एस श्रीसंतची वादग्रस्त कारकीर्द!! या २ वादांमुळे कारकिर्दीला लागला फुलस्टॉप
क्रिकेटमध्ये वाद विवाद होणं काही नवीन गोष्टी नाहीये. हाय व्होल्टेज सामन्यात खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळत असते, अशा परिस्थितीत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद विवाद होणं सामान्य गोष्ट आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत देखील याला अपवाद नाही. एस श्रीसंत वेगवान गोलंदाजीमुळे जितका चर्चेत आला त्याहून अधिक तो वाद विवादांमुळे चर्चेत आला. आता एस श्रीसंतने ३९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची क्रिकेट कारकिर्द सुरू असताना, आयपीएल स्पॉट फिक्सिंग २०१३ प्रकरण आणि हरभजन सिंगने कानाखाली मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली होती. या स्पर्धेत चौकार, षटकार, परदेशी खेळाडू आणि ग्लॅमर सर्व काही होतं. या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामने पाहून अनेकांना अजूनही असच वाटतं की, आयपीएल स्पर्धा फिक्स असते. तुम्हाला ही अनेकदा असे वाटले असेल. बरोबर ना? २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या हंगामात ३ भारतीय खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित सिंग यांचा समावेश होता.
क्रिकेटपासून राहावे लागले होते दूर..
दिल्ली पोलिसांनी १६ मे २०१३ रोजी राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित सिंग यांना अटक केले होते. पोलिसांचे म्हणणे होते की, २०१३ मध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हेन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी ३ खेळाडूंसह ३६ लोकांना अटक केले होते.
आरोप सिद्ध झाल्यानंतर बीसीसीआयने एस श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कायदेशीर लढाईनंतर तो पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्याच्यावरील सर्व आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली होती. त्याचवेळी २०१८ मध्ये, त्याच्यावरील आजीवन बंदी देखील काढून घेण्यात आली होती.
हरभजन - श्रीसंत वाद
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. परंतु हे दोघेही २००८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड चर्चेत आले होते. याच हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हेन पंजाब यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली पेटवली होती.
सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देत असताना ही घटना घडली होती. हरभजन सिंगचे म्हणणे होते की, श्रीसंतने अशी काही प्रतिक्रीया दिली होती, जे पाहून त्याला राहवले नव्हते. एस श्रीसंतला कानाखाली मारल्यानंतर हरभजन सिंगला संपूर्ण हंगामातून बाहेर करण्यात आले होते. तर ५ वनडे सामने खेळण्यावर देखील निर्बंध घालण्यात आले होते.




