आयपीएल स्पर्धेत 'या' ३ फलंदाजांनी केला आहे एकाच षटकात सलग ५ षटकार मारण्याच्या कारनामा, पाहा यादी
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. दरवर्षी या स्पर्धेचा दर्जा वाढत चालला आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत असतो. आयपीएल २०२२ स्पर्धा येत्या २६ मार्च पासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात देखील चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक असे फलंदाज होऊन गेले आहेत ज्यांनी षटकार मारत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला तर पाहूया या स्पर्धेतील ३ असे फलंदाज ज्यांनी एकाच षटकात ५ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
१) ख्रिस गेल :
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने आतापर्यंत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ख्रिस गेलने गोलंदाजांच्या अडचणीत वाढ केली होती. त्याने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ८१ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने पुणे वॉरियर्स संघातील फिरकी गोलंदाज राहुल शर्माच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार मारले होते. या संपूर्ण खेळी दरम्यान त्याने ४ चौकार आणि ८ षटकार मारले होते.
२) राहुल तेवतिया :
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला हा सामना या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामन्यापैकी एक आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी बाद २२६ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून देण्यात राहुल तेवतियाने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या सामन्यात शेल्डन कॉट्रेलच्या षटकात सलग ५ षटकार मारले होते. याच खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना आपल्या नावावर केला होता.
३) रवींद्र जडेजा :
आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. या सामन्यात रवींद्र जडेजाने २२१.४३ च्या स्ट्राइक रेटने अवघ्या २८ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाला १९१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.




