रिषभ पंतच्या तुफानी खेळीवर हनुमा विहारीने दिली मन जिंकणारी प्रतिक्रीया, वाचा सविस्तर
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी (४ मार्च ) भारतीय संघाने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दिवस अखेर भारतीय संघाला ६ गडी बाद ३५७ धावा करण्यात यश आले. या सामन्यात चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा लाभ घेत त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. दरम्यान या खेळी नंतर त्याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर हनुमा विहारी म्हणाला की,"मैदानावर जाऊन बरे वाटले. मी चांगली फलंदाजी करत होतो आणि माझी तयारीही चांगली होती. भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही उत्तम संधी होती. संघाला पाहिजे तिथे फलंदाजी करण्यात मला आनंद आहे, पण माझे आवडते स्थान तिसरे आहे. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हे केले आहे. मला असे वाटत होते की, सुरुवातीला चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येतो."
तसेच तो पुढे म्हणाला की, "चेंडू जेव्हा जुना झाला त्यावेळी त्याचा अंदाज लावणं कठीण जात होतं. रिषभ पंत एक खास फलंदाज आहे, ही एक विशेष खेळी होती. आपल्या सर्वंनाच माहीत आहे की, तो कशाप्रकारे फलंदाजी करू शकतो. आज केलेली खेळी देखील खास होती. त्या खेळी मुळे भारतीय संघाला पहिल्या दिवशी ३५० पेक्षा अधिक धावा करता आल्या."
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाकडून हनुमा विहारीने ५८ धावांची खेळी केली. तर १०० वा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली ४५ धावा करत माघारी परतला. तसेच रिषभ पंतने मन जिंकणारी फलंदाजी करत ९६ धावांची खेळी केली.




