computer

मुंद्रा ड्रग केस - फरशीवर सांडलेल्या पावडरीवरून २१,००० करोडच्या गुन्ह्याची उकल कशी झाली? हे धागेदोरे अफगाणिस्तान-इराणपर्यंत पोचले!!

स्थळ : दिल्लीतलं एक गोदाम.
वरवर पाहता रिकामं... पण आतल्या फरशीवर काहीतरी पांढरं पावडरीसारखं दिसतंय. तिथे त्या वेळी उपस्थित असलेल्या त्या लोकांचे अनुभवी डोळे चमकतात. मग चक्क ती फरशी झाडून काढली जाते. पाहतापाहता भरपूर पावडर एका ठिकाणी गोळा होते. तब्बल १६ किलो वजन भरेल इतकी. आणि झाडून झाडून गोळा केलेली हीच पावडर एका मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात मदत करते.

काय होतं हे प्रकरण ?

सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरात २१ हजार कोटी किंमतीचं ३००० किलो हेरॉईन जप्त केलं गेलं होतं. हा माल अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आला होता आणि त्यासाठी अफगाणिस्तानमधून पैसा पुरवला गेला होता. शिवाय हे ड्रग्ज विकून मिळालेला पैसा अफगाणिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता. हे प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं होतं. त्याच्या तपासाची ही गोष्ट आहे.

त्या गोदामाच्या जमिनीवर विखुरलेल्या पांढऱ्या पावडरीचे अवशेष, टाल्क नावाचा व्हाॅट्सॲप ग्रुप आणि अफगाणिस्तानात हवालाच्या माध्यमातून पाठवलेल्या पैशांच्या नोंदी या सगळ्या पुराव्यांमुळे या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणं शक्य झालं.

ही तस्करी पहिल्यांदा जून २०२१ मध्ये केली गेली. त्यावेळी आरोपींचं नशीब बलवत्तर होतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून ते निसटले आणि अफगाणिस्तानातून आलेला माल भारतीय बाजारपेठेत लीलया विकला गेला. त्यातून करोडोंची उलाढाल झाली. पण दुसऱ्या वेळी सप्टेंबरमध्ये जेव्हा माल आला तेव्हा मात्र या लोकांना दैवाने साथ दिली नाही. गुप्तचर यंत्रणांच्या कारवाईमुळे हा बेत फसला

अफगाणिस्तानातून इराणमार्गे आलेले दोन कंटेनर्स १२ सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातच्या मुंद्रा बंदरात येऊन पोहोचले. या कंटेनर्समध्ये तब्बल ३८ मोठ्या बॅगा भरून टाल्क स्टोन्स म्हणजे टाल्कम पावडरचे खडे होते. तशी अधिकृत माहिती होती. पण गुप्तचर संघटनांकडून सुरक्षा यंत्रणांना एक खास टीप मिळाली होती. या बॅगांमध्ये अजूनही काहीतरी होतं. आणि तसं ते मिळालंपण. कंटेनरची तपासणी झाली तेव्हा ३८ पैकी तीन बॅगांमध्ये हेरॉईन सापडलं. पहिल्या कंटेनरमध्ये जवळपास २००० किलो आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये ९८८ किलो हेरॉईन आढळलं.


हा माल कंदाहारमधल्या मेसर्स हसन हुसेन लिमिटेड या कंपनीच्या नावाने आला होता. मोहम्मद हुसेन दड आणि हसन या दोघांच्या मालकीची ही कंपनी. हा माल 'मेसर्स आशी ट्रेडिंग कंपनी' या कंपनीच्या नावाने पाठवला गेला होता. या कंपनीची मालक असलेली डी. पी. वैशाली ही चेन्नई येथील महिला आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेले व्यवहार तपासल्यावर जूनमध्येही त्यांच्यात अशाच प्रकारचा व्यवहार झाल्याचं आढळून आलं. त्यावेळी भारतात उतरवून घेतलेल्या मालाला क्लिअरन्स देण्यात आला होता. त्यानंतर तपासाची सूत्रं वेगाने फिरू लागली. जूनमधल्या कन्साईनमेंटचे धागेदोरे थेट दिल्लीच्या अलीपूर येथील गोदामापर्यंत पोहोचले आणि या गोदामानेच तपासाला नवी दिशा दिली. गोदामाच्या फरशीवर पांढऱ्या रंगाची पूड सांडलेली दिसली. तिथली जमीन झाडून काढल्यावर जवळपास १६ किलो वजनाची पूड गोळा झाली. परीक्षण केल्यावर ते हेरॉईन असल्याचं सिद्ध झालं. हे गोदाम हुसेन नावाच्या अफगाण नागरिकाने प्रदीप कुमार या नावाने भाड्याने घेतलं होतं. दरम्यानच्या काळात पंजाब पोलिसांनाही अशाच प्रकारे ५०० ग्रॅम हेरॉईन सापडलं. त्यावेळी पकडलेल्या लोकांकडून त्यांना जी माहिती मिळाली, तिच्या आधारे त्यांनी पाच जुलै रोजी दिल्लीमधल्या एका फार्महाऊसवर धाड टाकून १६.५ किलो हेरॉईन जप्त केलं. हे फार्महाऊस खलीद नावाच्या अफगाणिस्तानी नागरिकाने भाड्याने घेतलं होतं. दिल्ली आणि पंजाब प्रकरणांवरून या दोन्हीचा संबंध आहे हे एनआयएने गृहीत धरलं.

ही सगळी यंत्रणा पुढील प्रकारे काम करत होती.


ही पूर्ण यंत्रणा अफगाणिस्तानमधून नियंत्रित (मॅनेज) केली जात होती. त्यांच्यासाठी भारत आणि इराणमध्ये काम करणारे लोक होते. भारतातल्या त्यांच्या प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये सैनिक फार्म येथे एक फार्म हाऊस आणि अलीपूरमध्ये एक गोदाम भाड्याने घेतलं होतं. या ठिकाणी ते हेरॉईन साठवायची आणि शुद्ध करायची सोय होती. तिथून पुढे ते ड्रग पेडलर्सच्या माध्यमातून बाजारात विकलं जायचं.

या ड्रग रॅकेटचे प्रवर्तक होते अफगाणिस्तानातले मोहम्मद हुसेन दड आणि मोहम्मद हसन हे दोघं भाऊ. त्यांनी सुरुवातीला जावेद नजाफी नावाच्या इराणी नागरिकाला आपल्याबरोबर घेतलं. हा मनुष्य इराणच्या बंदर अब्बास या बंदरातून त्यांना हे ड्रग्ज सुरक्षितपणे भारताकडे रवाना करण्यासाठी मदत करणार होता. त्याच्यावर अजून एक जबाबदारी होती. ती म्हणजे भारतात हा माल उतरवण्यासाठी कन्साईनी म्हणून काम करेल असं कुणीतरी शोधणं. त्यासाठी त्याने तामिळनाडूच्या राजकुमार पेरूमल या व्यक्तिची आणि सुधाकर व डीपी वैशाली या जोडप्याची नेमणूक केली. या राजकुमारने सुधाकरला मालाचा ग्राहक (कन्साईनी) म्हणून नेमलं. हा सगळा व्यवहार सुधाकरची बायको वैशाली हिच्या आशी ट्रेडिंग कंपनी या कंपनीतर्फे होणार होता. यासाठी त्यांना भरपूर पैसे मिळणार होते. कन्साईनर कंपनी असलेली कंदाहारची 'हसन हुसेन लिमिटेड' ही कंपनी सेमीप्रोसेस्ड टाल्कची वाहतूक करत असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. आतून प्रत्यक्षात ड्रगचा व्यवहार सुरू होता. त्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रं तयार केली गेली. टाल्क नावाचा एक व्हाॅट्सॲप ग्रुप जून २०२१ मध्ये बनवण्यात आला. नजाफी, सुधाकर, राजकुमार पेरूमल, दड आणि इतर संबंधित या ग्रुपचे सदस्य होते. दोन जूनला पहिल्यांदा भारतात माल आला तेव्हा कोणालाही त्यात काही काळंबेरं असल्याची शंका आली नाही. सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता होती. कस्टम क्लिअरन्स मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचं काम सुधाकरने एका कंपनीला दिलं होतं. क्लिअरन्सनंतर हा माल अलीपूर वेअरहाऊसकडे नेण्यात आला.

मालाची वाहतूक करण्यासाठी सुधाकरने १९ जून तारीख असलेलं बनावट बिल तयार केलं. त्यानुसार आशी ट्रेडिंग कंपनी कडून अलीपूर येथे असलेल्या कुलदीप सिंह नावाच्या व्यक्तीला हा माल पोहोचवायचा होता. या बिलातल्या तपशीलानुसार २४,७३० किलो टाल्क स्टोन ९,१६,६१७ रुपयांना विकण्यात आला होता. पावतीवर वैशालीची आशी ट्रेडर्स या कंपनीच्यावतीने सही होती.

या संपूर्ण प्रकरणात वैशालीचा उघडउघड सहभाग होता. तिने या प्रकरणात स्वतःच्या कंपनीचा वापर करू दिला होता, स्वतःच्या इच्छेने कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या, एवढंच नव्हे तर भारतातून अफगाणिस्तानात पैसे पोहोचते करण्यासाठीदेखील तिने आपल्या कंपनीच्या बँक अकाउंटचा वापर करू दिला होता.

या संपूर्ण व्यवहारासाठी लागणारा पैसा दड याने पुरवला आणि तोही संपूर्णतः रोख. मात्र व्यवहार कायदेशीर भासवण्यासाठी पुढे या रोख रकमेचं बँक डिपॉझिटमध्ये रूपांतर झालं. सर्व पैसा दिल्लीत असलेल्या दडच्या माणसांनी हवालाच्या माध्यमातून फिरवला. एका हवाला ऑपरेटरने हाताने लिहिलेल्या नोंदीनुसार हा माल विकून मिळालेल्या पैशांपैकी ७६.५९ कोटी एवढी रक्कम अफगाणिस्तानात पाठवली गेली. तिथे सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करण्यासाठी ही रक्कम वापरली गेल्याचं समजतं.

सध्या हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. यात १५-१६ आरोपी आहेत.

अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेले हे गुन्हेगार पाकिस्तानी दहशतवादी, तालिबान यांच्यासाठी निधी उभारण्याचं काम करत आहेत, यासाठी भारतासारख्या देशांचा ते हुकमी बाजारपेठ म्हणून वापर करत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना भारतातलेच काही लोक सामील आहेत... याहून मोठं दुर्दैव कोणतं?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required