भारतातल्या या किड्यांना सोन्याचा भाव आला आहे. कोण आणि का इतका दर देत आहे? काय प्रकरण आहे ते तर जाणून घ्या!!
कुत्रा, मांजर, असे प्राणी पाळण्याची हौस अनेकांना असते. म्हणून तर आज कुत्रा आणि मांजर यांच्या काही प्रजातींची किंमत ही लाखांच्या घरात आहे. पण कुणाला किडे पाळण्याचीही हौस असते असं जर तुम्हाला सांगितलं तर पटेल का? नक्कीच नाही. तरीही दुनियात हौशा-गवशा लोकांची काही कमतरता नाहीय. अशाच हौशी लोकांमुळे सध्या स्टॅग बीटल नावाच्या एका किड्यालाही सोन्याचा दर आला आहे. काही परदेशी पर्यटक तर निव्वळ या किड्यासाठी भारताला भेट देतात. काही ठिकाणी याची अवैध तस्करीही केली जाते. फक्त पाच इंच आकारमानाच्या या किड्याला इतका भाव कशासाठी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. जाणून घेऊया स्टॅग बीटल नावाच्या या किड्याबद्दलची अधिक माहिती.
स्टॅग बीटल हा तसा अगदी छोटासा दिसणारा कीटक आहे. हा निसर्गासाठी अत्यंत पोषक आणि मानवासाठी निरुपद्रवी आहे. हा कीटक कधी चावा घेत नाही. हा दिसायलाही फार सुंदर किंवा आकर्षक दिसतो असे नाही. याची रचना देखील अगदीच विचित्र आहे. पूर्ण वाढ होण्याआधी या कीटकाचे संपूर्ण आयुष्य मातीखालीच जाते. झाडाच्या वठलेल्या फांद्या हा याचा मुख्य आहार. हा कीटक कधीच कुठल्या वनस्पतीची पाने, खोड, फूल किंवा फळांवर ताव मारताना दिसणार नाही. पूर्णतः वठून गेलेल्या मृत झाडाच्या सुकलेल्या लाकडावरच याची गुजराण होते. उलट अशी सुकलेली पाने, देठ, लाकूड हाच याचा आहार असल्याने नैसर्गिकरित्या होणारा कचरा कमी होतो. याच्या तोंडावाटे स्त्रावणाऱ्या लाळेमुळे जमिनीला काही पोषक द्रव्ये मिळतात.
जपानमधील बीटल्स फाईट नावाच्या एका खेळप्रकारामुळे या कीटकांना फारच चांगले दिवस आले आहेत. जपानमधील लोक नेहमीच काही तरी सुपीक कल्पना जन्माला घालत असतात. घरी बसून बसून बोअर तर होतंच. मग अशा वेळी काय करायचं? या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून इथल्या लोकांनी एक नवा कार्ड गेम आणला. या कार्डगेम मधील कार्ड्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांची चित्रे असत. तर यातील खेळाडूंनी विविध प्रकारच्या कीटकांचे चित्र असे. ज्या कोणाकडे अशी वेगवेगळ्या प्रकारची कार्ड्स असतील तो खेळाडू जिंकला असा या खेळाचा नियम होता. हळूहळू लोकांनी कार्ड्स जमवणे सोडून खरेखुरे कीटकच जमवायला सुरुवात केली. काही हौशी लोकांनी तर अशा वेगवेगळ्या कीटकांचे मिलन घडवून आणून कीटकांच्या नव्या प्रजातींना जन्म दिला. तर काही लोक कीटकांची झुंज लावत असत.
स्टॅग बीटलचे डोके काहीसे रुंद आणि काळ्या रंगाचे असते. त्याची पाठ काहीशी तपकिरी रंगाची असते. यातील नर कीटकांचा जबडा थोडा रुंद असतो आणि त्याच्यापुढे टोकदार सोंड असते. दुसऱ्या किटकावर हल्ला चढवताना त्यांना या सोंडेसारख्या टोकदार भागाचा खूप फायदा होतो. या किटकापासून विविध प्रकारची औषधेही बनवली जातात. त्यामुळेही या किटकाला चांगली मागणी आहे.
अशा अनेक कारणांसाठी लोक या किटकांना पकडतात. त्यामुळेच या कीटकांची अख्खी प्रजातीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या कीटकांच्या व्यापारावर सरकारने बंदी घातली असली तरी, लपूनछापून असले धंधे करणारे काही कमी नाहीत. म्हणून तर आज या कीटकांना सोन्याचा दर आला आहे.
मेघश्री श्रेष्ठी




