'घाबरून खेळणार तर असच होणार ना', पाकिस्तानी दिग्गजाने केली जोरदार टीका

सध्या ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कराचीमध्ये सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ पराभवाच्या वाटेवर आहे. पाकिस्तान संघाला हा सामना जिंकण्यासाठी ५०६ धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी पाकिस्तान संघातील मुख्य फलंदाजांना बाद करत सामना आपल्या दिशेने वळवला आहे. ही निराशाजनक कामगिरी पाहता माजी पाकिस्तान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.

रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने कराची आणि रावळपिंडीच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याने म्हटले की, "अशी खेळपट्टी उपलब्ध करून दिली तर कोणता संघ पाकिस्तान मध्ये येऊन खेळण्यास रस दाखवेल." पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत खेळपट्टीवर अनेक दिग्गजांनी आणि क्रिकेट चाहत्यांनी देखील टीका केली आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने कराची कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ९ गडी बाद ५५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १४८ धावांवर संपुष्टात आला. याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, " जेव्हा तुम्ही घाबरून खेळता त्यावेळी असच होत असतं." या सामन्यात पाकिस्तान संघातील फलंदाजांना ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी अडचणीत टाकले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required