क्रिकेट नव्हे तर फुटबॉल होते विवियन रिचर्ड्स यांचे पहिले प्रेम! फिफा स्पर्धेचे केले आहे प्रतिनिधित्व: वाचा सविस्तर
जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांचा उल्लेख होतो, त्यामध्ये सर विवियन रिचर्ड्स हे नाव आवर्जून घेतलं जातं. यामागचे कारण देखील तितकेच खास आहे. त्यांनी जे करून दाखवलं, ते मिळवण्यासाठी फलंदाजांना तीन दशकांचा अवधी लागला. त्यांचा आज(७ मार्च,२०२२) ७० वा वाढदिवस आहे. तुम्ही सर विवियन रिचर्ड्स यांना वेस्ट इंडिज संघाकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना पाहिलं असेल. ते मैदानावर येताच गोलंदाजांचा थरकाप उडायचा. परंतु अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, सर विवियन रिचर्ड्स हे क्रिकेटपटूसह उत्तम फुटबॉलपटू देखील होते. याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
सर विवियन रिचर्ड्स यांचे पहिले प्रेम क्रिकेट नव्हे तर फुटबॉल होते. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. त्यांनी व्यावसायिक फुटबॉलपटु म्हणून आपली कारकिर्द पुढे नेली होती. वयाच्या २२ व्या वर्षी, १९७४ च्या फिफा विश्वचषकादरम्यान त्यांनी क्वालिफायर सामन्यात अँटिग्वाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि क्रिकेटच्या विश्वात पाऊल ठेवले.
एक विस्फोटक फलंदाज म्हणून सर विवियन रिचर्ड्स यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते कसोटी क्रिकेटमध्ये देखील वनडे क्रिकेटसारखी तुफान फटकेबाजी करायचे. हेच कारण आहे की, त्यांनी १९८६ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात अवघ्या ५६ चेंडुंमध्ये तुफानी शतक झळकावले होते. तब्बल ३० वर्ष हा विक्रम अबाधित होता. त्यानंतर २०१५ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात ब्रेंडन मॅक्यूलमने हा विक्रम मोडून काढला होता. त्याने अवघ्या ५४ चेंडुंमध्ये शतक पूर्ण केले होते. सध्या तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज आहे.




