२८ ऑक्टोबर २००८- जेव्हा एका युवकाने मुंबईत बेस्ट बसचे अपहरण केले होते !
मुंबईत बसचे अपहरण होऊ शकते का ? असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहीला असेल तर २००८साली मुंबईतच प्रवाशांसकट बेस्टच्या बसचे अपहरण झाले होती त्याची कथा आज 'बोभाटाच्या वाचकांना सांगणार आहोत .नक्की काय घडले होते या प्रकरणात ?
या अपहरण कर्त्याचे नाव राहुल राज! राहुल राज हा २५ वर्षीय तरुण मूळचा पाटण्याचा. २७ ऑक्टोबर २००८ ला तो मुंबईत आला आणि २८ ऑक्टोबरच्या सकाळी १० च्या सुमारास बस मार्ग क्रमांक ३३२ मध्ये चढला.ही डबल डेकर बस कुर्ला आणि अंधेरी दरम्यान होती. तो बसच्या वरच्या डेकवर गेला आणि बंदूक काढून बसचा ताबा घेतला. एका प्रवाशाला त्याने जखमी केले. त्याने बसच्या कंडक्टरवरसुद्धा हल्ला केला. बसचालकाने बस पोलीस स्टेशनवर नेण्याचा प्रयत्न केला.जवळच्या पोलिस ठाण्यापर्यंत बस गेली.मुंबई पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी बसला घेरले आणि राहुल राजला आत्मसमर्पण करण्यास सांगितले.पण त्याने ऐकले नाही उलट पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.
गोळीबार करताना तो ओरडत होता, 'राज ठाकरेंना मारायचे आहे'.रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा त्याला बदला घ्यायचा होता.पोलिसांनीही बचावात गोळीबार केला. त्याला अनेक सूचना देऊनही तो थांबला नाही.पोलीस अधिकार्यांनी १३ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या राहुल राजला लागल्या.तो जखमी झाला. नंतर त्याला हॉस्पिटलमधे नेण्यात आले. पण तो वाचला नाही.
यावरूनही बराच गदारोळ झाला. मीडियात खूप चर्चा झाली.पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उठवले गेले.महाराष्ट्राचे प्रमुख सचिव जॉनी जोसेफ यांनी या प्रकरणाची चौकशी केली. सुप्रीम कोर्टात केस गेली. अखेर सुप्रीम कोर्टाने सुनावले की पोलिसांवर आणि ओलीस असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला. यात पोलिसांच्या कारवाईवर शंका घेऊ नये.आणि हे प्रकरण संपले.
या प्रकरणावर आधारीत ३३२-मुंबई टू इंडिया नावाचा चित्रपटही आला होता.तुमची उत्सुकता ताणली गेली असेल तर हा चित्रपट युट्यूबवर उप्लब्ध आहे. तूर्तास इथे ट्रेलर देत आहोत.
बस अपहरण करून सर्वसामान्य जनतेला ओलीस धरणाऱ्या माथेफिरू तरुणाला असा शेवट झाला. पण सामान्य जनतेचा सुरक्षेचा प्रश्न अश्या काही घटना घडल्यावरच समोर येतात त्यावर चर्चा रंगते. यावर ठोस उपाययोजना होणे तितकेच गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते?
शीतल दरंदळे




