्यांनी आणि अप्रतिम अदाकारीने तिने हा चित्रपट अक्षरश: खिशात घातला आहे. प्रत्यक्षात या मुलीनेही अतिशय कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. आई नाही, वडील आहेत तेही दारुडे. पेम आपल्या आजीबरोबर राहते. लुनानाबाहेरील जग तिने कधीही पाहिलेले नाही. सिनेमा काय असतो हे तिला माहिती नाही.

एक विचित्र विरोधाभास म्हणजे जेव्हा सिनेमाचे तंत्रज्ञ शूटिंग संपवून लुनानामधून बाहेर पडत होते, तेव्हा तेथील दूरसंचार खात्याचे लोक टेलिफोन टॉवर्स उभारण्यासाठी गावात आले. त्यामुळे आता लुनानामध्ये इंटरनेट आले आहे, आणि पेम स्वतः ऑस्करसाठी प्रत्यक्ष जाऊ शकली नाही तरी निदान आपल्या गावात बसून तिला हा सोहळा पाहता येईल. हेही नसे थोडके.

आणि हो, गावात इंटरनेट आल्यावर लोक तितकेच आनंदी राहतील का हे पाहणे जास्त उत्कंठावर्धक ठरणार आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required