इटलीतल्या या ठिकाणी लग्न केल्यास तिथलं सरकार लाखो रुपये देतेय!! ही योजना काय आणि का आहे?

शादी की लड्डू जो खाये वो पछताए ,जो न खाए वो पछताए! तुम्हाला वाटेल आज आम्ही लग्नाच्या फायद्या तोट्याबद्दल सांगणार आहोत. अजिबात नाही! हा विषय न संपणारा आहे. पण लग्नाचा खर्च म्हटलं की प्रत्येकाला घाम येतो हे नक्की. पारंपरिक विधी सोडले तर बाकी सगळं दिखाव्यासाठी वाटावं अशी लग्न आपल्याकडे चालतात. प्रत्येकाला काहीतरी हटके करायचं असतं. त्यात आज डेस्टिनेशन वेडिंग हे नवं फॅड उदयाला आलं आहे. आज आपण असं लोकेशन पाहूयात जिथे जोडप्याला लग्न केले तर चक्क पैसे मिळतात आणि तेही लाखो रुपये! इटलीतील
लॅझिओ इथं हे खरंच होतं!

इटलीमधलं लॅझिओ हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे. पण कोरोनाच्या कहरामुळे येथे जवळजवळ सगळं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२० च्या सर्वेक्षणानुसार येथे जवळपास ९००० विवाह रद्द केले गेले किंवा पुढे ढकलले. त्या वर्षातले ८५ टक्के नियोजित विवाह कोरोनामुळे थांबवण्यात आले होते. याचा जोरदार फटका इथल्या व्यावसायिकांना बसला. हे व्यवसाय, उद्योग पुन्हा त्याच जोमाने चालू होण्यासाठी लॅझिओ सरकारने एक भन्नाट आयडिया शोधून काढली.

'इथे या, लग्न करा आणि पैसे पण घ्या'. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात लग्न केल्यास लग्न करणाऱ्या जोडप्याला तब्बल १.६८ लाख रुपये मिळतील. तसेच, तिथल्या वेडिंग प्लॅनर्स, फ्लोरिस्ट केटरर्स, या सगळ्यांकडून सेवा घेतल्यास किंवा त्यांची उत्पादने विकत घेतल्यास २००० युरोंपर्यंत रिफंडची स्पेशल ऑफर आहे. त्यासाठी तब्बल १० करोड युरोंचं अनुदान देण्यात येणार आहे. "Nel Lazio con amore," किंवा "From Lazio with Love,"असं या योजनेचं नाव आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हा उपक्रम फक्त तिथल्या नागरिकांपुरताच नाही! इटलीमधील नागरीकत्व असो किंवा परदेशातील पर्यटक, कोणीही या ऑफरचा लाभ घेऊ शकतं.

ही ऑफर स्वीकारणाऱ्या जोडप्यांना पुरावा म्हणून नियमानुसार पाच पावत्या सबमिट कराव्या लागतील. जानेवारी २०२३ किंवा निधी उपलब्ध असेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज दाखल करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं ठिकाण निवडू शकता. स्पॅनिश स्टेप्स, कोलोझियम आणि ट्रेव्ही फाउंटनसह इटलीमधील अजून काही प्रसिद्ध जागांसोबत बरीच ठिकाणं आहेत.अगदी ग्रामीण भागातील सुद्धा काही ठिकाणं यात सामील आहेत.

या संधीचा फायदा घेऊन तुम्ही "डेस्टिनेशन वेडिंग" करण्यासाठी चक्क इटलीला जाऊ शकता. बघा कशी वाटते ही कल्पना?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required