आयपीएल सुरू होण्यापूर्वीच वाढली सीएसकेची चिंता, संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

येत्या काही दिवसात आयपीएल २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज संघातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर आयपीएल स्पर्धेतील काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. दीपक चाहरच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये उपचार सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आयपीएल २०२२ लिलावात तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला १४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. सध्या दीपक चाहर दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्नात आहे. तो संघाबाहेर झाला तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसू शकतो.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले होते. तसेच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील एका सामन्यात त्याने ३८ धावांची खेळी केली होती. २०१८ पासून तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिलीज केले होते. परंतु त्याला संघात पुन्हा घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने पूर्ण जोर लावला आणि पुन्हा एकदा त्याला आपल्या संघात स्थान दिले.

आयपीएल २०२२ स्पर्धा येत्या २६ मार्च पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये पार पडणार आहे. तसेच प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required