computer

या ११ नयनरम्य ठिकाणी स्थलांतरित झालात तर तिथले सरकार तुम्हांलाच पैसे देईल. आता बोला!!

कधीतरी जगभर फिरून यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण प्रत्येकजण आपापलं अंथरूण पाहून पाय पसरत असतो. बाहेरच्या देशात जाऊन राहण्याचा तर विचारही अनेकांना परवडत नाही. कारण, जाऊन राहायचं म्हणजे घर हवं, नोकरी किंवा व्यवसाय हवा आणि यासाठी कुठल्याही देशाच्या चलनाने भागलं तरी पुरेल इतका बक्कळ पैसा हवा.. शेवटी काय तर पैसा या एकमेव गोष्टीसाठी आपल्या स्वप्नांना तिलांजली देण्याची वेळ येते. त्यातही फिरणं ही आपल्याकडे एक गरज नाही तर चैन समजली जाते. ज्यांना परवडेल ते करतील, ज्यांना परवडणार नाही ते आहे तिथेच राहतील. पण समजा जर जगातील काही देशांनी फक्त त्यांच्या देशात राहण्यासाठी पैसा देऊ केला तर? तर किती मस्त ना? पण असा फक्त राहण्यासाठी कोण कशाला पैसे देईल? हा विचारही बरोबरच आहे म्हणा. तरीही जगात अशी ११ ठिकाणं आहेत जिथे कमी लोकसंख्या असल्याने तिथे येऊन राहणाऱ्या लोकांना तिथले सरकार काही वर्षांसाठी पैसेही देणार आहे. विश्वास बसत नसेल तर हा लेख पूर्ण वाचा आणि मग ठरवा काय ते.

१) व्हरमॉंट, अमेरिका –


व्हरमॉंट हा अमेरिकेतील एक डोंगराळ भाग आहे. इथले चेडार चीज आणि बेन न जेरी आईसक्रिमही खूप प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश पर्यटकांना आकर्षित करत असतो. परंतु या राज्याची लोकसंख्या अवघी ६ लाख २० हजार इतकीच आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या राज्यात कायमचे राहण्यासाठी यावे म्हणून या राज्याने एक रिमोट वर्कर प्रोग्राम सुरु केला आहे. या उपक्रमानुसार इथे कायमचे वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन वर्षांसाठी दहा हजार डॉलर्स म्हणजेच अन्दाजे साडेसात लाख इतकी रक्कम दिली जाणार आहे. २०१८ साली व्हरमॉंटचे राज्यपाल फील स्कॉट यांनी या उपक्रम जाहीर केला आहे.

२) अलास्का, अमेरिका –


बाहेरच्या नागरिकांना आपल्या राज्यात येऊन राहण्यास प्रोत्साहन देणारे आणखी एक राज्य म्हणजे अलास्का. तुम्हाला जर बर्फ, थंडी आणि आळशी वातावरणात राहण्याची आवड असेल तर तुम्ही अलास्कामध्ये शिफ्ट होण्याचा विचार करू शकता. इथे सगळं काही अगदी संथ गतीने सुरू असतं. या प्रदेशातील लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे, म्हणून इथल्या सरकारने बाहेरून इथे कायमस्वरूपी राहायला येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक व्यक्तीमागे दरवर्षी दोन हजार बहात्तर डॉलर्स इतकी रक्कम देऊ केली आहे. इथे तुम्ही किमान एक वर्षासाठी तर वास्तव्य केले पाहिजे अशी त्यांची अट असून त्यांनी किमान काही दिवसांसाठी तरी तुम्हाला तिथून कुठेच हलता येणार नाहीये.

३) अल्बेनीन, स्वित्झर्लंड –


स्वित्झर्लंड हे तर अनेकांसाठी ड्रीम डेस्टिनेशन असेल. स्वित्झर्लंडमधील अल्बेनीन या छोटेखानी गावात वेगवेगळ्या प्रकारचे चीज आणि स्थानिक हस्तकलेच्या वस्तू मिळतात. तुमचे वय जर ४५ पेक्षा कमी असेल तर या गावात स्थायिक होण्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार स्विस फ्रँक्स म्हणजे अंदाजे वीस लाख रुपये वर्षाला मिळू शकतात. जोडप्यांसाठी हीच रक्कम चाळीस लाख रुपये इतकी आहे. तर त्यांच्या प्रत्येक मुलाला जादाचे दहा हजार फ्रँक्स म्हणजे सुमारे आठ लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत. पण यासाठी तुम्हाला अट आहे की, किमान इथे तुम्ही दहा वर्षे तरी राहिले पाहिजे. तुम्हाला इथले नागरिकत्व मिळवण्यासाठी इथल्या व्यक्तीशी लग्न करावे लागेल अशीही अट यामध्ये नमूद आहे.

४) पोंगा, ऑस्ट्रीअस, स्पेन –


पोंगा हे स्पेन मधील एक अत्यंत सुंदर आणि पुरातन गाव आहे. फक्त एक हजार वस्तीच्या या गावात अधिकाधिक तरुणांनी स्थलांतर करावे म्हणून इथले सरकार प्रयत्न करत आहे. इथे राहायला येणाऱ्या प्रत्येक तरुण जोडप्याला वर्षाला तीन हजार युरो म्हणजेच दीड लाख रुपये मिळणार आहेत. तसेच या गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलालाही तेवढीच रक्कम मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे इथले पर्यावरण प्रदूषण विरहित आहे.

५) आयर्लंड, डब्लीन –


जगभरातील नागरिकांनी 'द एमराल्ड आयल' असलेल्या या ठिकाणी राहायला यावं म्हणून आयर्लंड सरकारने नवनव्या योजना आणल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश योजना या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी आहेत. तुमच्याकडे एखादा बेस्ट बिझनेस प्लान असेल तर तसा प्रस्ताव आयर्लंड सरकारकडे पाठवायला हरकत नाही. या सरकारला जर हा प्रस्ताव आवडला तर तुम्हाला हजार युरोंचं फंडिंग मिळू शकतं.

६) कॅन्डेला, इटली –


इटलीच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे एक छोटसं खेडं आहे. इथली लोकसंख्या फक्त अडीच हजारच्या जवळपास आहे. इथली लोकसंख्या वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासन कसोशीनं प्रयत्न करत आहे. सिंगल लोकांना आठशे युरोज ( अंदाजे अडूसष्ठ हजार), जोडप्याला बाराशे युरो (एक लाख) आणि चार ते पाच लोकांच्या कुटुंबासाठी दोन हजार युरो (अंदाजे पावणे दोन लाख) प्रतिवर्ष अशी रक्कम दिली जाणार असून कर सवलतही मिळणार आहे.

७) चिले, सँटिएगो –


याठिकाणी व्यवसाय उभारणीसाठी चलना देण्यासाठी म्हणून २०१० पासून स्टार-अप प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. इथे उभारल्या जाणाऱ्या उद्योगांसाठी तीन वर्षांकरिता पन्नास हजार डॉलर्सची सबसिडी दिली जाणार आहे. शिवाय एक वर्षासाठी वर्क व्हिजा, व्यवसायासाठी जागा आणि संपर्क यंत्रणा देखील पुरवली जाणार आहे.

८) मॉरिशस


तुमच्याकडे एक चांगले बिझनेस मॉडेल आणि तंत्रज्ञान कुशलता असेल तर तुमच्या या आयडियाजना चालना देण्यास मॉरीशस सरकार उत्सुक आहे. इथे तुम्हाला प्रोत्साहन म्हणून मॉरीशस सरकार उद्योगासाठी वीस हजार मॉरीशस रुपये देणार आहे. तुमचा युनिक बिझनेस प्लान मॉरीशस सरकारकडे सादर करा आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक म्हणून ख्याती मिळवा.

९) नायगारा फॉल्स


न्यूयॉर्क मधील हे शहर एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. पण या शहराची लोकसंख्या अवघी पन्नास हजार आहे. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने सात हजार डॉलरचा स्टायपेंड जाहीर केला आहे. किमान दोन वर्षे तरी या विद्यार्थ्यांनी इथे राहून नोकरी केली पाहिजे अशी त्यांची अट आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना तीन हजार चारशे ब्याण्णव डॉलर्सचे स्टुडंट लोनही मिळू शकते.

१०) न्यू हेवन सिटी


जगप्रसिद्ध येल विद्यापीठ जिथे आहे तेच हे शहर. पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले हे शहर इथे येणाऱ्या रहिवाशांना दहा हजार डॉलर्सचे बिनव्याजी कर्ज देणार आहे. हे पैसे तुम्ही घर घेण्यासाठी वापरू शकता. गंमत म्हणजे जर तुम्ही इथे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलात तर तुमचे हे कर्ज संपूर्णत: माफ केले जाईल. शिवाय चाळीस हजार डॉलरपर्यंतचे शैक्षणिक कर्जही मिळू शकते. बाहेरून इथे आलेल्या न्यू हेवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी देखील माफ असेल. आता बोला.

११) अँटिकायथेरा, ग्रीस


ग्रीकच्या या बेटावर सध्या फक्त चाळीस लोक राहत आहेत. इथे राहायला येणाऱ्या लोकांना हे बेट महिना पाचशे पासष्ट डॉलर्स इतकी रक्कम तीन वर्षांसाठी देणार आहे. सोबत जमीन आणि घरसुद्धा देण्यात येईल. गेली अनेक वर्षे या बेटाची लोकसंख्या सातत्याने कमी कमी होत चालली आहे. इथे राहायला येणाऱ्या कुटुंबाचा खर्च इथल्या चर्चच्या वतीने केला जाणार आहे. इतर देशांचे नागरिकही इथे स्थलांतरित होऊ शकतात. मात्र, ग्रीकच्या नागरिकांना इथे अधिक प्राधान्य दिले जाईल.

तर तुम्हाला यापैकी कोणत्या देशात कायमचे स्थलांतरित व्हायला आवडेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required