दोन लोकांनी बेट विकत घेऊन देश बनवलाय. ही मायक्रोनेशन्सची भानगड काय असते? त्याला कुणाची मान्यता असते?

जगात एकापेक्षा एक श्रीमंत लोक आहेत, पण यापैकी कोणाही श्रीमंत व्यक्तीला देश विकत घेताना तुम्ही कधी पाहिले आहे का? हे अगदी अशक्य आहे. कारण देश विकत घेणे कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारात नाही. पण आज आम्ही अशा दोन व्यक्तींविषयी सांगणार आहोत ज्यांनी चक्क पैसे देऊन एक देश विकत घेतला. त्याला नाव दिले आणि तिथे माणसंही जमवली आहेत.

गॅरेथ जॉन्सन आणि मार्शल मेयर असे त्या दोघांचे नाव आहे .या दोघांनी २०१९ मध्ये कॉफी के नावाचे बेट विकत घेतले. कॅरिबियन देश बेलीझजवळ ​​असलेले हे बेट १.२ एकरमध्ये पसरलेले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांनी हा देश स्वतःच्या पैशाने नाही, तर क्राउडफंडिंग म्हणजेच देणग्या गोळा करून विकत घेतला आहे. या दोघांनी २०१८ साली हे बेट विकत घेण्याचं ठरवलं होतं पण त्यांच्याकडे तेवढा निधी नव्हता. यानंतर दोघांनी लेट्स बाय ॲन आयलंड नावाचा प्रकल्प सुरू केला.

हा प्रकल्प सुरू झाल्यापासून लोकांनी क्राऊड फंडिंगच्या रूपात पैसे देण्यास सुरुवात केली. या क्राउडफंडिंगद्वारे हे बेट खरेदी करण्यासाठी दोघांनी सुमारे अडीच लाख पौंड म्हणजेच अडीच कोटी रुपये जमा केले. यानंतर दोघांनी २०१९ मध्ये कॉफी के नावाचे बेट विकत घेतले.

कॉफी बीनच्या आकाराचे हे बेट होते म्हणून त्याला कॉफी काय (Coffee Caye) असे नाव देण्यात आले आहे. पण यानंतर गॅरेथ आणि मार्शल मेयर यांनी हळूहळू लोकांना तिथे जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या बेटाला देश म्हणून विकसित करावे हा त्यांचा विचार होता. म्हणून या देशाचे नाव प्रिन्सिपॅलिटी ऑफ आयलँडिया असे ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशाचे स्वतःचे सरकार आहे त्यांचा स्वतःचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत देखील आहे.

सध्या तिथली लोकसंख्या २४९ आहे. या देशात नागरिकत्व मिळवण्यासाठी १५०० रुपये मोजावे लागतात. जगातील कोणतीही व्यक्ती या देशाचे नागरिकत्व घेऊ शकते. तसेच दोन लाख रुपये देऊन या बेटाचे शेअर्स खरेदी करू शकते. हे झाल्यानंतर ती व्यक्ती येथे मतदान करण्यास पात्र ठरते.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, २४९ लोकांचा देश कसा होऊ शकतो? तर अश्या छोट्या देशाला मायक्रोनेशन असे म्हणतात. मायक्रोनेशन्स हे ते देश आहेत जिथे राहणारे लोक त्याला स्वतंत्र देश मानतात परंतु त्यांना जगातील इतर सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळत नाही. प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड नावाचे आणखी एक बेट देखील मायक्रोनेशनच्या श्रेणीत आहे. इथेही कमी लोकसंख्या आहे. इथे स्वतः नियम बनवले जातात आणि तिथले नागरिक ते पळतात.

तुम्हाला कशी वाटली ही मायक्रोनेशन्सची कल्पना?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required