आईच्या निधनानंतर बहिणीने केला सांभाळ, पाहा जड्डूचा 'जडेजा' पासून ते 'सर' रवींद्र जडेजा पर्यंतचा प्रवास

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. तसेच तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. त्यानंतर त्याने श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या टी२० मालिकेतून जोरदार पुनरागमन केले होते. त्यानंतर नुकताच संपन्न झालेल्या कसोटी मालिकेत देखील त्याच्या फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा उत्तम नजारा पाहायला मिळाला आहे. परंतु रवींद्र जडेजा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू कसा झाला? हे अनेकांना माहीत नसेल. आपण या लेखातून रवींद्र जडेजा बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

एक उत्तम अष्टपैलू आणि क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण केलेल्या रवींद्र जडेजाचा १९८८ मध्ये गुजराती राजपूत कुटुंबात झाला होता. आपला मुलगा क्रिकेटपटू व्हावा अशी रवींद्र जडेजाच्या आईची मनापासून इच्छा होती. परंतु तो क्रिकेटपटू होण्यापूर्वीच त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होण्याच्या एक वर्षापूर्वीच रवींद्र जडेजाच्या आईचे निधन झाले. या घटनेनंतर त्याचा मोठा धक्का बसला होता. त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची बहीण नैनाने त्याला धीर दिला आणि त्याला क्रिकेट खेळण्यास सांगितले. 

रवींद्र जडेजा सध्याच्या काळात भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लहानपणीच आईच्या निधनानंतर त्याने क्रिकेटमधून काही काळ माघार घेतली होती. पण त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला साथ दिली आणि आज त्यामुळेच रवींद्र जडेजा भारतीय संघाचा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू बनू शकला आहे. 

रवींद्र जडेजाच्या बालपणाबद्दल बोलायचं तर, त्याचे बालपणी त्याला खूप अडचणीचा सामना करावा लागला होता. त्याचे वडील एका खाजगी सुरक्षा एजन्सीत कार्यरत होते आणि त्यांचे असे म्हणणे होते की, रवींद्र जडेजाने आर्मी ऑफिसर व्हाव. परंतु रवींद्र जडेजाला क्रिकेटपटू व्हायचे होते त्याने त्याच दिशेने वाटचाल केली.

रवींद्र जडेजाने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण १६८ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३ अर्धशतकांच्या साहाय्याने २४११ धावा केल्या आहेत. यासह त्याने १८८ गडी देखील बाद केले आहेत. तसेच त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५७ सामने खेळून २१९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २३२ गडी बाद केले आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ५८ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ३२६ धावा करत ४८ गडी बाद केले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required