computer

युक्रेन-रशिया युद्ध: ११ वर्षांचा मुलगा एकटा ११०० किमींचा प्रवास करून स्लोव्हाकियात पोचला!! त्याला एकटे का सोडावे लागले हे ही जाणून घ्या..

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक इमारती, घरे उद्ध्वस्त होत आहेत. माणसांचा जीव जात आहेत. भिती, दहशत, संहार, मृत्यू असेच वातावरण तिथे आहे. पण यामध्ये अचानक एक सुखद बातमी येते आणि थोडे हायसे वाटते. होय! आज आम्ही अशा चिमुकल्याच्या धाडसाची कहाणी सांगत आहोत, ज्याने एकट्याने अशा वातावरणात ७०० मैलांपेक्षा जास्त अंतर प्रवास केला आणि तो आज सुरक्षित आहे. या मुलाचे स्वागत स्लोव्हाकियाच्या अधिकाऱ्यांनी केले आणि त्याचे खरा हिरो असे कौतुकही केले.

हा ११ वर्षाचा मुलगा युक्रेनमधील झापोरिझ्झिया येथील आहे. शनिवारी रशियन सैन्याने झापोरिझ्झियामधला अणु प्रकल्प ताब्यात घेतला आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी पहाटेच या अणु प्रकल्पावर हल्ला केला होता. हा अणु प्रकल्प युरोपातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक ओळखला जातो. त्यामुळे झापोरिझ्झियामधले वातावरण भीषण आहे. रशियन सैन्य तेथे जोरदार आक्रमण करत आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांना तिथून हलवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण आहे.

पण अशा परिस्थिततीत अनेक जण तिथून सुरक्षितपणे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या ११ वर्षाच्या मुलाच्या आईनेसुद्धा आपल्या मुलाने सुरक्षित बाहेर पडावे यासाठी स्लोव्हाकियाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवले होते. मनावर मोठा दगड ठेऊन तिला हा निर्णय घ्यावा लागला कारण तिला तिच्या आईला एकटे सोडता येणार नव्हते. पण मुलगा सुरक्षित राहावा म्हणून तिने त्याच्याबरोबर एक प्लास्टिक पिशवी, पासपोर्ट आणि फोन नंबर त्याच्या हातावर लिहिलेला होता. तिने हेही लिहिले होते की, तो पूर्णपणे एकटा आहे कारण त्याच्या पालकांना युक्रेनमध्ये राहावे लागले आहे.

या मुलाची आई विधवा आहे आणि तिला आणखीही मुले आहेत. त्यांनाही तिला सुरक्षित करायचे आहे. तो मुलगा न घाबरता एकटा त्या ट्रेन मध्ये बसला आणि त्याने एवढा मोठा प्रवास एकट्याने केला. प्रवासात स्वयंसेवकांनी त्याची काळजी घेतली.

शुक्रवारी युक्रेनमधून स्लोव्हाकियामध्ये तो पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. तिथल्या अधिकाऱ्यांना त्याने फोन नंबर दिला आणि ते त्याला घ्यायला आले. एवढ्या लहान वयात त्याने केलेले धाडस पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्याच्या आईला तो सुरक्षित असल्याची बातमी पोहोचली तेव्हा तिला आनंद झाला. तिने एक व्हिडीओ बनवून सर्वांचे आभार मानले.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required