जेव्हा भज्जीच्या फिरकीवर नाचले होते कांगारू! हॅटट्रिक घेत रचला होता इतिहास; पाहा व्हिडिओ
आजचा दिवस (११ मार्च ) हा भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग साठी खूप खास आहे. २१ वर्षांपूर्वी (११ मार्च, २००१) या दिग्गज गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवून ठेवले होते. याच दिवशी तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. मुख्य बाब म्हणजे त्याने या दरम्यान रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न सारख्या दिग्गज खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. याच कामगिरीनंतर हरभजन सिंगच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले होते. चला तर जाणून घेऊया या सामन्याबद्दल अधिक माहिती.
ऑस्ट्रेलिया संघ २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. भारतीय संघाला या मालिकेत चांगली सुरुवात करता आली नव्हती. मालिकेतील पहिला कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना भारतीय संघाला १० गडी राखून गमवावा लागला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ईडन गार्डनच्या मैदानावर पार पडणार होता. या सामन्यापूर्वी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे हरभजन सिंगला हा सामना खेळण्याची संधी मिळणार होती. हरभजन सिंगकडे संधी चालून आली होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.
दुसऱ्या कसोटी सामना सुरू झाला, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून माईकल स्लेटर आणि मॅथ्यू हेडनने शतकी भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर जस्टिन लेंगरने देखील अर्धशतकी खेळी केली होती. या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली होती. एक वेळ अशीही होती, ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ४ गडी बाद २५२ होती. इतकेच नव्हे तर स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग सारखे फलंदाज फलंदाजी करत होते.
या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर होता. त्यावेळी हरभजन सिंग गोलंदाजीला आला आणि त्याने भारतीय संघाचे सामन्यात जोरदार पुनरागमन करून दिले. त्याने सलग ३ चेंडूंमध्ये ३ गडी बाद केले. सुरुवातीला त्याने रिकी पाँटिंगला पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर त्याने ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्नला बाद करत माघारी धाडले.
ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ४ बाद २५२ होती. परंतु हरभजन सिंगच्या एका षटकात त्यांची धावसंख्या ७ गडी बाद २५२ धावांवर जाऊन पोहोचली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन केले होते. तसेच हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी हॅटट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता. हा सामना भारतीय संघाने १७१ धावांनी आपल्या नावावर केला होता. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील २ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.




