केवळ फिल्म्सची विक्री कमी होऊ नये म्हणून कोडॅकने डिजिटल कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष केलं!! वाचा कोडॅकच्या दिवाळखोरीची गोष्ट!!
असं म्हणतात, की व्यक्तीचा भूतकाळ हा कायम सावलीसारखी त्याची साथ करतो. भूतकाळातल्या क्षणांशी, आठवणींशी जोडलं जाण्यासाठी फोटोहून चांगलं साधन नाही. हवं तेव्हा एखादा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणं आज सहजसोपं असलं तरी पूर्वी महाकठीण होतं. त्याकाळी फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणारं कॅमेरा नामक यंत्र हे फक्त प्रोफेशनल स्टुडिओच्या चार भिंतीत बंदिस्त होतं, ते सर्वसामान्य लोकांच्या हातातलं नव्हतं. ते सामान्य लोकांच्या आवाक्यात आणण्याचं श्रेय जातं ते कोडॅक या कंपनीकडे.
कोडॅक हे फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याच्या जगातलं सगळ्यात मोठं नाव. १९६०-७० च्या दशकात घेतलेले बहुतेक फोटो कोडॅकच्या कॅमेर्याने टिपलेले आणि कोडॅक पेपरवर प्रिंट केलेले आहेत. एकेकाळचं कॅमेरा उद्योगाचं हे अनभिषिक्त साम्राज्य २०१२ मध्ये मात्र उतरणीला लागलं. तसं पाहता आजही ही कंपनी अस्तित्वात आहे, पण अगदी छोट्या प्रमाणात. असं काय घडलं ज्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीवर ही वेळ आली?
कोडॅक कॅमेरा आणि उद्योग यामागचं श्रेय आहे जॉर्ज इस्टमन नावाच्या माणसाचं. त्यापूर्वी फोटोग्राफी हे अतिशय किचकट काम होतं. त्यासाठी वापरायचे कॅमेरे आकाराने मोठे आणि अवजड असत. शिवाय त्याची प्रिंट त्वरित डेव्हलप करावी लागत असल्यामुळे त्यासाठीची साधनसामग्री ही जवळच ठेवावी लागे. जॉर्ज इस्टमनमुळे हे चित्र बदललं. त्याच्यामुळे फोटोग्राफी आणि कॅमेरा सर्वसामान्य माणसाच्या हातात आले. 'यू प्रेस द बटन, वुई डू द रेस्ट' हे सुरुवातीचं कंपनीचं स्लोगन पुरेसं बोलकं होतं.
कोडॅकची घोडदौड सुरू झाली. १९७६ मध्ये कोडॅकचा कॅमेऱ्यांच्या बाजारपेठेतला हिस्सा ८५ टक्के तर फिल्मच्या बाजारपेठेतला हिस्सा ९० टक्के होता. कोडॅक मोमेंट या नावाने त्यांनी यशस्वी मार्केट कॅम्पेन चालवलं. लग्न, वाढदिवस, सणसमारंभ, एखादी नवीन खरेदी, बाळाचा जन्म, प्रमोशन असे कोणतेही आनंदाचे क्षण कोडॅक मोमेंट बनू लागले आणि टिपले जाऊ लागले. ही कल्पना लोकांनी प्रचंड उचलून धरली. आपल्या आयुष्यात घडलेली कोणतीही महत्त्वाची घटना कॅमेऱ्याच्या स्मृतीत जतन करता येणं हा लोकांसाठी एक अनोखा अनुभव होता. कोडॅकने नेमका याचाच फायदा करून घेतला.
पुढे पुढे डिजिटल कॅमेऱ्यांचा जमाना आला. साधारण २००३ पासून डिजिटल कॅमेऱ्यांची बाजारपेठ वाढायला लागली. फिल्म असलेल्या कॅमेऱ्यांच्या विक्रीच्या तुलनेत डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीचा आलेख उंचावू लागला. २००५-०६ या काळात डिजिटल कॅमेऱ्यांनी बाजारपेठ काबीज केली. त्यामुळे २००५ च्या सुमारास मुख्यतः फिल्म कंपनी असलेल्या कोडॅकला झटके बसू लागले. पण हे चित्र निर्माण व्हायला याआधीचा काही वर्षांचा काळ कारणीभूत होता. साधारण नव्वदच्या दशकात डिजिटल कॅमेऱ्यांविषयी भाकीत वर्तवलं गेलं त्यावेळी कोडॅकनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा डिजिटल कॅमेऱ्यांना पर्याय नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांचं उत्पादन करण्यास सुरुवात केली, पण तरीही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं नाही.
डिजिटल कॅमेरा हे वास्तविक कोडॅकचंच उत्पादन होतं. १९७५ मध्ये कोडॅक मध्ये काम करणाऱ्या स्टीव्ह सॅसन नावाच्या माणसाने डिजिटल कॅमेरा शोधून काढला होता. डिजिटल कॅमेरा आणि त्यांची निर्मिती हे कोडॅकसाठी एक साइड प्रोजेक्ट होतं. त्यांनी अशा प्रकारे डिजिटल कॅमेऱ्याला कमी लेखल्याने पुढचा अनर्थ ओढवला. आपल्या उद्योगाची पावलं कोणत्या दिशेला पडत आहेत हे ओळखण्यात कोडॅक सारखी मातब्बर कंपनी अपयशी ठरली. याला त्यांचा अति आत्मविश्वास कारणीभूत ठरला. त्यातून त्यांनी वास्तवाकडे डोळेझाक केली. डिजिटल कॅमेरा हे कॅमेरा उद्योगाचं भवितव्य असूच शकत नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती आणि इथेच ते चुकले.
फिल्म कॅमेरा हे कोडॅकचं उत्पादन होतं. ते त्यात अग्रणी होते. त्यांनी त्यातून भरपूर पैसाही कमावला होता. पण डिजिटल कॅमेरा हा फिल्म नसलेला कॅमेरा होता. त्यामुळे डिजिटल कॅमेरा निर्मितीसाठी उत्तेजन देणं म्हणजे आपल्या हाताने फिल्म कॅमेरा उद्योगाचा गळा घोटण्यासारखं होतं. जे आपल्या सोयीचं नाही त्याकडे दुर्लक्ष करायच्या प्रवृत्तीनुसार कोडॅकने डिजिटल कॅमेऱ्यांच्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष केलं.
२००५ च्या सुमारास कोडॅक बाजारपेठेत अव्वल स्थानावर असलं तरी त्यांना हरवणं अशक्य नव्हतं. सोनी, कॅनन यांच्यासारखे तगडे प्रतिस्पर्धी मैदानात उतरले होते, आणि पहिल्या स्थानापर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी फार अवघड नव्हतं. पुढच्या दोन-तीन वर्षात तसंच झालं. कॅमेऱ्यांच्या बाजारपेठेत कोडॅक हे सोनी, सॅमसंग, पॅनासॉनीक, कॅनन यांच्या तुलनेत मागे पडलं. आता मात्र त्यांनी आपलं लक्ष दुसरीकडे वळवायला सुरुवात केली. मुख्यतः कन्झ्युमर प्रिंटर्सचं उत्पादन करायला त्यांनी सुरुवात केली. तिथेही त्यांना एचपी सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोडॅकने २०१२ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली.
आज कोडॅक दिवाळखोर नाही. त्यांनी आता आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं आहे. स्वतःला ते ग्लोबल कमर्शियल प्रिंटिंग आणि इमेजिंग कंपनी म्हणून घेतात. त्यांच्या रेव्हेन्यूजचे आकडे कमी आहेत आणि दिवसेंदिवस कमीच होत चालले आहेत.
केवळ आपल्या फिल्म्सच्या विक्रीवर परिणाम होऊ नये म्हणून डिजिटल कॅमेऱ्याकडे आणि पर्यायाने येत्या काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोडॅकला त्यांच्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली. तरीही त्यांचं शंभर वर्षांचे योगदान नाकारता येऊ शकत नाही. आता तर डिजिटल कॅमेरा आपल्या फोनमध्येच आला आहे. त्यावेळी त्यांनी थोडी दूरदृष्टी दाखवली असती तर आज कदाचित मोबाईल फोनची बाजारपेठही त्यांच्या हातात असती!
स्मिता जोगळेकर




